संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलातील डिझेल इलेक्ट्रीक पाणबुड्यांसाठीच्या स्वदेशी एआयपी प्रणालीने गाठला यशाचा प्रमुख टप्पा, सेटींग टू वर्क फेज 2 उपक्रमाचे उद्घाटन

Posted On: 24 OCT 2026 6:53PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाचे पाण्याखालील सामर्थ्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. एअर इंडीपेंडंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीच्या सेटींग टू वर्क (एसटीडब्ल्यू) 2 या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून डीआरडीओच्या नौदल पदार्थ संशोधन प्रयोगशाळेने हे स्वदेशी उर्जा प्रारुप विकसित केले आहे. एआयपी प्रणालीमुळे डिझेल इलेक्ट्रीक पाणबुड्यांचे वातावरणातील ऑक्सीजनवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांची पाण्याखालील कार्यक्षमता वाढेल.

गुजरातमधील हाजीरा येथील लार्सन अँड टुब्रोच्या एएम नाईक हेवी इंजिनिअरिंग कॉम्प्लेक्समध्ये 24 ऑक्टोबर 2026 रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला. संरक्षण सचिव, संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंग या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरीयल्स व्हाइस ऍडमिरल बी सिवकुमार आणि डीआरडीओच्या नौदल प्रणाली व पदार्थ विभागाचे महासंचालक डॉ. आर बालमुरलीकृष्णन हाजीरा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना डीआरडीओच्या अध्यक्षांनी डीआरडीओ व उद्योजक भागीदारांचे अभिनंदन केले. शास्त्रज्ञांचे संशोधनातील सातत्य व उद्योजकांचे सहकार्य यामुळे स्वदेशी एआयपी प्रणाली विकसित करण्यात यश आले आणि प्रत्यक्ष कारखान्यात त्याचे उत्पादन शक्य झाले असे ते म्हणाले. या संपूर्ण प्रवासात प्रत्येक टप्प्यावर या प्रणालीची चाचणी व प्रमाणीकरण यासह सर्व कामात नौदलाने डीआरडीओला केलेल्या सहकार्याचीदेखील त्यांनी प्रशंसा केली. हायड्रोजन व फ्युएल सेल प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षेशी तडजोड न करता एआयपी प्रणाली वेळेत नौदलामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढच्या टप्प्यातील कामकाजावर भर दिला जावा, असे त्यांनी सुचविले.

पुढील टप्प्यामध्ये एआयपी उर्जा प्रारुप उर्जा उत्पादनासाठी सक्षम केले जाईल आणि भारतीय नौदलाच्या नियमावलीनुसार त्याची काटेकोरपणे तपासणी केली जाईल. त्यानंतर कलवरी पाणबुडीमध्ये समाविष्ट करण्यासाठी 2027 वर्षाच्या सुरुवातीला ही प्रणाली माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीकडे सुपूर्द केली जाईल.

***

माधुरी पांगे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2328078) अभ्यागत कक्ष : 10