कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या(DARPG) सचिवांनी, मुंबईतील रेल्वे आणि वित्त मंत्रालयांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'विशेष मोहीम 6.0' च्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

Posted On: 22 OCT 2026 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या (DARPG) सचिव  निवेदिता शुक्ला वर्मा यांनी 22 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील रेल्वे मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाच्या क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन सध्या सुरू असलेल्या 'विशेष मोहीम 6.0' च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान स्वच्छता, जागेचे व्यवस्थापन, जुने व निरुपयोगी अभिलेख आणि साहित्याची विल्हेवाट लावणे, तसेच कार्यक्षम आणि शाश्वत कार्यस्थळ व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमधील प्रगतीचे मूल्यमापन करण्यावर विशेष भर देण्यात आला.

रेल्वे मंत्रालयाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या भेटीचा एक भाग म्हणून, सचिवांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ला भेट दिली, जिथे त्यांनी प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा आणि प्रवासी सुलभता वाढवण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. 'विशेष मोहीम 6.0' अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून, त्या 'रेल जनसंवाद' मध्ये सहभागी झाल्या, ज्यामध्ये त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला तसेच स्थानकावरील सुविधा व व्यवस्था, मुख्य मार्ग प्लॅटफॉर्म्स, तिकीट सुविधा आणि हेरिटेज इमारतीचा आढावा घेतला. या भेटीमुळे सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि रेल्वे परिसर स्वच्छ, टापटीप व प्रवाशांसाठी अनुकूल ठेवण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर केलेल्या उपायांचे मूल्यमापन करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमादरम्यान DARPG चे अप्पर सचिव  पुनीत यादव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  राजीव श्रीवास्तव आणि रेल्वे मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर, सचिवांनी स्टेट बँक भवन, कॉर्पोरेट सेंटर, मुंबईला भेट दिली आणि  स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी 'विशेष मोहीम 6.0' वर एक सादरीकरण करून या मोहिमेअंतर्गत घेतलेले उपक्रम आणि झालेली प्रगती याची माहिती दिली.  या मोहिमेचा एक भाग म्हणून, सचिव आणि SBI चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांच्या हस्ते 'सायबर फ्रॉड अवेअरनेस'  या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या भेटीदरम्यान, सचिवांनी स्टेट बँक भवनाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या 'पुनर्नवा' या ई-कचऱ्यापासून बनवलेल्या कलाकृतीचेही  अवलोकन केले. निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा सर्जनशील पुनर्वापर कसा करता येतो, याचे हे शिल्प उत्तम उदाहरण आहे; आणि हाच 'विशेष मोहिमे'चा मुख्य उद्देश आहे. त्यांनी विशेष मोहीम 6.0 चा भाग म्हणून नूतनीकरण केलेल्या SBI सभागृहालाही भेट दिली. हे सभागृह विद्यमान कार्यालयीन जागेचा योग्य वापर आणि अकार्यक्षम पायाभूत सुविधांचे उपयुक्त सुविधांमध्ये रूपांतर करण्यावर या मोहिमेच्या माध्यमातून दिला जाणारा भर याचे उत्तम उदाहरण आहे.

विशेष मोहीम 6.0 संस्थांतर्गत स्वच्छता, जुने व निरुपयोगी अभिलेख आणि साहित्याची विल्हेवाट लावणे, अकार्यक्षम कार्यालयीन जागा मोकळी करून तिचा पुनर्वापर करणे तसेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्यासह सर्व प्रकारच्या कचऱ्याची वैज्ञानिक विल्हेवाट आणि पुनर्वापर सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर देते. ही मोहीम सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यक्षमता, पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाची संस्कृती विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे.

नियमित देखरेख, प्रभावी अंमलबजावणी आणि शाश्वत कार्यस्थळ पद्धतींचा स्वीकार करून विशेष मोहीम 6.0 ची उद्दिष्टे क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष आणि दृश्य स्वरूपातील परिणामांमध्ये रूपांतरित करण्याचे महत्त्व या भेटींच्या निमित्ताने अधोरेखित झाले.

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326851) अभ्यागत कक्ष : 8