रसायने व पेट्रोकेमिकल विभाग
azadi ka amrit mahotsav

मुंबईत 22 ऑक्टोबरपासून आयोजित '14 व्या इंडिया केम 2026 ' च्या निमित्ताने जागतिक रसायन आणि पेट्रोकेमिकल उद्योग एकाच मंचावर एकत्र येणार

केंद्रीय रसायन आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उद्या मुंबईत या कार्यक्रमाचे होणार उद्घाटन

"ॲडव्हांटेज भारत: एक उदयोन्मुख जागतिक रसायन केंद्र" या संकल्पनेवर आधारित हा तीन दिवसीय कार्यक्रम भारताची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीच्या संधी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रदर्शित करणार

14 व्या इंडिया केम 2026 मध्ये जपान 'भागीदार देश' म्हणून सहभागी होणार

Posted On: 21 OCT 2026 2:40PM by PIB Mumbai

केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत 'रसायन आणि पेट्रोकेमिकल विभाग', 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (फिक्की ) बरोबर भागीदारीत, 22 ते  24,ऑक्टोबर 2026 दरम्यान मुंबईतील नेस्को बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 'इंडिया केम 2026 ' च्या 14 व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे.

हा प्रमुख द्विवार्षिक कार्यक्रम भारताच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात सहकार्य, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यासाठी धोरणकर्ते, जागतिक उद्योजक , गुंतवणूकदार, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि इतर हितधारकांना एकत्र आणेल.

या कार्यक्रमाच्या 14 व्या आवृत्तीची संकल्पना “ॲडव्हांटेज भारत: एक उदयोन्मुख जागतिक रसायने केंद्र” अशी आहे. इंडिया केम 2026 मध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद आयोजित केली जाईल, जे या कार्यक्रमाला भारताची औद्योगिक क्षमता, तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिक उत्पादन व सोर्सिंग केंद्र म्हणून असलेली क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून स्थान मिळवून देईल .

रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  जे. पी. नड्डा या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेलदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशाचे मुख्यमंत्री, तसेच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

भारतीय रासायनिक उद्योग लक्षणीय वाढीसाठी सज्ज

भारत हा जगातील सहावा आणि आशियातील चौथा सर्वात मोठा रसायने  उत्पादक देश आहे. त्यामुळे  'इंडिया केम 2026 या प्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भारतीय रासायनिक उद्योग 2030 पर्यंत 300 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि 2040 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज असून या क्षेत्रात मोठी वाढ दिसून येत आहे. वाढती मागणी, निर्यातीच्या संधी, लोकसंख्याशास्त्रीय लाभ , तुलनेत कमी दरडोई उपभोग  आणि सरकारचे सक्षम उपक्रम यांसारख्या घटकांमुळे या क्षेत्राच्या वाढीला बळ मिळत आहे.

भारताचे एक पसंतीचे जागतिक गंतव्यस्थान म्हणून उदय होण्यामागे प्रशासकीय सुधारणा, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, मजबूत व्यापार आणि गुंतवणूक धोरणे, एक मजबूत नियामक चौकट आणि वाजवी दरात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता हे घटक बळ देत  आहेत. देशांतर्गत उत्पादन क्षमता बळकट करण्यासाठी, जागतिक मूल्य साखळीतील सहभाग वाढवण्यासाठी आणि भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आकांक्षांना पाठबळ देण्यासाठी रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.

मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सहभाग अपेक्षित

इंडिया केम 2026  मध्ये जपान, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन , युरोपियन युनियनमधील विविध देश, लॅटिन अमेरिका, व्हिएतनाम, कोरिया आणि आसियान राष्ट्रांसह 100  हून अधिक देशांचा सहभाग अपेक्षित आहे.

14 व्या 'इंडिया केम 2026 ' मध्ये जपान 'भागीदार देश' म्हणून सहभागी होणार आहे. भारत-जपान आर्थिक सहकार्य मजबूत  करण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे.

भारत आणि परदेशातले 200 हून अधिक प्रदर्शक, देश-विदेशातले 8,000 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत आणि भारत तसेच परदेशातले 50 हून अधिक आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचावर सहभागी होणार आहेत. दक्षिण अमेरिका, अमेरिका, युरोपीय संघ, कॉमनवेल्थ ऑफ इंडीपेंडट स्टेट्स (सीआयएस) देश, पश्चिम युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातून खरेदीदारांची शिष्टमंडळेही या प्रदर्शनाला भेट देण्याची अपेक्षा आहे.

पेट्रोलियम, रसायने आणि पेट्रोरसायन गुंतवणूक क्षेत्रे (पीसीपीआयआर) तसेच रसायन उद्योगांची केंद्रे असलेली गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र ही राज्ये या प्रसंगी आपली औद्योगिक क्षमता आणि गुंतवणुकीच्या संधी सादर करतील.

रसायन उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीतल्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

या प्रदर्शनात रसायने, पेट्रोरसायने, प्रक्रिया प्रकल्पांसाठीची यंत्रसामग्री आणि उपकरणे या क्षेत्रांतील विविध उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचा समावेश असेल.

रसायन विभागात सूक्ष्म आणि विशेष रसायने, कृषी रसायने आणि खते, मूलभूत रसायने, रंगद्रव्ये आणि रंग, हरित आणि शाश्वत रसायने, औषधनिर्मितीसाठीचे घटक, जलशुद्धीकरणासाठीची रसायने, बांधकाम क्षेत्रातील रसायने, तसेच औद्योगिक संशोधन आणि नवकल्पना यांचे प्रदर्शन केले जाईल.

पेट्रोरसायन विभागात पॉलिमर आणि अभियांत्रिकी प्लास्टिक, ओलेफिन्स, कृत्रिम तंतू, इलॅस्टोमर्स, अरोमॅटिक्स आणि त्यांपासून तयार होणारी उत्पादने, जैवआधारित आणि पुनर्वापरित पेट्रोरसायने, विशेष कार्यक्षमतेचे प्लास्टिक, संमिश्र पदार्थ आणि वाहननिर्मिती, विमान-अवकाश तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांसाठीचे विशेष पॉलिमर सादर केले जातील.

प्रक्रिया प्रकल्पांसाठीची यंत्रसामग्री आणि उपकरणे या विभागात प्रगत यंत्रसामग्री, प्रक्रिया तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि प्रकल्पविषयक सेवा, डिजिटलायझेशन, स्वयंचलन, स्मार्ट उत्पादन व्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण प्रणाली, गाळणी आणि पृथक्करण तंत्रज्ञान, प्रयोगशाळेतील उपकरणे, विश्लेषणात्मक साधने, रोबोटिक्स आणि रासायनिक कारखान्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय यांवर भर दिला जाईल.

14 वे इंडिया केम 2026, विविध व्यावसायिक संधी

14 व्या इंडिया केम 2026 मुळे तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त उपक्रम, कंत्राटी संशोधन आणि उत्पादन, मागणीनुसार रासायनिक संश्लेषण, पेट्रोलियम, रसायने आणि पेट्रोरसायन गुंतवणूक क्षेत्रे तसेच रसायन उद्योगांच्या केंद्रांमधील गुंतवणूक आणि भारतातून जागतिक स्तरावर खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील.

नॅनोपदार्थ, अर्धसंवाहक, संमिश्र पदार्थ आणि जैवविघटनशील पॉलिमर यांसारख्या विशेष आणि उच्च कार्यक्षमतेच्या पदार्थांच्या क्षेत्रातही भागीदारीला चालना मिळेल.

हरित आणि शाश्वत तंत्रज्ञान, जैवआधारित रसायने, पुनर्वापर आणि चक्राकार अर्थव्यवस्था, पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय निकषांशी संबंधित उपाययोजना (ईएसजी), सुरक्षितता आणि नियमपालन, नवउद्यमांसाठी उष्मायन सुविधा, कौशल्य विकास, पुरवठा साखळी आणि मालवाहतूक सेवा, तसेच व्यवसाय-ते-व्यवसाय व्यापारासाठीची डिजिटल व्यासपीठे यांसारख्या क्षेत्रांतही संधी उपलब्ध होतील.

उद्योग, सरकार, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादार यांना एकत्र आणून इंडिया केम 2026 व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे, नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि भारताच्या उत्पादन व्यवस्थेतील महत्त्वाच्या रसायन उद्योगात गुंतवणूक वाढवणे, हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करेल.

इंडिया केमचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न

इंडिया केम 2024 च्या गेल्या आवृत्तीत 72 देशांचा सहभाग होता. त्यात 172 प्रदर्शक, 78 जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, 135 नामवंत वक्ते, 689 परदेशी प्रतिनिधी, 1,115 भारतीय प्रतिनिधी आणि 8,720 व्यावसायिक अभ्यागत सहभागी झाले होते. इंडिया केमच्या 13 व्या आवृत्तीतल्या या महत्त्वाच्या व्यवसाय-ते-व्यवसाय कार्यक्रमाला 15,000 हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली होती. यामध्ये गुंतवणुकीच्या संधी सादर करणाऱ्या 20 राज्यांच्या शिष्टमंडळांचाही समावेश होता.

या सहभागाच्या आधारावर 14 व्या आवृत्तीत आंतरराष्ट्रीय सहभाग अधिक वाढवणे, व्यावसायिक भागीदारीचा विस्तार करणे आणि जागतिक रसायन व पेट्रोरसायन उद्योगातील भारताची वाढती भूमिका अधोरेखित करणे, यांवर भर दिला जाणार आहे.

जागतिक कौशल्य आणि अनुभव यांची भारताची उत्पादन क्षमता, गुंतवणुकीची शक्यता आणि शाश्वत औद्योगिक विकासाविषयी असलेली बांधिलकी यांच्याशी सांगड घालून, “ॲडव्हान्टेज भारत : उदयोन्मुख जागतिक रसायन उद्योग केंद्र” ही संकल्पना पुढे नेण्यासाठी इंडिया केम 2026 हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या: www.indiachem.in

***

Nilima Chitale / Sushma Kane / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar


(Release ID: 2326121) अभ्यागत कक्ष : 20