पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया ईआयएसीपीतर्फे 20 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी हरित दिवाळी अभियान, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन
Posted On:
20 OCT 2026 1:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कार्यक्रम केंद्राने – संसाधन भागीदाराने, 20 ऑक्टोबर 2026 ते 8 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशव्यापी हरित दिवाळी अभियान सुरू केले आहे. मिशन लाइफ अर्थात पर्यावरणपूरक जीवनशैली या उपक्रमाशी सुसंगत राहून, नागरिकांनी फटाके टाळावेत आणि स्वच्छ व हरित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन या अभियानातून करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, निवासी कल्याण संघटना आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या 130 शहरांवर या अभियानात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांनी फटाके न वाजवण्याची, कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांनाही फटाके न वाजवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची, पणत्यांचा आणि कमी वीज वापरणाऱ्या दिव्यांचा वापर करण्याची, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याची, कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, शैक्षणिक संस्था आणि सामुदायिक गटांनी प्रार्थनासभा, वर्ग, रॅली आणि सामुदायिक बैठकांमध्ये अशा प्रतिज्ञा घेण्याचे कार्यक्रम आयोजित करावेत, असेही प्रोत्साहन देण्यात येत आहे.
नागरिकांनी डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कार्बन फूटप्रिंट सर्वेक्षणातही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दैनंदिन कामकाज आणि वस्तूंच्या वापरामुळे पर्यावरणावर किती परिणाम होतो, हे समजून घेता येईल. तसेच, पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणाऱ्या सवयी ओळखण्यास मदत होईल.
हे सर्वेक्षण पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: https://wwfindiawebgis.in/Carbon_Footprint/Carbon_Footprint.html. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळा, महाविद्यालये, ईआयएसीपी केंद्रे, सामुदायिक गट आणि व्यक्तींनी आपल्या उपक्रमांची माहिती पुढील ऑनलाइन अर्जाद्वारे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. https://docs.google.com/forms/d/15hDbjbqZzeo68kNjAxeHQA_SMIQ7lUlPdvCIi-gvwdY/viewform.
सादर करण्यात येणाऱ्या माहितीत संस्था किंवा संघटनेचे नाव आणि ठिकाण, उपक्रमाचा तपशील आणि तारीख, प्रतिज्ञा घेतलेल्या सहभागींची संख्या, भौगोलिक स्थानाची नोंद असलेली छायाचित्रे आणि थोडक्यात अहवाल यांचा समावेश असावा. निवडक उपक्रमांची माहिती ईआयएसीपीच्या संकेतस्थळांवर आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली जाऊ शकते.

* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325433)
अभ्यागत कक्ष : 6