संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन यांच्या हस्ते प्रोजेक्ट सीबर्डच्या पायाभूत सुविधांचे उद्घाटन

Posted On: 17 OCT 2026 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2026 रोजी कारवार येथील नौदल तळावर प्रोजेक्ट सीबर्डच्या टप्पा 2ए अंतर्गत उभारण्यात आलेल्या निवासस्थानांचे आणि आरोग्य संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. ही निवासस्थाने भारतीय नौदलातील संरक्षण विभागाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली आहेत. याशिवाय, काही पायाभूत सुविधांचे आणि नौदल तळापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्ते आणि इतर सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीबर्डचे महासंचालक व्हाइस ॲडमिरल विवेक दहिया आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्घाटन करण्यात आलेल्या सुविधांमध्ये नौदलातील संरक्षण विभागाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी 5 इमारतींमध्ये 300 निवासस्थानांचा समावेश आहे. तसेच, सध्याच्या आयएनएचएस पतंजली रुग्णालयाची क्षमता वाढवून 409 खाटांचे रुग्णालय करण्याच्या योजनेअंतर्गत नौदल तळावरील आरोग्य संस्थेची इमारत उभारण्यात आली आहे. या सुविधांसाठी 2 लाख लिटर क्षमतेची उंचावरील पाण्याची टाकी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

कारवार नौदल तळाचा विस्तार होत असल्याने तेथील स्वच्छता व्यवस्था अधिक चांगली करणे आणि प्रवेश व्यवस्था सुलभ करणे आवश्यक आहे. यासाठी आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, चार पदरी रस्ता आणि पूल उभारण्यात आला आहे. या मार्गावर पादचाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या पायाभूत सुविधांचा विकास प्रोजेक्ट सीबर्डच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरू असलेल्या कामाचा भाग आहे. या टप्प्यात दुहेरी वापरासाठीचे नौदल विमानतळ, पूर्ण क्षमतेची नौदल गोदी, तसेच नौदलाची जहाजे आणि विमानांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारण्याचा समावेश आहे.

या नौदल तळावर सुमारे 10 हजार गणवेशधारी आणि नागरी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह राहणार आहेत. यामुळे उत्तर कन्नड भागातील स्थानिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.

या प्रकल्पाचे काम पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच भारतीय हरित इमारत परिषद यांच्या सध्याच्या मानकांनुसार करण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतीय हरित इमारत परिषदेचे गोल्ड मानांकन मिळणार आहे. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून, यासाठी लागणारे 90 टक्क्यांहून अधिक साहित्य आणि उपकरणे स्वदेशी आहेत.

 

* * *

शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324741) अभ्यागत कक्ष : 11