सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
'बात खादी की' पॉडकास्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी' हे आवाहन 'जेन झी' पर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल यांच्या हस्ते मुंबईत 'खादी महोत्सव-2026'चे उद्घाटन
प्रदर्शनात देशभरातल्या 12 राज्यांमधली 77 युनिट्स सहभागी; खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विविध प्रकारांचे प्रदर्शन
Posted On:
16 OCT 2026 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2026
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल यांच्या हस्ते गुरुवारी, 15 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत विलेपार्ले इथल्या केव्हीआयसीच्या मध्यवर्ती कार्यालयात 'खादी महोत्सव-2026'चे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी” आणि “व्होकल फॉर लोकल” हे आवाहन नव्या पिढीपर्यंत, विशेषतः 'जेन झी' पर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांना आधुनिक जीवनशैलीशी जोडण्यासाठी आणि देशातल्या कारागीर व ग्रामीण उद्योजकांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या खादी महोत्सवात खादी उत्पादनांवर 20% आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर 10% विशेष सूट दिली जात आहे. या महोत्सवात 12 राज्यांमधली एकूण 77 युनिट्स 77 स्टॉल्सच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करत आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान खादीला स्वावलंबन आणि आर्थिक स्वयंपूर्णतेचे प्रतीक बनवले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “स्वदेशी”चे आवाहन नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज गोयल या प्रसंगी म्हणाले.
आजची 'जेन झी' पिढी फॅशन, डिझाइन, तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पनांबाबत अत्यंत जागरूक आहे. खादीला समकालीन डिझाइन्स, आकर्षक कपडे, उत्तम ब्रँडिंग आणि आधुनिक जीवनशैलीशी जोडून तरुणांमध्ये ती अधिक लोकप्रिय केली जाऊ शकते, असेही गोयल यांनी नमूद केले.

पारंपरिक गाभा जपत बदलत्या काळानुसार खादीचे सादरीकरण आणि विपणन बदलणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुण हे केवळ स्वदेशी उत्पादनांचे ग्राहकच नाही तर त्यांचे ब्रँड अँबेसेडर, डिझायनर्स, डिजिटल प्रसारक आणि उद्योजकही बनू शकतील. सोशल मीडिया, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून तरुण खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशीही जोडू शकतील, असे गोयल यांनी सांगितले.
येत्या काही वर्षांत हे क्षेत्र 2.51 लाख कोटी रुपये उलाढालीचे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


* * *
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324518)
अभ्यागत कक्ष : 14