पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या देशातील खेळाडूंच्या पथकाशी साधला संवाद
आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्यांनी तिरंग्याची शान उंचावली असून त्याचा मान आणि अभिमान वाढवला : पंतप्रधान
प्रत्येक क्रीडांगणावर तिरंग्याचा अभिमान, क्रीडा क्षेत्रात भारताची नवी ओळख, प्रत्येक खेळात नवीन विजेते आणि आपल्या नावावर नवीन विक्रम; आपण हे करून दाखवू : पंतप्रधान
जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये महासत्ता बनण्यासाठी भारत सज्ज : पंतप्रधान
Posted On:
15 OCT 2026 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी संवाद साधला. अनेक पदक विजेते खेळाडू एकत्र आल्यामुळे निर्माण झालेल्या उत्साही वातावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मोदी म्हणाले,"ज्यावेळी आपल्या जिद्दीचे रूपांतर विजयामध्ये होते, त्यावेळी जिंकलेल्या पदकासोबत चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि तेज येते. या गोष्टीचे तुम्ही सर्व तरुण खेळाडू उत्तम उदाहरण आहात."
तुमच्या अभिमानास्पद कामगिरीचा 140 कोटी देशवासियांना कौतुक वाटते, असे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, राष्ट्रीय ध्वजाचा मान आणि गौरव उंचावणे हीच सर्वोच्च कामगिरी आहे. त्यांनी या सामूहिक राष्ट्रीय विजयाबद्दल खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, सहाय्यक कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, " हे यश केवळ तुमचे एकट्याचे नाही; तर ते देशातील करोडो नागरिकांचेही यश आहे."
यावेळी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधानांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी नमूद केले की, डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी जीवन आणि दूरदृष्टी आजही देशाला मार्गदर्शन करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले,"त्यांचे जीवन आणि त्यांची दूरदृष्टी आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे."
आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या दुहेरी सुवर्णपदक विजयाचे कौतुक केले. हॉकीमध्ये महिला संघाने 44 वर्षांची प्रतीक्षा संपवली तसेच, क्रिकेटमधील दोन्ही संघांची सलग पदके आणि कबड्डीमधील दुहेरी सुवर्णपदक विजयाबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.तिरंदाजीतील पाच सुवर्णपदके, नेमबाजी, बॉक्सिंग आणि कुस्तीमधील उत्कृष्ट कामगिरी,ॲथलेटिक्समधील नवीन विक्रम, 28 वर्षांनंतर भारत्तोलोमध्ये मिळालेले पदक आणि 1982 नंतर मॅरेथॉनमध्ये मिळालेले पहिले यश, या सर्वांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "यावेळच्या आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरल्या आहेत."
भारताच्या एकूण 85 पदकांपैकी 38 पदके (ज्यामध्ये 11 सुवर्णपदकांचा समावेश आहे) जिंकणाऱ्या महिला खेळाडूंच्या अमूल्य योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, ही आकडेवारी केवळ संख्येपेक्षा खूप मोठी गोष्ट दर्शवते. हे एका सशक्त 'नव्या भारता'चे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी नमूद केले. भारतीय खेळाडूंनी मिश्र मार्शल आर्ट्स (मिक्स्ड मार्शल आर्ट्स), सॉफ्ट टेनिस आणि नौकानयनाच्या काही प्रकारांत पहिल्यांदाच पदके जिंकून इतिहास घडवला, या गोष्टीवरही त्यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी मोदी म्हणाले,"ज्या खेळांत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात आपण यापूर्वी कधीही पदक जिंकले नव्हते,अशा क्रीडा प्रकारातही आज भारत पदके जिंकत आहे."
खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिक उंच शिखरे गाठावीत,असे आवाहन करत, पंतप्रधानांनी एक उत्साहपूर्ण शपथ सर्वांना दिली. यावेळी सर्व खेळाडूंनी एकजुटीने "आम्ही हे करून दाखवू!" (We will Do it!) असा जयघोष केला. सर्वांनी प्रत्येक मैदानात तिरंग्याचा सन्मान वाढवावा, देशासाठी एक नवीन क्रीडा ओळख निर्माण करावी आणि प्रत्येक खेळात नवीन विजेते घडवावेत. पंतप्रधान मोदी ठामपणे म्हणाले, "आपल्या नावावर आणखी नवीन विक्रम नोंदवले जातील, आम्ही हे करून दाखवू!" अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या स्थानाकडे लक्ष वेधत, पंतप्रधानांनी खेळाडूंना आठवण करून दिली की, या स्टेडियमला महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव दिलेले आहे, ते मेजर ध्यानचंद रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करत असत. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या अथक समर्पणाचे उदाहरण देत सांगितले की, मोठी ध्येये गाठण्यासाठी अनेक वर्षांचा संयम आणि कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. पंतप्रधान मोदी म्हणाले, "त्यांचे हे कठोर परिश्रम आपल्याला पुन्हा पुन्हा ही जाणीव करून देतात की, संकल्प आणि स्वप्ने एका दिवसात पूर्ण होत नाहीत."
गेल्या बारा वर्षात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पूर्वीच्या काळाशी तुलना करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पूर्वी भारताला मोजक्याच पदकांवर समाधान मानावे लागत होते आणि अनेक क्रीडाप्रकार तर देशाला माहितीच नव्हते. ऑलम्पिकमधील निम्म्याहून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये भारताचा एकही खेळाडू सहभागी होत नव्हता, याची आठवण त्यांनी करून दिली. स्पर्धेत सहभागीच झालो नाही तर पदके कशी जिंकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "जर आपण स्पर्धाच केली नाही, तर पदके कशी मिळवणार?" असे पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा धोरणात झालेल्या निर्णायक बदलावर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्रातील उदासीनता आणि आत्म-संदेह दूर करण्याचा सरकारने दृढनिश्चय केला आहे. या प्रयत्नांमुळेच आज आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या संख्येत झालेल्या वाढीचे त्यांनी स्वागत केले. "आम्ही हा संकल्प केला आहे की आम्ही ही निराशावादी मानसिकता दूर करण्याचा आमचा संकल्प आहे!" असे पंतप्रधानांनी सांगितले.
गेल्या 10 ते 12 वर्षांतील दूरदृष्टी आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे परिवर्तन घडले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम' (TOPS) आणि विस्तारित 'खेलो इंडिया' उपक्रमाच्या आधारावर एका पारदर्शक, आधुनिक क्रीडा परिसंस्थेच्या निर्मितीची सविस्तर माहिती दिली. देशभरातील क्रीडा संघटना आणि तळागाळातील कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी सरकारने प्रचंड आर्थिक संसाधने उपलब्ध करून दिली आहेत, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. "खेलो इंडियाचा विस्तार करण्यासाठी आणि क्रीडा संघटनांना बळकट करण्यासाठी 36 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली," असेही ते म्हणाले.
एक हजाराहून अधिक 'खेलो इंडिया' केंद्रांमार्फत तळागाळातील पायाभूत सुविधांच्या जलद विस्ताराची माहिती देताना, पंतप्रधानांनी विविध शहरांमध्ये बांधण्यात येत असलेल्या हजारो नवीन स्टेडियम, बहुउद्देशीय सभागृह, ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल आणि हॉकीची मैदाने आणि जलतरण तलाव उभारण्यात येत असल्याचे सांगितले. खेळाडूंना मिळणाऱ्या थेट आर्थिक मदतीवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. टॉप्स योजनेअंतर्गत खेळाडूंना दरमहा 50,000 रुपयांचा वैयक्तिक खर्च भत्ता दिला जात असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठीही निधी पुरवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. "कोणत्याही क्रीडाप्रकाराच्या प्रशिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची गरज भासल्यास, सरकार त्यासाठीही सुविधा देत आहे आणि आर्थिक सहाय्यही पुरवत आहे," हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
हिवाळी क्रीडा स्पर्धा, संसद खेल प्रतियोगिता आणि नवीन 'खेलो भारत नीती'च्या माध्यमातून क्रीडापटूंना अधिकाधिक स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी देशाला गौरव मिळवून देणाऱ्या दिव्यांग खेळाडूंची प्रशंसाही केली. खेळाडूंचे यश हे देशाचा पाठिंबा मिळाल्यास ते किती मोठी कामगिरी करू शकतात, याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. "आज प्रत्येक खेळाडूला हा आत्मविश्वास आहे की देश त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी उभा आहे," असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
लहान वयात क्रीडा प्रशिक्षण सुरु केल्याने अतिरिक्त फायदा मिळतो याचा पुरावा म्हणून पथकातील 15 ते 17 वयोगटातील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी 'खेलो इंडिया' आणि 'इमर्जिंग खेलो इंडिया'च्या माध्यमातून पाच ते पंधरा वयोगटातील मुलांच्या क्रीडा प्रतिभा ओळखून त्यांना प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक, 2030 मध्ये भारतात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2036 मधील ऑलम्पिक स्पर्धांच्या यजमान पदाचे भारताचे स्वप्न यांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. देशभरातील गावपातळीवर क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. "हेच खेळाडू येत्या काळात भारतासाठी पदके मिळवून देतील," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
राष्ट्राच्या भव्य संकल्पांवर अढळ विश्वास व्यक्त करत, पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत आम्ही हे करून दाखवू! अशी जोशपूर्ण घोषणा केली. प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, अव्वल क्रीडा राष्ट्रांच्या पंक्तीत सामील होणे, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि जागतिक क्रीडा केंद्र बनणे या सामायिक ध्येयांभोवती त्यांनी खेळाडूंना एकत्र आणले. भारताच्या कानाकोपऱ्यातून एक विजेता, आम्ही हे करून दाखवू! असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
आशियाई खेळांमधील विजयाला भारतीय तरुणांच्या व्यापक आकांक्षांशी जोडून, पंतप्रधानांनी सांगितले की, कशाप्रकारे तरुण नवोन्मेषकांनी अंतराळ, उपग्रह तंत्रज्ञान, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती करत भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या स्टार्टअप परिसंस्थेत स्थान मिळवून दिले आहे. त्यांनी यावर जोर दिला की, खेळांप्रमाणेच, लहान शहरे आणि गावांमधील तरुण उद्योजकतेची ही लाट पुढे नेत आहेत, ज्यांना दशकभराच्या प्रणालीगत सुधारणांचा पाठिंबा आहे, ज्यामुळे त्यांना राष्ट्राच्या पूर्ण समर्थनाची खात्री मिळते. त्यांना विश्वास आहे की त्यांची स्वप्ने पुढे नेण्यासाठी देशाची संपूर्ण क्षमता त्यांच्या पाठीशी उभी आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
क्रीडा क्षेत्रातील तेजीच्या व्यापक आर्थिक परिणामांवर अधिक भाष्य करताना, पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की सरकारी उपक्रमांचा फायदा केवळ मैदानातील खेळाडूंनाच नाही, तर त्याहूनही अधिक लोकांना होत आहे. त्यांनी क्रीडा प्रशिक्षण, फिजिओथेरपी, क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा प्रसारण यांसारख्या विविध व्यावसायिक क्षेत्रांच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीवर प्रकाश टाकला. यामुळे तरुणांसाठी रोजगार आणि उद्योगाचे नवीन मार्ग निर्माण झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवी पदक विजेत्यांना पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करताना, पंतप्रधानांनी त्यांना शाळांना भेट देण्यास, त्यांच्या मूळ क्रीडांगणांवर परतण्यास आणि त्यांच्या गावातील व शहरातील मुलांशी संवाद साधण्यास सांगितले. त्यांनी यावर जोर दिला की, त्यांनी कष्टाने मिळवलेले अनुभव इतरांना सांगितल्यास, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण खेळाडूंना खूप प्रेरणा मिळू शकते. कदाचित, तुमचा एक छोटासा शब्द एखाद्या मुलाला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचे धैर्य देऊ शकेल, असे मोदी म्हणाले.
क्रीडांगणापलीकडील खेळांच्या सखोल मूल्यावर भाष्य करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, खेळ आयुष्यभराची शिस्त, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, दीर्घकालीन ध्येयांप्रति दृढनिश्चय आणि पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची लवचिकता रुजवतात. हे मूलभूत गुण दैनंदिन जीवनात नैसर्गिकरित्या एकवटतात आणि व्यक्तींना प्रत्येक आव्हानातून मार्ग काढण्यास मार्गदर्शन करतात. हीच खेळाडूवृत्ती आयुष्यभर उपयोगी पडते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जो खेळतो, तो यशस्वी होतो, या आपल्या खास उक्तीने आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी खेळाडूंच्या उत्साहाला नव्या भारताची सर्वात मोठी ताकद म्हणून गौरवले आणि 2047 पर्यंत विकसनशील भारत, जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक, आत्मनिर्भर भारत, जागतिक उत्पादन केंद्र, तंत्रज्ञानातील नेतृत्व, अंतराळ संशोधन आणि ऑलिम्पिकचे आयोजन या उद्दिष्टांचा समावेश असलेल्या आम्ही करून दाखवू! या शेवटच्या घोषणेचे नेतृत्व केले. त्यांनी खेळाडूंच्या भविष्यातील सर्व स्पर्धा आणि प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. याच आत्मविश्वासाने आपल्याला भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे, असे मोदींनी ठामपणे सांगितले.
राधिका अघोर/शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर /राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324147)
अभ्यागत कक्ष : 8