विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आठव्या परिषद बैठकीत डॉ. जितेंद्र सिंह आणि ब्रिटनचे मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी भारत-ब्रिटनमधील विज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याला दिली चालना
डॉ. जितेंद्र सिंह आणि जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'BRIC-CDFD–ONT इंडिया जीनोमिक्स सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन
हवामान, भू-जोखीम, आरोग्य आणि विज्ञान संशोधनातून सहकार्य वाढवण्याची मोठी संधी
Posted On:
12 OCT 2026 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे ब्रिटनचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यासोबत 8 व्या भारत-ब्रिटन विज्ञान आणि नवोन्मेष परिषद (SIC) बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीत भारत-ब्रिटनदरम्यान विज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच संशोधन भागीदारी अधिक बळकट करणे, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवणे आणि वैज्ञानिक संशोधनाचे व्यावहारिक उपयोगांमध्ये रूपांतर करणे यांसाठी उपलब्ध संधींचा शोध घेण्यात आला.
भारतीय प्रतिनिधिमंडळात सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. उमेश वाघमारे, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. श्रीनिवास कुमार तम्माला, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवकुमार कल्याणरामन आणि तंत्रज्ञान विकास मंडळाचे सचिव डॉ. राजेश पाठक यांच्यासह संबंधित विभाग आणि संस्थांमधील इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
ब्रिटनच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व व्यवसाय, नवोन्मेष आणि व्यापार विभागाचे मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी केले. या प्रतिनिधिमंडळात भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, उपउच्चायुक्त बेन मेलर, व्यवसाय, नवोन्मेष आणि व्यापार विभागाच्या प्रभारी स्थायी सचिव अमांडा ब्रूक्स, ब्रिटनचे व्यापार आयुक्त हरजिंदर कांग आणि व्यवसाय, नवोन्मेष आणि व्यापार विभागाचे आंतरराष्ट्रीय संचालक राइस बोवेन यांच्यासह विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील इतर प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. जितेंद्र सिंह आणि जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते संयुक्तपणे BRIC-CDFD–ONT भारत जीनोमिक्स उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि जैवतंत्रज्ञान संशोधन व नवोन्मेष परिषदेचे (BRIC) महासंचालक डॉ. राजेश एस. गोखले, BRIC-CDFD चे संचालक प्रा. उल्लास कोल्थूर-सीताराम आणि ऑक्सफर्ड नॅनोपोर टेक्नॉलॉजीजचे मुख्य वित्तीय अधिकारी निक केहर उपस्थित होते.
परिषदेच्या व्यापक सहकार्याच्या कार्यक्रमाचा आधार भारत-ब्रिटन संशोधन आणि नवोन्मेष सामंजस्य करार, तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम आणि भारत-ब्रिटन व्हिजन 2035 हा आहे. या चौकटीमुळे संशोधन संस्था, विद्यापीठे, उद्योग आणि नवोन्मेषक यांच्यात सहकार्याचा पाया मजबूत होतो. वैज्ञानिक प्रगतीला चालना देणे आणि संशोधनाचे तंत्रज्ञान व व्यावहारिक उपयोगांमध्ये रूपांतर करणे यावर या सहकार्याचा विशेष भर आहे.
भारत आणि ब्रिटनमधील संस्थांदरम्यान प्रतिजैविक प्रतिकारशक्ती, आरोग्यसेवा, कृषी, हवामान आणि हवामानशास्त्र, भू-आपत्ती, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान तसेच मूलभूत विज्ञान या क्षेत्रांतही संयुक्त संशोधन सुरू आहे. हवामान आणि हवामानशास्त्र क्षेत्रातील सहकार्यामध्ये दक्षिण आशियाई मान्सूनशी संबंधित नैसर्गिक आपत्तींचे संशोधन, हवामानाचे अधिक अचूक प्रारूप विकसित करण्याची क्षमता सुधारणे आणि जोखमीवर आधारित अंदाज प्रणाली विकसित करणे यांचा समावेश आहे.
संशोधन संस्था, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रातील परिसंस्था यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ करणे आणि संस्थात्मक पातळीवर सातत्यपूर्ण सहभाग राखणे यांचे महत्त्व या बैठकीत पुन्हा अधोरेखित करण्यात आले. भारत-ब्रिटनदरम्यान सातत्याने सुरू असलेल्या सहकार्यामुळे वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे, संशोधन भागीदारी मजबूत करणे आणि वैज्ञानिक क्षमतांचे रूपांतर सामायिक आव्हानांवरील व्यावहारिक उपायांमध्ये करणे शक्य होईल.




शैलेश पाटील/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322575)
अभ्यागत कक्ष : 3