मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव विभाग डॉ.अभिलक्ष लिखी यांनी मदुराई शोभिवंत मत्स्यपालन समूहाला भेट देऊन प्रगतीशील शोभिवंत मत्स्यपालकांशी साधला संवाद

Posted On: 12 OCT 2026 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी 12 ऑक्टोबर 2026 रोजी तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील मेलूरमधील मुक्कामपट्टी गावातील पदिमूनीश्वरर एकात्मिक शोभिवंत मत्स्यपालन केंद्राला भेट दिली. भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत (पीएमएमएसवाय) तामिळनाडूतील मदुराईला अंतर्गत शोभिवंत मत्स्यपालन समूह म्हणून अधिसूचित केले आहे.

 

 

शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्रातील प्रगती आणि क्षमता यांचे मूल्यांकन करणे, मत्स्यपालक आणि उद्योजकांशी संवाद साधणे तसेच शोभिवंत मत्स्यपालन समूहाच्या विकासाला अधिक बळकट करणे, हा लिखी यांच्या भेटीचा उद्देश होता.

या संवादादरम्यान, केंद्रीय सचिवांनी मत्स्यपालक आणि उद्योजकांशी शोभिवंत माशांच्या जाती, प्रजोत्पादक मासे आणि मत्स्यबीजांची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता, जलचर प्राण्यांचे आरोग्य, वाहतूक आणि विपणन या विषयांवर चर्चा केली. त्यांनी शास्त्रीय प्रजनन आणि संगोपन पद्धती, उच्च-मूल्य असलेल्या देशी प्रजातींना प्रोत्साहन, तसेच तंत्रज्ञान, संस्थात्मक वित्तपुरवठा आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याला प्रोत्साहन दिले.

सरकारच्या समूह-आधारित विकास दृष्टिकोनावर भर देत, लिखी यांनी सांगितले की, उत्पादन, निविष्ठांचा पुरवठा, पायाभूत सुविधा, क्षमता बांधणी, प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडिंग, लॉजिस्टिक्स आणि बाजारपेठ जोडणी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या समन्वित उपाययोजनांद्वारे देशभरात 34 अधिसूचित मत्स्य समूह विकसित केले जात आहेत. मूल्य-साखळीतील त्रुटी दूर करणे, स्पर्धात्मकता वाढवणे आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न सुधारणे हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे.

पदिमुनीश्वरर एकात्मिक शोभिवंत मत्स्यपालन केंद्राची स्थापना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 25 लाख रुपये खर्चून करण्यात आली आहे. या केंद्रात गप्पी, प्लॅटी, मॉली, स्वोर्डटेल, गोल्डफिश, कोई कार्प, सिक्लिड्स आणि फायटर फिश यांसह शोभिवंत माशांच्या 30 हून अधिक जातींचे प्रजनन आणि संगोपन केले जाते. या केंद्रात वर्षाला चार उत्पादन चक्रे राबवली जातात. त्यातून दरवर्षी सुमारे 2 लाख शोभिवंत मत्स्यबीजांचे उत्पादन होते, तर सुमारे 3.75 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. या केंद्रामार्फत तामिळनाडू आणि केरळमधील देशांतर्गत बाजारपेठांना शोभिवंत माशांचा पुरवठा केला जातो.

 

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2322570) अभ्यागत कक्ष : 4