संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एसआयडीएम चॅम्पियन पुरस्कार 2026 केले प्रदान, खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग, संशोधन आणि विकास गुंतवणूक तसेच संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केले आवाहन

“राष्ट्रीय सुरक्षा, आपल्या संरक्षण दलांना आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि उपकरणांची रचना, विकास, निर्मिती आणि नियंत्रण करण्याची देशाची क्षमता, यांवर अधिक अवलंबून आहे”- राजनाथ सिंह

“एक ऐतिहासिक टप्पा गाठत, भारताची संरक्षण निर्यात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 60% पेक्षा अधिक वाढ दर्शवते”- संरक्षण मंत्री

Posted On: 09 OCT 2026 7:23PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 09 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) च्या 8 व्या वार्षिक अधिवेशनात एसआयडीएम चॅम्पियन पुरस्कार 2026 प्रदान केले. या कार्यक्रमात एकूण 15 चॅम्पियन पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात स्वदेशी तंत्रज्ञान विकास, उत्पादन नवोन्मेष, डिझाइन, आयात पर्यायांची स्वदेशात निर्मिती, उत्पादन उत्कृष्टता आणि निर्यात या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थांना गौरवण्यात आले. संरक्षण मंत्र्यांनी स्वदेशी संरक्षण निर्मिती, तांत्रिक नवोन्मेष, डिझाइन क्षमता, आयातीला पर्याय निर्माण करणे, उत्पादन उत्कृष्टता आणि निर्यात या क्षेत्रांतील योगदानाबद्दल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
 
“सार्वभौम क्षमता, संघर्षमय सीमा क्षेत्र : स्थित्यंतराच्या काळात  भारताची सामरिक स्वायत्तता वेगाने साध्य करणे,” ही या अधिवेशनाची संकल्पना होती. राष्ट्रीय सुरक्षा ही देशाच्या संरक्षण दलांना आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि उपकरणांची रचना, विकास, निर्मिती आणि नियंत्रण राखण्याच्या क्षमतेवर अधिकाधिक अवलंबून आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी या अधिवेशनाच्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले. भारताची प्रतिभा, तरुण मनुष्यबळ, औद्योगिक क्षमता आणि धोरणात्मक पाठिंबा यांमुळे देश जगातील आघाडीच्या संरक्षण निर्मिती  करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत समाविष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
संरक्षण मंत्र्यांनी देशांतर्गत संरक्षण औद्योगिक परिसंस्था मजबूत करण्यात आणि धोरण-उद्योग संवाद सुलभ करण्यात एसआयडीएमच्या  भूमिकेची प्रशंसा केली. भारतीय संरक्षण उद्योगाला संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याचे, संशोधन आणि विकास  वाढवण्याचे, उत्पादन क्षमता वाढवण्याचे तसेच भारताची संरक्षण क्षेत्रातील सामरिक स्वायत्तता आणि आत्मनिर्भरता पुढे नेण्यासाठी तांत्रिक नवोन्मेषाला गती देण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख आयातदार ते अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा एक विश्वासार्ह, अवलंबून राहण्याजोगा निर्यातदार असा भारताच्या संरक्षण उद्योगाचा झालेला कायापालट ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.  भारताच्या संरक्षण निर्यातीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ₹38,424 कोटींचा विक्रम नोंदवला असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी 2029 पर्यंत संरक्षण निर्यातीत ₹50,000 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

खाजगी क्षेत्राच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना  राजनाथ सिंह यांनी भारताच्या एकूण संरक्षण उत्पादनातील खाजगी क्षेत्राचा वाटा सुमारे 24 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या  आपल्या पूर्वीच्या आवाहनाची आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षांत खाजगी क्षेत्राचे योगदान लक्षणीयरीत्या वाढले आहे, असे ते म्हणाले  आणि त्यांनी उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना हे सामायिक राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीशील टप्पे निश्चित करण्याचे आवाहन केले. सरकार नियमन, सुरक्षितता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्वाचे आवश्यक निकष राखून त्यांच्या विकासाला पाठबळ देणे सुरूच ठेवेल, असे त्यांनी उद्योगांना आश्वासन दिले.

युद्धाचे बदलते स्वरूप अधोरेखित करताना, आधुनिक संघर्ष हे ड्रोन, क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि वेगाने विकसित होणारे सॉफ्टवेअर व दळणवळण तंत्रज्ञानासह तांत्रिक क्षमतेवर वाढत्या प्रमाणात अवलंबून आहेत, असे निरीक्षण संरक्षणमंत्र्यांनी  नोंदवले.

 "संरक्षण उत्पादकांनी संशोधन आणि विकासावरील  खर्चाकडे एक

 अशी गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे जी तांत्रिक सिद्धता मजबूत

 करते, स्पर्धात्मकता सुधारते आणि राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देते,"

असे संरक्षणमंत्री म्हणाले.

***

Neha Kulkarni/ Sonali Kulkarni / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321617) अभ्यागत कक्ष : 8