विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान सर्वांसाठी अधिक सुलभ करण्यासाठी नागरिक-केंद्री, बहुभाषिक डीएसटी आणि एमओएसटी संकेतस्थळाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले उद्घाटन
नवीन पुनर्विकसित पोर्टल्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिक-केंद्रित शासनाच्या दूरदृष्टीचे आणि “लोकांद्वारे विज्ञान, लोकांसाठी विज्ञान” या तत्त्वाचे प्रतीक : डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
09 OCT 2026 4:55PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आज सुरू झालेली नव्याने विकसित संकेतस्थळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिक-केंद्रित शासनाच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. देशातील नागरिकांना वैज्ञानिक माहिती सुलभतेने उपलब्ध करून देणे, ती माहिती सर्वसमावेशक आणि उपयुक्त बनवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
“लोकांद्वारे विज्ञान, लोकांसाठी विज्ञान” हे या उपक्रमाचे मार्गदर्शक तत्त्व आहे, असे त्यांनी या उपक्रमाच्या सार्वजनिक मूल्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले. या उपक्रमात विज्ञान सर्वांसाठी उपलब्ध, सुलभ आणि परवडणारे बनवले जाणार आहे. वैज्ञानिक क्षेत्रे आणि उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रवाह सक्षम करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. यामुळे वापरकर्त्यांना एका सामान्य डिजिटल व्यासपीठाद्वारे त्यांच्या गरजेनुसार माहिती आणि संधी शोधता येतील, हे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी डिजिटल ब्रँड आयडेंटिटी मॅन्युअल (डीबीआयएम) 3.0 आणि गाईडलाईन्स फॉर इंडियन गव्हर्नमेंट वेबसाइट्स अँड ॲप्स (जीआयजीडब्ल्यू) 3.0 नुसार विकसित केलेल्या डीएसटीची नव्याने विकसित अधिकृत संकेतस्थळे, www.dst.gov.in आणि www.most.gov.in, यांचे उद्घाटन केले. याप्रसंगी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. उमेश व्ही. वाघमारे, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संकेतस्थळ विकास उपक्रमाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. या संकेतस्थळाच्या पुनर्विकासाचे काम विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) प्रकल्प व्यवस्थापन संघ आणि विकास संस्था यांनी संयुक्तपणे केले असून संकेतस्थळावरील मजकूर विभागाच्या अंतर्गत विभागांद्वारे संकलित आणि प्रमाणित करण्यात आला आहे.
हे प्लॅटफॉर्म विद्यार्थी, संशोधन फेलो, संशोधक, शैक्षणिक संस्था, नवोन्मेषक , स्टार्ट-अप्स, उद्योजक, प्रसारमाध्यम व्यावसायिक आणि नागरिकांना 'डीएसटी'च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या योजना, अनुदाने, फेलोशिप्स, वैज्ञानिक कार्यक्रम आणि इतर संधींपर्यंत 'एक खिडकी' प्रवेश उपलब्ध करून देऊन सेवा देईल, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. पुनर्रचित माहितीच्या संरचनेमुळे वापरकर्त्यांना पात्रता निकष, अर्ज मार्गदर्शक तत्त्वे, प्रस्तावांसाठीचे आवाहन, पुरस्कार, निकाल आणि अधिकृत सूचनांसह संबंधित माहिती अधिक चांगल्या प्रकारे शोधता येते. या संसाधनांना एका संरचनात्मक स्वरूपात एकत्र आणून, सरकारी माहिती शोधण्यासाठी लागणारे श्रम कमी करणे आणि भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान व्यवस्थेत सार्वजनिक सहभाग मजबूत करणे हा या पोर्टल्सचा उद्देश आहे.
या संकेतस्थळांवर 'डीएसटी'बद्दल माहिती, त्यांचे विभाग, कार्यक्रम आणि योजना, सेवा, संधी, दस्तऐवज, आणि बातम्या व ताजी माहिती यांसारख्या प्रमुख विभागांचा समावेश असलेली एक मानक माहिती संरचना आहे. एक संरचनात्मक योजना आणि ऑपॉर्च्युनिटी फाइंडर संशोधन आणि विकास निधी, प्रस्तावांसाठीचे आवाहन, पुरस्कार आणि अर्ज शोधणे सुलभ करतो; तर मध्यवर्ती दस्तऐवज भांडार असल्याने, तिथून मार्गदर्शक तत्त्वे, धोरणात्मक दस्तऐवज, अधिसूचना, अहवाल आणि प्रशासकीय अर्ज सहज उपलब्ध होऊ शकतील
डीएसटी विभागांच्या पुनर्रचित याद्या, संघटनात्मक क्रमवारी आणि अधिकाऱ्यांच्या संपर्काचा तपशील सुलभ दिशादर्शन आणि संबंधित संस्थात्मक माहिती मिळवण्यास उपयुक्त ठरेल. हे प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय भागधारकांसाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय विज्ञान व तंत्रज्ञान सहकार्याबद्दलची माहितीही उपलब्ध करेल.
'भाषिणी'चे एकात्मीकरण हे या नवीन संकेतस्थळांचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे 22 भाषांमध्ये मजकूर उपलब्ध होतो आणि विविध वाचकांपर्यंत वैज्ञानिक माहितीचा विस्तार होतो. या पोर्टल्समध्ये सार्वत्रिक सुलभतेची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये फॉन्टचा आकार बदलणे, हाय-कॉन्ट्रास्ट डिस्प्ले मोड, लिंक हायलाइटिंग, अक्षरांमधील अंतर (letter-spacing) व ओळींची उंची (line-height) समायोजित करणे आणि स्क्रीन-रीडर सुसंगतता यांचा समावेश आहे.




***
Neha Kulkarni / Radhika Aghor / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321580)
अभ्यागत कक्ष : 7