आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते भारत-यूके आरोग्य परिषद 2026 चे उद्घाटन, आयुष व्यावसायिकांसाठीच्या सुनियोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे केले स्वागत
Posted On:
09 OCT 2026 6:06PM by PIB Mumbai
पारंपरिक औषध प्रणालींना वैज्ञानिक संशोधन, योग्य वैद्यकीय पुरावे, गुणवत्ता मानके आणि जबाबदार सहयोग, याची जोड मिळाली, तर त्या जगभरात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सर्वांगीण आरोग्य अधिक बळकट करण्यात महत्वाचे योगदान देऊ शकतील, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सांगितले.

ते आज नवी दिल्ली येथे मारेंगो एशिया हॉस्पिटल्स आणि बीएपीआयओ (BAPIO) प्रशिक्षण अकादमी यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या ‘भारत-यूके आरोग्य परिषद 2026’ चे उद्घाटन करताना बोलत होते. ' ब्रिजिंग हेल्थकेअर, एज्युकेशन अँड इनोव्हेशन, अर्थात आरोग्यसेवा, शिक्षण आणि नवोन्मेश यांना जोडणे' ही या परिषदेची संकल्पना आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात भारत आणि युनायटेड किंगडममधील आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थात्मक प्रतिनिधी एकत्र येत आहेत.
आयुष व्यावसायिकांसाठीच्या सुनियोजित प्रशिक्षण आणि क्षमता-विकास उपक्रमाच्या शुभारंभाबद्दल जाधव यांनी आनंद व्यक्त केला. वैज्ञानिक संशोधन, योग्य वैद्यकीय पुरावे, गुणवत्तेचे निकष आणि जबाबदार सहयोग याच्या बळावर पारंपरिक औषध प्रणाली प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सर्वांगीण आरोग्यामध्ये महत्वाचे योगदान देऊ शकतील, असे ते म्हणाले.

या उपक्रमात आयुष पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी दोन सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अक्यूट केअर अँड इमर्जन्सी सपोर्ट प्रमाणपत्र आणि 'लाइफस्टाइल हेल्थ अँड वेल-बीइंग काउन्सिलिंग अँड प्रॅक्टिस' प्रमाणपत्र, या अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. संरचित अध्यापन आणि पर्यवेक्षणाखालील प्रात्यक्षिक, याद्वारे वैद्यकीय-सहाय्य कौशल्ये आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक समुपदेशन अधिक उत्तम करणे हे या कार्यक्रमांचे उद्दीष्ट आहे.
जाधव यांनी यावेळी दोन्ही देशांच्या परस्परपूरक क्षमतांवर प्रकाश टाकला. युकेचा क्लिनिकल गव्हर्नन्स, रुग्ण सुरक्षा आणि गुणवत्ता हमी यामधील अनुभव, तसेच भारताचे वैद्यक क्षेत्रातील कौशल्य, तांत्रिक नवोन्मेष आणि आरोग्यसेवा वितरण क्षमता यांचा मेळ घालून अधिक प्रभावी आणि उत्तरदायी आरोग्यसेवा प्रणाली उभारण्यात सहाय्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

जाधव यांनी आयोजक आणि सहभागी संस्थांचे अभिनंदन केले, तसेच, या परिषदेतील चर्चांचे फलित दोन्ही देशांच्या आरोग्यसेवा प्रणालींमधील शाश्वत भागीदारी आणि ठोस परिणामांमधून उमटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या परिषदेमुळे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील संस्थात्मक सहकार्य अधिक दृढ होईल, तसेच आरोग्यसेवा वितरणामध्ये नवोन्मेष, व्यावसायिक विकास आणि ज्ञानाचे आदानप्रदान यासाठी नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
***
Neha Kulkarni / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321571)
अभ्यागत कक्ष : 11