संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दलाने हिंडन हवाई तळावर साजरा केला 94 वा हवाई दल दिन

Posted On: 08 OCT 2026 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

भारतीय हवाई दलाने 08 ऑक्टोबर 2026 रोजी गाझियाबाद येथील हिंडन हवाई तळावर आपला 94 वा वर्धापन दिन साजरा केला. या प्रसंगी भारतीय हवाई दलाची तांत्रिक प्रगती, कुशलता, समृद्ध वारसा आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व परिचालनात्मक क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले. हवाई दल प्रमुख 'एयर चीफ मार्शल' एपी सिंग यांनी या हवाई दल दिन संचलनाची  पाहणी केली. या सोहळ्याला लष्करप्रमुख, नौदल प्रमुख, माजी हवाई दल प्रमुख आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय हवाई दलाची  अतुलनीय सेवा, निपुणता , समर्पण आणि राष्ट्राप्रति असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिक राष्ट्रपती  प्रेसिडेंट कलर्ससह संचलन करण्यात आले. हवाई दल प्रमुखांचे आगमन झाल्यावर, राष्ट्रध्वज आणि हवाई दलाचा ध्वज फडकवत 'ध्वज' फॉर्मेशनमध्ये आलेल्या तीन Mi-17 1V हेलिकॉप्टरद्वारे त्यांना हवाई सलामी देण्यात आली.

या संचलनाचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन मॅनिश शर्मा यांनी केले. संचलनानंतर पदक प्रदान सोहळा  झाला, यावेळी हवाई योद्ध्यांना शौर्य आणि उल्लेखनीय सेवेसाठी पदकांनी सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध युनिट्सना प्रशस्तीपत्रे  प्रदान करण्यात आली.

'भारतीय हवाई दल : अचूक, अभेद्य व लक्ष्यभेदी ही या वर्षीच्या हवाई दल दिनाची संकल्पना होती, जी भारतीय हवाई दलाची अचूकता, लवचिकता आणि सामरिक उत्कृष्टतेसह  राष्ट्राच्या आकाशाचे रक्षण करण्याची अढळ वचनबद्धता दर्शवते.

"हवाई शक्ती हे राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्याचे मुख्य माध्यम आहे," असे आपल्या संबोधनात हवाई दल प्रमुख  एयर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी अधोरेखित केले.

"भारतीय हवाई दल कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सदैव सतर्क, वचनबद्ध आणि तत्पर आहे,"असे  त्यांनी पुढे सांगितले. तसेच सैन्याची धोरणात्मक क्षमता आणि तयारी योग्य दिशेने वाटचाल करत असल्यावर त्यांनी  भर दिला.

हवाई दल प्रमुखांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "एखाद्या हवाई दलाकडे जगातील सर्वात प्रगत विमाने असू शकतात, परंतु त्याची खरी ताकद ही त्याच्या धोरणात्मक तयारीवरून  म्हणजेच जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ते किती वेगाने आणि आत्मविश्वासाने कारवाई करू शकते, यावरून मोजली जाते.

तंत्रज्ञानातील प्रगती आणि स्वावलंबनाबाबत भारतीय हवाई दलाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, "'आत्मनिर्भरता' हे आमचे मार्गदर्शक तत्त्व आहे." कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वायत्त प्रणालींसारख्या  उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करताना मानवी नियंत्रण व निर्णयप्रक्रिया नेहमी केंद्रस्थानी ठेवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

संचलनादरम्यान भारतीय हवाई दलाच्या विविध उपकरणांचे आणि शस्त्रास्त्रांचे एक स्थिर प्रदर्शन  आयोजित करण्यात आले होते. यामुळे उपस्थितांना आणि प्रसारमाध्यमांना हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेची प्रत्यक्ष माहिती मिळाली. या प्रदर्शनात लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स,जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, रडार यंत्रणा, वन-वे अटॅक अनमॅन्ड एरियल सिस्टीम्स  यांचा समावेश होता.

या प्रदर्शनातून भारतीय हवाई दलाचे 'मेक इन इंडिया' आणि स्वदेशी क्षमता विकासावरील निरंतर भर स्पष्टपणे दिसून आला.

निलिमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2321042) अभ्यागत कक्ष : 4