ऊर्जा मंत्रालय
20 व्या ईस्ट आशिया समिट ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत प्रादेशिक ऊर्जा सहकार्य आणि ऊर्जा सुरक्षा भारताकडून अधोरेखित
Posted On:
08 OCT 2026 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026
फिलिपिन्समधील मनिला येथे आज झालेल्या 20 व्या 'ईस्ट आशिया समिट' ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीला संबोधित करताना, नाईक यांनी प्रादेशिक ऊर्जा सहकार्य आणि ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासोबतच, सुरक्षित, लवचिक, परवडणारे आणि शाश्वत ऊर्जा भविष्य घडवण्याप्रति भारताच्या कटिबद्धतेवर भर दिला.

भारताचे 'ॲक्ट ईस्ट धोरण' आणि आसियानसोबतची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधोरेखित करत, मंत्र्यांनी 'आसियान ऊर्जा सहकार्य कृती योजना 2026–2030' चे स्वागत केले. तसेच, 'आसियान-भारत कृती योजना 2026–2030 अंतर्गत सहकार्यावर भर दिला, ज्यामध्ये आसियान पॉवर ग्रिड, प्रादेशिक वीज पारेषण, बहुपक्षीय वीज व्यापार, स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा यांचा समावेश आहे. ग्रिड कनेक्टिव्हिटीसंबंधी 400 व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन 'आसियान पॉवर ग्रिड' उपक्रमाला पाठिंबा देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मधील 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत केलेल्या घोषणेचीही त्यांनी आठवण करून दिली.
_20261008142949_a0c144.jpeg)
नाईक यांनी भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील लक्षणीय प्रगतीकडे लक्ष वेधले. 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत स्थापित वीज निर्मिती क्षमता 558.8 गिगावॅटवर पोहोचली असून, त्यात 308 गिगावॅट बिगर-जीवाश्म क्षमतेचा समावेश आहे, जी एकूण स्थापित क्षमतेच्या 55% आहे. त्यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेअंतर्गत झालेली प्रगती देखील अधोरेखित केली, ज्या अंतर्गत 29 सप्टेंबर 2026 पर्यंत अंदाजे 5.01 दशलक्ष रुफटॉप सोलर उभारणीचा लाभ 5.95 दशलक्ष घरांना झाला आहे. त्यांनी नमूद केले की, भारताने 2030 एनडीसी लक्ष्याच्या पाच वर्षे आधीच, जून 2025 मध्ये बिगर-जीवाश्म स्रोतांपासून एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या 50 टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
प्रादेशिक आंतर -जोडणीबाबत बोलताना नाईक यांनी सांगितले की, भारत आणि सिंगापूर 2,000 मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित सीमेपार वीज जोडणीसाठी विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. विचाराधीन असलेल्या पर्यायांपैकी एक म्हणजे जमिनीवरून जाणारा सुमारे 3,000 किमी लांबीचा पारेषण मार्ग , जो भारतातील इम्फाळला म्यानमार, थायलंड आणि मलेशिया मार्गे सिंगापूरशी जोडेल. या प्रस्तावित जोडणीमुळे सीमेपार वीज व्यापार सुरळीत होण्यास, स्वच्छ ऊर्जेचा समावेश करण्यास आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यास मदत होऊ शकेल.
ऊर्जा मंत्र्यांनी ईएएस सहभागी देशांसोबत मोठ्या प्रमाणावरील नवीकरणीय ऊर्जा वापर, ग्रिड एकीकरण, पारेषण नियोजन, ऊर्जा साठवण, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान या क्षेत्रामधील आपला अनुभव सामायिक करण्याची भारताची तयारी दर्शवली. त्यांनी आसियान ऊर्जा केंद्र आणि एनटीपीसी,पॉवरग्रिड, सीईए , एनआयडब्ल्यूई , एनआयएसई व एनपीटीआय यांसारख्या भारतीय संस्थांमध्ये अधिक संस्थात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहनही केले.
नाईक यांनी धोरणात्मक पेट्रोलियम साठे, आपत्कालीन तयारी, विद्युत प्रणालीची लवचिकता, एलएनजी आणि गॅस पुरवठा सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा पूर्वानुमान , बॅटरी ऊर्जा साठवण, हरित हायड्रोजन आणि इतर उदयोन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींची रूपरेषाही मांडली. सहभागी देशांचे प्राधान्यक्रम आणि परिस्थिती लक्षात घेऊन, सीसीयूएस (CCUS) आणि कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेवर आसियान भागीदारांसोबत ज्ञानाचे आदान-प्रदान आणि सहकार्यामध्ये भारताला रुची असल्याचेही नमूद केले.
आसियान पॉवर ग्रिडवरील वर्धित सामंजस्य करार कार्यान्वित करण्याच्या आणि बहुपक्षीय वीज व्यापार अधिक दृढ करण्याच्या आसियानच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
निलिमा चितळे/सुषमा काणे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320853)
अभ्यागत कक्ष : 4