आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष सेवा क्षेत्रातील एकूण कार्यबळात महिलांचा वाटा 43%; अनेक संघटित विभागांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 50% पेक्षा अधिक


रुग्णालये, डे-केअर केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 50%हून अधिक

आयुष सेवा क्षेत्र 17.6 लाख लोकांना उपजीविकेचे साधन पुरवत आहे; रोजगार आणि आर्थिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण इंजिन म्हणून हे क्षेत्र उदयास आले आहे

Posted On: 08 OCT 2026 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

आयुष सेवा क्षेत्राच्या अलीकडील मूल्यांकनानुसार, हे क्षेत्र महिलांच्या कार्यबलातील सहभागासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून उदयास येत असून अनेक संघटित विभागांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 50 टक्क्यांहून अधिक आहे. आयुष सेवा क्षेत्रातील एकूण कार्यबळात महिलांचे प्रमाण 43 टक्के असून, रुग्णालये, डे-केअर केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि वेलनेस केंद्रांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व 50 टक्क्यांहून अधिक  आहे.

‘आयुष’ सेवा अर्थव्यवस्थेत आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी यांचा समावेश आहे. आयुष सेवा क्षेत्राचे मूल्य 2024-25 या आर्थिक वर्षात 36.92 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके असल्याचा अंदाज आहे; 2022-23 या आर्थिक वर्षापासून या क्षेत्राने 16.91 टक्के इतका दमदार चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (CAGR) नोंदवला आहे. हे क्षेत्र आरोग्यसेवा, आरोग्य व कल्याण, शिक्षण आणि संबंधित सेवांच्या माध्यमातून अंदाजे 17.6 लाख लोकांच्या उपजीविकेला प्रत्यक्ष आधार देते.

आयुष क्षेत्रातील रोजगाराची क्षमता अधोरेखित करताना, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पुनरुच्चार केला की, “आयुष सेवा क्षेत्राचा वाढता विस्तार आरोग्यसेवा, आरोग्य व कल्याण, शिक्षण आणि संबंधित सेवांच्या क्षेत्रात अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. या क्षेत्राचा विस्तार केवळ भारताची आरोग्यसेवा परिसंस्थाच बळकट करत नाही, तर उद्योजकता, कौशल्य विकास आणि कार्यबलामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठीही नवीन संधी उपलब्ध करून देत आहे.”

‘आयुर्वेद दिन 2026’ निमित्त आरआयएस - RIS द्वारे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आयुष सेवा क्षेत्र अहवाला’नुसार, संघटित आयुष संस्थांमध्ये महिलांचा सहभाग विशेषतः लक्षणीय आहे. यामध्ये स्पा आणि वेलनेस रिसॉर्ट्समध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 60 टक्क्यांहून अधिक आहे, तर शैक्षणिक संस्थांमध्ये ते 58 टक्के, डे-केअर केंद्रांमध्ये 57 टक्के आणि रुग्णालयांमध्ये 53 टक्के इतके आहे.

हे निष्कर्ष आरोग्यसेवा, शिक्षण, वेलनेस आणि संबंधित सेवांसह आयुष सेवा क्षेत्रातील विविध विभागांमध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करतात. स्थानिक आणि स्वतंत्रपणे संचालित क्लिनिक्समध्ये दहा लाखांहून अधिक लोकांचा रोजगार सामावलेला आहे, जे शहरी आणि ग्रामीण भागांमधील या क्षेत्राचा रोजगार निर्मितीमधील व्यापक प्रभाव दर्शवते.

“दर्जा निश्चित करणारे उत्कृष्ट मापदंड, कौशल्य विकास, डिजिटल पायाभूत सुविधा आणि अधिक मजबूत संस्थात्मक जाळ्यांच्या पाठबळाने संघटित आयुष सेवांचा विस्तार केल्यास रोजगाराचे प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, यावर आयुष वैद्य मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी भर दिला. संघटित आयुष संस्थांमधून (केंद्रामधून) महिलांचा वाढलेला सहभाग हा सर्वसमावेशक आर्थिक विकासात योगदान देण्याची या क्षेत्राची क्षमता देखील दर्शवतो.”

स्वतंत्र दवाखाने हा सर्वाधिक महसूल मिळवणारा विभाग असून,तो अंदाजे 16.21 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा क्षेत्राच्या एकूण महसुलाच्या 43.9 टक्के योगदान देतो, तर दैनंदिन रूग्णकाळजीकक्षांचा (डे-केअर सेंटर्स) वाटा आणखी 10.13 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. एकत्रितपणे, हे दोन्ही विभाग क्षेत्राच्या एकूण महसुलात 70 टक्क्यांहून अधिक योगदान देतात. आयुर्वेद ही सर्वात मोठी स्वतंत्र उपचार प्रणाली असून, तिचा वाटा 17.73 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा एकूण आयुष सेवांच्या सुमारे 48 टक्के आहे.

निरामय आरोग्यरक्षण (वेलनेस) क्षेत्रात विशेष करून अधिकाधिक वाढ दिसून येत असून, 21.29 टक्के सीएजीआर नोंदवला गेला आहे; दरम्यान, योग केंद्रांनी दोन वर्षांत सुमारे 75 टक्के महसूली वाढ नोंदवली आहे, जे प्रतिबंधात्मक आरोग्य आणि वेलनेस सेवांची वाढती मागणी दर्शवते.

वैद्यकीय मूल्य पर्यटन (मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल, MVT) यामध्ये देखील या क्षेत्राला गती मिळत असून, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये यातून अंदाजे 1.77अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई होईल. आंतरराष्ट्रीय रुग्ण, जरी एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे 5 टक्के असले तरी, रुग्णालयाच्या महसुलात अंदाजे 15-25 टक्के योगदान देतात, आणि त्यांच्या उपचाराच्या कार्यक्रमांमध्ये साधारणपणे 5 ते 11 दिवसांचा मुक्काम असतो.

या मूल्यांकनानुसार,2047 पर्यंत आयुष सेवा क्षेत्र आर्थिक वर्ष 2024-25 मधील 36.92 अब्ज अमेरिकन डॉलरवरून अंदाजे 216–318 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत विस्तारण्याचा अंदाज आहे. यामध्ये आरोग्यसेवा, आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय प्रवास, संशोधन, डिजिटल आरोग्य आणि संलग्न सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे.

संघटित आयुष संस्थांमधील महिलांचे वाढते प्रतिनिधित्व, तसेच या क्षेत्रातील विस्तारणारा आर्थिक आणि रोजगाराचा ठसा, महिलांचा आर्थिक सहभाग, सर्वसमावेशक विकास हा ‘विकसित भारत@2047’ च्या दिशेने भारताच्या व्यापक विकासाच्या प्रवासात योगदान देण्याची या क्षेत्राची क्षमता अधोरेखित करतो.

नितीन फुल्लुके /सुषमा काणे /संपदा पाटगावकर /प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2320818) अभ्यागत कक्ष : 6