विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला मिळाले बळ


केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलीन यांच्यात द्विपक्षीय बैठकीचे आयोजन

विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील दीर्घकालीन सहकार्य वाढवण्यावर विशेष भर

भारत-स्विस संशोधन भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी स्वित्झर्लंडकडून 45 दशलक्ष स्विस फ्रँक इतक्या निधीची तरतूद

Posted On: 06 OCT 2026 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे स्विस कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात भारत-स्वित्झर्लंड यांच्यातील दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय भागीदारीला अधिक रचनात्मक आणि दीर्घकालीन टप्प्यावर नेण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. यामध्ये परस्पर हिताच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संस्थात्मक सहभाग आणि सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी अधिकाधिक आंतरविद्याशाखीय आणि मिशन-मोड दृष्टिकोन अवलंबत आहे, यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांद्वारे विविध विद्याशाखा आणि मंत्रालयांमधील कौशल्य एकत्र आणले जाते. त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून न पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये योगदान देण्याची क्षमता असलेले एक 'सक्षम करणारे साधन' म्हणून पाहिले जात आहे.

भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विस्तारणाऱ्या प्राधान्यक्रमांचा संदर्भ देत, त्यांनी जैवतंत्रज्ञान, लस विकास, जीनोम सिक्वेन्सिंग, क्वांटम तंत्रज्ञान, तसेच अंतराळ आणि खोल महासागर संशोधन या क्षेत्रांमधील देशाच्या कामांबद्दल तसेच नील अर्थव्यवस्था आणि जैव-अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख संधींबद्दल माहिती दिली.

संशोधन, नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम जारी राखू  शकतील, असे ते म्हणाले.

स्वित्झर्लंड, भारताकडे संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रातील वेगाने उदयाला येणारी जागतिक शक्ती म्हणून पाहत असून, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील पसंतीचा दीर्घकालीन भागीदार बनविण्याचे उद्दिष्ट बाळगत असल्याचे पार्मेलिन यांनी सांगितले.

अध्यक्ष पार्मेलीन यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडने या भागीदारीसाठी आणखी 45 दशलक्ष स्विस फ्रँक निर्धारित केले  आहेत. भारत-स्विस संयुक्त संशोधन चौकट अधिक बळकट आणि दृढ करण्यासाठी भारताकडूनही अशाच प्रकारच्या वचनबद्धतेची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देश आपल्या दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारीच्या बळावर आणि एकत्र काम करून बरेच काही साध्य करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही बाजूंनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिच्या व्यापक उपयोगांवरही चर्चा केली, यावेळी पार्मेलिन यांनी 'ग्लोबल साउथ'मधील देशांना एआयचा फायदा होईल हे सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी भारताला आगामी जिनिव्हा एआय शिखर परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रणही दिले. उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि जागतिक महत्त्व असलेल्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याच्या सामायिक स्वारस्याचे हे प्रतिबिंब आहे.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आणि स्वित्झर्लंड आपल्यातील सौहार्दपूर्ण आणि दीर्घकालीन संबंधांच्या आधारावर, परस्पर सहकार्य कायम राखण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय उपक्रमांचा सातत्याने पाठपुरावा सुनिश्चित करण्यासाठी एक नियमित कार्य-व्यवस्था प्रस्थापित करू शकतात. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करून दोन्ही देश आपली भागीदारी अधिक दृढ करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

        


(Release ID: 2319819) अभ्यागत कक्ष : 7