आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एम्स बिलासपूरच्या पहिल्या ऐतिहासिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींचे संबोधन


वैद्यकीय क्षेत्र हे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नाही, तर ते करुणा आणि विश्वासाचेही क्षेत्र - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत 16 नवीन एम्सची स्थापना: केंद्रीय आरोग्यमंत्री

Posted On: 06 OCT 2026 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था' (एम्स) बिलासपूरच्या पहिल्या दीक्षांत समारंभात पदवीधरांच्या पहिल्या तुकडीला पदव्या प्रदान केल्या. हा प्रसंग या संस्थेच्या प्रगतीतला आणि देशातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवेतील तिच्या योगदानातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी 'आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'च्या भूमिकेवर भर दिला. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळते, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील वैद्यकीय खर्चाचा ताण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. यासोबतच, एम्ससारख्या अग्रगण्य संस्थांनी मूलभूत आणि किफायतशीर आरोग्य सेवांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतींनी पदवीधरांना आयुष्यभर विद्यार्थीवृत्ती जपत नवीन गोष्टी शिकत राहण्याचे आवाहन केले. वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या पद्धती आणि आरोग्यसेवांच्या आव्हानांशी सुसंगत राहण्याचा तसेच संशोधनाचे रूपांतर लोकांचे जीवन सुकर करणाऱ्या नवोपक्रमांमध्ये करण्याचा सल्ला त्यांनी दिला. वैद्यकीय क्षेत्र हे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून, ते मूलतः करुणा आणि विश्वासाचे क्षेत्र असल्याचे त्या म्हणाल्या. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी यावेळी बोलताना, देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारावर प्रकाश टाकला.देशात अनेक दशके केवळ एकच एम्स होते मात्र  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत 16 नवीन एम्सची स्थापना झाली. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 384 वरून 800 हून अधिक झाली आहे, तर पदवीस्तरावरील वैद्यकीय जागा 51,348 वरून वाढून 1.42 लाखांवर पोहोचल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 2029 पर्यंत वैद्यकीय शिक्षणामध्ये 75,000 नवीन पदवी व पदव्युत्तर जागा निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे; यामध्ये अतिरिक्त 10,000 एमबीबीएस व पदव्युत्तर जागांच्या निर्मितीसाठी 15,000 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. 

या सोहळ्यात एकूण 92 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच, राष्ट्रपतींच्या हस्ते विविध विषयांमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

एम्स बिलासपूरविषयी

एम्स बिलासपूरने जानेवारी 2021 मध्ये आपल्या एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीच्या प्रवेशासह शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ केला. त्यानंतर 2022 मध्ये 'अलाईड हेल्थकेअर सायन्सेस' आणि 'नर्सिंग सायन्सेस'च्या पहिल्या तुकड्यांचे अध्यापन सुरू झाले. ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या संस्थेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून ही संस्था आपली शैक्षणिक, वैद्यकीय उपचार आणि संशोधन क्षेत्रातील क्षमता सातत्याने विस्तारत आहे.

निलिमा चितळे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर 


 
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


        


(Release ID: 2319804) अभ्यागत कक्ष : 9