संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एचएएल कोरापूटकडून 2,000 वे एरो इंजिन सुपूर्त,प्रपल्शन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सहा दशकांची पूर्तता


प्रगत एरो-इंजिनच्या स्वदेशी आरेखन, विकास, चाचणी आणि निर्मितीला बळकटी देण्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन

Posted On: 06 OCT 2026 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कोरापूट विभागाकडून 06 ऑक्टोबर 2026 रोजी 2,000 वे एरो इंजिन सुपूर्त करण्यात आले आणि शक्ती इंजिनसाठी दुसऱ्या उत्पादन उपक्रमाची घोषणा करण्यात आली.भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातील प्रवासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे नमूद करत, संरक्षणमंत्र्यांनी प्रगत एरो-इंजिन्सचे आरेखन, विकास, चाचणी, निर्मिती आणि देखभाल यांमधील स्वदेशी क्षमता बळकट करण्याचे आवाहन केले.तसेच एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी प्रपल्शन(प्रणोदन) तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राजनाथ सिंह यांनी यावेळी एचएएल  कोरापुटचे अभियंते, तंत्रज्ञ, वैज्ञानिक आणि कुशल कार्यदलाचे अभिनंदन केले.2,000 इंजिनचे वितरण म्हणजे संरक्षण दलांच्या परिचालन क्षमतेत 2,000 महत्त्वपूर्ण योगदाने असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 1964 मध्ये या विभागाची स्थापना झाल्यापासूनच्या सहा दशकांमधील अभियांत्रिकी नैपुण्य आणि तांत्रिक अनुभव यांचे हे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. 

लष्कराच्या हवाई विभागात एचएएल कोरापूटचे असलेले योगदान संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले.  एचएएल कोरापूटच्या इंजिननी मिग-21, मिग-27, मिग-29 आणि एसयू-30एमकेआय यांसारख्या आघाडीच्या विमानांना बळ दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी एचएएल कोरापुटच्या स्वदेशी दुरुस्ती आणि ओव्हरहॉल क्षमतेचे कौतुक केले. एचएएल कोरापूटने आतापर्यंत 9,000 हून अधिक इंजिन्सची ओव्हरहॉल प्रक्रिया केली आहे. आवश्यक  घटकांची देशात निर्मिती आणि कमी झालेला टर्नअराउंड कालावधी,  महत्त्वपूर्ण संरक्षण साधनांची परिचालन सज्जता आणि सेवेतील त्यांचा कालावधी वाढवण्यासाठी योगदान देत आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. 

एरो इंजिनचे वर्णन विमानाचे हृदय असे करून राजनाथ सिंह यांनी प्रगत एअरफ्रेम्स, रडार, शस्त्रे आणि एव्हीओनिक्सचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी विश्वसनीय प्रणोदन प्रणाली (प्रपल्शन) अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. 

आत्मनिर्भरतेवर भर देत संरक्षणमंत्र्यांनी स्वदेशी एरो इंजिन क्षमतेचे महत्त्व सांगितले. विशेषतः प्रगत मध्यम लढाऊ विमानांसाठी त्यांचे असलेले महत्त्व त्यांनी विशद केले. 

एचएएल 335 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह  AL-31FP इंजिन्सची वार्षिक उत्पादन क्षमता 30 वरून 50  वर वाढवत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी घोषित केले.  त्यांनी 218 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह शक्ती इंजिनच्या दुसऱ्या उत्पादन उपक्रमाची घोषणा केली. या नव्या प्रॉडक्शन लाईनमधून वर्षाला 100 इंजिन्सपर्यंत निर्मिती केली जाईल. ध्रुव प्रगत हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर, प्रचंड हे हलके लढाऊ हेलिकॉप्टर यांसह स्वदेशी हेलिकॉप्टर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2028-29 पर्यंत ती पूर्ण स्थापित करण्याचे नियोजन आहे. 

देशाच्या हेलिकॉप्टर क्षेत्रासाठी विश्वासार्ह स्वदेशी प्रणोदनाच्या आवश्यकतेवर भर देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, संरक्षण दलांना गरजेला उपलब्ध होतील अशा इंजिन्सची, संपूर्ण कालावधीत साहाय्य मिळू शकणाऱ्या आणि अद्ययावत तंत्रज्ञानासोबत अद्ययावत होऊ शकतील अशा इंजिन्सची आवश्यकता आहे. एरो इंजिन विकास हा प्रदीर्घ प्रयत्न असून त्यासाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक, विशेष चाचणी, कुशल मनुष्यबळ आणि एक मजबूत औद्योगिक परिसंस्था आवश्यक आहे, ज्यामध्ये पुनरावृत्तीयोग्य, विश्वसनीय आणि विस्तारक्षम उत्पादन, रचना, महत्त्वपूर्ण सामग्री आणि सुपरअलॉय यांवर लक्ष केंद्रित केले जाते.

प्रणोदन परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, खासगी उद्योग, शैक्षणिक आणि संशोधन संस्था यांच्या अधिकाधिक समावेशाचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केले. 

निलिमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 

 


(Release ID: 2319799) अभ्यागत कक्ष : 9