आयुष मंत्रालय
महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता वाढवण्यासाठी लोणार येथे सूर्यकिरण एअर शो आयोजित करण्याची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी
आयुष मंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना 23 ते 25 नोव्हेंबरदरम्यान लोणार, अजिंठा आणि वेरूळ येथे एअर शो आयोजित करण्याबाबत विचार करण्याची विनंती केली
Posted On:
01 OCT 2026 3:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2026
आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना महाराष्ट्रातील लोणार सरोवरासह प्रमुख पर्यटन स्थळांवर 23 ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक डिस्प्ले टीमचे हवाई प्रात्यक्षिक आयोजित करण्याबाबत विचार करण्याची विनंती केली आहे.
संरक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात प्रतापराव जाधव यांनी सूर्यकिरण टीमच्या अचूकता, कौशल्य आणि समन्वयपूर्ण हवाई कसरतींसाठी असलेल्या लौकिकाचा उल्लेख केला. या प्रात्यक्षिकांमधून भारताची विमान वाहतूक क्षमता प्रदर्शित होते, तसेच जनतेमध्ये उत्सुकता निर्माण होऊन युवकांना भारतीय हवाई दलातील संधींचा शोध घेण्यासाठी प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
प्रतापराव जाधव यांनी विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील ही अद्वितीय नैसर्गिक निर्मिती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करते. हे सरोवर खारे आणि अल्कधर्मी पाण्यासाठी तसेच वैशिष्ट्यपूर्ण विवराच्या भूदृश्यासाठी प्रसिद्ध आहे.
मंत्र्यांनी जागतिक स्तरावर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांकडेही लक्ष वेधले. या दोन्ही स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे.
23, 24 किंवा 25 नोव्हेंबर 2026 यापैकी कोणत्याही दिवशी लोणार, अजिंठा आणि वेरूळ येथे सूर्यकिरण एरोबॅटिक डिस्प्लेचे हवाई प्रात्यक्षिक आणि त्यासोबत प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक मंजुरी देऊन संबंधित प्राधिकरणांना योग्य निर्देश देण्याची विनंती प्रतापराव जाधव यांनी संरक्षण मंत्रालयाला केली आहे.
प्रस्तावित एअर शोचा उद्देश या पर्यटन स्थळांना एक वेगळे सार्वजनिक आकर्षण मिळवून देण्यासोबतच भारताचे विमान वाहतूक क्षेत्रातील उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शित करणे आणि महाराष्ट्रातील समृद्ध नैसर्गिक, सांस्कृतिक आणि वारसा पर्यटन क्षमतेला अधोरेखित करणे हा आहे.
* * *
नितीन फुल्लुके/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2317609)
अभ्यागत कक्ष : 6