नागरी उड्डाण मंत्रालय
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते रूट्स एशिया 2027 च्या कर्टन रेजरचे अनावरण
Posted On:
29 SEP 2026 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज नवी दिल्ली इथे होणार असलेल्या रूट्स एशिया 2027 (Routes Asia 2027) या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक परिषदेच्या कर्टन रेझरचे (परिषदेची रुपरेषा मांडणारा कार्यक्रम) अनावरण केले. हा कार्यक्रम विमान उड्डाण क्षेत्राशी संबंधित या प्रतिष्ठेच्या जागतिक परिषदेच्या आयोजनासाठी देशात सुरु असलेल्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या कार्यक्रमाला 28 दूतावासांचे प्रतिनिधी आणि विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमुख भागधारक उपस्थित होते. त्यांच्या या सहभागातून रूट्स एशिया 2027 बाबत जगभरात वाढत असलेली उत्सुकता आणि सहकार्याच्या संधी अधोरेखित झाल्या आहेत.

रूट्स एशिया या परिषदेचे 24 वे पर्व 16 ते 18 मार्च 2027 या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित केले जाणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने आशियासह जगभरातील 115 पेक्षा जास्त प्रमुख विमान कंपन्या, 55 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, विमानतळ, पर्यटन प्राधिकरणे आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील भागधारक एकत्र येणार आहेत.
कर्टन रेझरच्या फलकाचे अनावरण केल्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या संवादातून त्यांनी या परिषदेची भारत ॲव्हिएशन रायझिंग : इनक्लुसिव्ह ग्रोथ - कनेक्टिंग एशिया अँड बियाँड अर्थात, झेप घेणारे भारतीय हवाई क्षेत्र : सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून आशियासह जगभरासोबत कनेक्टिव्हीटी ही संकल्पना, आणि त्याअंतर्गतचा भारताचा दृष्टिकोन मांडला. ही परिषद योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य संधीसह भारतात आयोजित होत असल्याचे ते म्हणाले. आजमितीला हवाई क्षेत्राच्या अनुषंगाने अधिक क्षमता, अधिक विमान कंपन्या आणि अधिक हवाई मार्गांसाठी वाव असल्याची बाब त्यांनी नमूद केली.

देशातले नागरी विमान वाहतूक क्षेत्र वेगाने विस्तारत असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात सध्या 166 पेक्षा जास्त कार्यरत विमानतळे आहेत, यासोबतच पुढील दशकात आणखी 100 नवीन विमानतळ विकसित करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. हब अँड स्पोक मॉडेलचे वाढते महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. या मॉडेलच्या माध्यमातून विस्तारत असलेल्या वाढत्या बाजारपेठांसोबत अधिक शहरे आणि लोकांना जोडले जाऊ शकते. यामुळे विमान कंपन्या, पर्यटन आणि एकूण आर्थिक विकासासाठी मोठ्या संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.

जागतिक विमान वाहतूक समुदायाने रूट्स एशिया 2027 मध्ये सहभागी व्हावे तसेच, देशातील विविध पर्यटन स्थळे आणि विस्तारणाऱ्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील संधींच्या शक्यता चाचपडून पाहाव्यात असे आवाहनही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी केले. टियर-2 अंतर्गत येत असलेल्या शहरांना जोडणे, आंतरराष्ट्रीय केंद्राला अधिक बळकटी देणे आणि देशाच्याच्या नागरी विमान वाहतुकीचा नवा अध्याय रचणारे नवीन मार्ग विकसित करण्यासाठी सर्व भागधारकांचे सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316711)
अभ्यागत कक्ष : 9