संरक्षण मंत्रालय
'तरंग शक्ती 2026' सराव: "भागीदारीतले सामर्थ्य"
भारतीय हवाई दलाच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली टप्प्याला जोधपूर इथे सुरुवात
Posted On:
27 SEP 2026 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
काल संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यानंतर, भारतीय हवाई दल जोधपूर इथल्या हवाई दलाच्या तळावर 'तरंग शक्ती 2026' सरावाच्या कार्यप्रणाली टप्प्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहे. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या बहुपक्षीय हवाई सरावाची संकल्पना "भागीदारीतले सामर्थ्य" ही असून, एकत्र काम करण्यातून, एकमेकांचे अनुभव सामायिक करण्यातून आणि भागीदार हवाई दलांमध्ये परस्पर कार्यक्षमता निर्माण करण्यातून मिळणाऱ्या शक्तीवर या संकल्पनेचा भर आहे.
_20260927164644_0c8067.jpeg)
या सरावात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, श्रीलंका आणि बांग्लादेश ही सात परदेशी मित्र राष्ट्रे सहभागी होत आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी विमानांमध्ये एफ-35 लाईटनिंग II, राफेल, एफ-16, ए400एस, एमआरटीटी, सी-130, सी-130जे आणि केसी-30ए यांचा समावेश असून, यात लढाऊ, हवाई वाहतूक आणि हवेतल्या हवेत इंधन भरणाऱ्या विविध प्रकारच्या विमानांचा समन्वय दिसून येत आहे.
2024 मध्ये झालेल्या पहिल्या यशस्वी कार्यक्रमाच्या आधारावर, 'तरंग शक्ती 2026' सरावातून सहभागी हवाई दलांना प्रगत संयुक्त प्रशिक्षण, कार्यप्रणालीविषयक अनुभवांची देवाणघेवाण आणि व्यावसायिक अनुभवांचे एकत्रीकरण करण्याची संधी मिळणार आहे. सहभागी तुकड्या भारतीय हवाई दलासोबत काम करतील. त्या विविध मोहिमांमध्ये आघाडीच्या लढाऊ विमानांचा आणि सहाय्यक यंत्रणांचा वापर करतील. इतर अनेक मित्र देश निरीक्षक म्हणून या सरावात सहभागी होणार आहेत.
_20260927164741_1127f9.jpeg)
या सरावामुळे वैमानिक, मोहीम नियोजक आणि कार्यप्रणाली सहाय्यक कर्मचाऱ्यांमधला व्यावसायिक संवाद सुलभ होईल. त्यामध्ये परस्पर कार्यक्षमता, परस्पर शिक्षण, हवाई अवकाश सुरक्षितता आणि कार्यप्रणालीच्या पद्धतींचे सखोल भान यावर भर दिला जाणार आहे. या संवादामुळे सहभागी दलांना एकत्र काम करण्याची, अनुभव सामायिक करण्याची आणि एकमेकांच्या क्षमता आणि कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल.
तरंग शक्तीची ही आवृत्ती केवळ उड्डाण कारवायांपुरती मर्यादित न राहता अधिक व्यापक आहे. त्यामध्ये सरावादरम्यान विविध व्यावसायिक, सांस्कृतिक आणि संपर्क उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये समर्पित चर्चासत्र, सहभागी परदेशी तुकड्यांसाठी औद्योगिक दौरा, सेखॉन मॅरेथॉन, वारसा दौरे आणि योग सत्रांचा समावेश आहे. हे उपक्रम व्यावसायिक देवाणघेवाण, भारताच्या एरोस्पेस आणि औद्योगिक परिसंस्थेची ओळख तसेच सहभागी तुकड्यांमध्ये अधिक संवाद व आपुलकी निर्माण करण्याची संधी देतील.

'तरंग शक्ती 2026' सरावातून भारतीय हवाई दलाला आपल्या कार्यप्रणालीची क्षमता, व्यावसायिक मानके आणि संस्थात्मक मूल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे, तसेच भारताच्या वाढत्या स्वदेशी हवाई अवकाश आणि संरक्षण क्षमतांचेही यातून प्रदर्शन घडेल. "भागीदारीतले सामर्थ्य" या संकल्पनेवर आधारित या सरावातून सहभागी हवाई दलांमध्ये शाश्वत भागीदारी निर्माण करण्यासाठी सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर विश्वासाचे महत्त्व अधोरेखित होते.
हा सराव प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेच्या समर्थनासाठी रचनात्मक संरक्षण सहभाग आणि वाढत्या लष्करी सहकार्याविषयी भारताच्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे, तसेच या सरावामुळे सामायिक कार्यप्रणालीच्या अनुभवातून भागीदारीला बळकटी मिळेल आणि अधिक धोरणात्मक सहकार्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.


* * *
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315584)
अभ्यागत कक्ष : 9