वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशातील वाढत्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी केल्या अधोरेखित
Posted On:
27 SEP 2026 3:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठा भारतासाठी खुल्या होत असताना उत्तर प्रदेशातल्या उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अधोरेखित केले. निर्यात, गुंतवणूक आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेशाचा विस्तार केला तर राज्याच्या 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टाला हातभार लागेल, असे त्यांनी उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडा इथे यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोला संबोधित करताना सांगितले.
जगभरातून भारतात नवी गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे आणि अनुकूल औद्योगिक धोरणे तसेच तत्पर औद्योगिक योजनांच्या पाठबळामुळे उत्तर प्रदेश हे एक पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले आहे, असे गोयल म्हणाले. विविध क्षेत्रांमध्ये प्रमुख कॉर्पोरेट्स आणि जागतिक गुंतवणूकदार येत असून त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय उद्योग आणि उत्तर प्रदेशातल्या तरुणांचे विकसित होत असलेली कारागिरी आणि तांत्रिक कौशल्य यांच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. मोठे आंतरराष्ट्रीय उपक्रम जागतिक बाजारपेठेत थेट प्रवेश मिळवण्याची संधी देतात, त्यामुळे उत्तर प्रदेशातली विविध उत्पादने, खाद्यसंस्कृती आणि सेवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास सक्षम होतात, असे ते म्हणाले.
गोयल यांनी यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमधल्या आंतरराष्ट्रीय सहभागावर प्रकाश टाकला. यामध्ये 6 भागीदार देश, शेकडो प्रतिनिधी आणि प्रदर्शक आणि खरेदीदार-विक्रेते यांच्या बैठकांचा समावेश आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय भागधारकांच्या सहभागाची आणि या कार्यक्रमाद्वारे व्यवसायांसाठी निर्माण झालेल्या संधींची नोंद घेतली.
उत्तर प्रदेशच्या विकासाचा पुढचा टप्पा जागतिक बाजारपेठेत निर्यातीचा विस्तार करणे, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करणे, पर्यटनाला चालना देणे आणि राज्यातल्या ब्रँड्सना जागतिक ओळख मिळवून देणे हा आहे, असे गोयल म्हणाले.
उत्तर प्रदेशची सध्याची वार्षिक निर्यात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची असून 2030 पर्यंत ती 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.
* * *
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315539)
अभ्यागत कक्ष : 15