विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंदुरुस्ती ही केवळ आजार नसणे एवढ्यापुरतीच मर्यादित नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष वळवणे आवश्यक - डॉ. जितेंद्र सिंह
विकसित भारत 2047चे स्वप्न साकार करण्यासाठी निरोगी पिढी अत्यंत महत्त्वाची - डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
25 SEP 2026 4:59PM by PIB Mumbai
निरोगी असणे म्हणजे आजार नसणे इतकेच नव्हे तर आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आरोग्य आणि कल्याण परिषद 2026मध्ये केले. ते म्हणाले गेल्या शतकामध्ये भारताचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला असून, आधुनिक आरोग्यसेवेबरोबर आयुर्वेद, योग आणि आरोग्य आणि कल्याण केंद्रे यांच्यावर अधिक भर दिला जात आहे. विकसित भारत 2047चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी निरोगी तरुण पिढी महत्वाची भूमिका बजावेल असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे किंवा एखाद्या विशिष्ट आजारावर उपचार घेणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य, लोकांचे राहणीमान, कामाचे वातावरण, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील समतोल आणि एकूणच जगण्याची सुलभता यांचाही समावेश होतो. आरोग्यासंदर्भातील बदलती समज प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैली यांना आरोग्यसेवेच्या दृष्टीकोनातील महत्त्वाचा घटक ठरते.
आरोग्यसेवेची प्रगती आणि वैद्यकीय सुविधांची वाढलेली उपलब्धता यांमुळे गंभीर आजाराचे निदान आणि उपचार कऱण्याच्या क्षमतेतील लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र, आरोग्यसेवेच्या पुढच्या टप्प्यात, केवळ आजारांवर होणाऱ्या उपचारांवर अवलंबून न राहता प्रतिबंध, लवकर निदान आणि आरोग्य जपण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आरोग्यसेवेबाबत एक व्यापक दृष्टीकोन स्वीकारला आहे, यामध्ये उपचारांची सुधारित उपलब्धता आणि प्रतिबंधात्मक तसेच तळापर्यंतच्या पातळीवर उपाययोजनांचा मेळ घातला गेला आहे.
आरोग्य क्षेत्रातील नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी परवडणाऱ्या, सहज उपलब्ध होणाऱ्या आणि स्थानिक गरजांना अनुरूप अशा उपाययोजना विकसित करण्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
वैज्ञानिक संशोधनाचे तंत्रज्ञान आणि उत्पादनामध्ये रूपांतर करण्यावर आता लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा लाभ मोठ्या लोकसंख्येला होऊ शकेल असे त्यांनी नमूद केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी अनुवांशिक आजारांच्या, विशेषतः नवजात बालके आणि गर्भवती महिलांमधील अशा आजारांचे प्राथमिक टप्प्यावरच निदान होण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आरोग्याशी संबंधित नव्याने उद्भवणाऱ्या आव्हानांवर व्यावहारिक, उपाय शोधण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक, संशोधक, उद्योग क्षेत्र आणि इतर भागधारक घटकांमधील सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. 'विकसित भारत 2047'च्या दिशेने होणाऱ्या देशाच्या वाटचालीत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आरोग्य कल्याण हे अविभाज्य घटक ठरतील अशा एका अधिक आरोग्यसंपन्न भारताची निर्मिती करणे हेच उद्दीष्ट असायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.



***
निलिमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315094)
अभ्यागत कक्ष : 8