ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि फ्रान्सने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा केली व्यक्त  

Posted On: 25 SEP 2026 3:44PM by PIB Mumbai

 

ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांनी भारतात प्रस्तावित ईपीआर अणुभट्ट्यांच्या तैनातीसंदर्भात भारत आणि ईडीएफ यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा आढावा घेण्यासाठी फ्रान्सच्या ईडीएफचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड फॉन्टाना यांच्यासोबत आज नवी दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला भारताच्या बाजूने ऊर्जा मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सीईए), एनटीपीसी लिमिटेड आणि एनपीसीआयएलचे अधिकारी तर फ्रान्सच्या वतीने ईडीएफ आणि भारतातील फ्रान्सच्या दूतावासाचे अधिकारी उपस्थित होते.

ईपीआर तंत्रज्ञानाचा वापर, अणुऊर्जा क्षेत्रासाठी भारताने केलेल्या नियामक सुधारणा, पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्पांमधील सहकार्य आणि एका मजबूत, परस्पर फायदेशीर भागीदारीसाठी पुढील वाटचाल यावर चर्चा केंद्रित होती.

ईडीएफने मोठ्या प्रमाणावरील स्थानिकीकरणासाठी भारतात एक परिसंस्था आणि पुरवठा साखळी उभारण्याच्या आपल्या प्रयत्नांची भारतीय बाजूला माहिती दिली. अनेक अणुभट्ट्यांचा समावेश असलेला एक मोठा कार्यक्रम पुरवठादारांना आत्मविश्वास देईल आणि भारतीय उद्योगाच्या क्षमतांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे मिळवून देईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

सचिव (ऊर्जा) यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाला अणुऊर्जा विभागाने हितधारकांच्या सल्ल्यासाठी सार्वजनिक केलेल्या 'शांती' (भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती) नियम व विनियम यांच्या मसुद्यासह भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रासाठी नियामक आराखडा अंतिम करण्याच्या कामात झालेल्या प्रगतीची माहिती दिली. हे नियम एक सुव्यवस्थित, कालमर्यादेत परवाना देण्याची चौकट उपलब्ध करून देतात आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात खाजगी व परदेशी भागीदारांचा  सहभाग सक्षम करतात.

या क्षेत्रातील प्रस्तावित एनटीपीसी-ईडीएफ संयुक्त उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्पांमधील सहकार्यावरही चर्चा केली.

***

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314957) अभ्यागत कक्ष : 7