पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकता मूल्यमापनाच्या सहाव्या फेरीसाठीच्या प्रारंभ कार्यशाळेचे उद्घाटन; एमईई-टीआर 2026 साठी तांत्रिक माहितीपुस्तिका प्रकाशित
स्थानिक सामाजिक-आर्थिक बाबींचा समावेश असलेल्या स्थळ-विशिष्ट भूदृश्य व्यवस्थापन आणि लवचिक संवर्धन पद्धतींची गरज: भूपेंद्र यादव
Posted On:
25 SEP 2026 2:00PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यू आय आय) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या (एमईई-टीआर) सहाव्या फेरीसाठीच्या आरंभ कार्यशाळेचा शुभारंभ केला.
या आरंभिक कार्यशाळेने एमईई-टीआरच्या सहाव्या फेरीचा प्रारंभ केला, ज्यामध्ये देशातील सर्व 58 व्याघ्र प्रकल्पांचा समावेश असेल. या कार्यशाळेत सहाव्या फेरीची चौकट, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी यावर चर्चा करण्यासाठी एनटीसीए, डब्ल्यूआयआय, राज्य वन विभाग, व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन पथके आणि तज्ञांचे प्रतिनिधी एकत्र आले होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात भूपेंद्र यादव यांनी अधोरेखित केले की भारताने वाघांच्या संवर्धनासाठी 85,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र निश्चित केले आहे. त्यांनी वन्यजीव संवर्धन आणि मूल्यांकनामध्ये विकसित होत असलेल्या वैज्ञानिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचे सातत्याने एकत्रीकरण करण्याच्या गरजेवर भर दिला. त्याच वेळी त्यांनी यावर जोर दिला की वन विभाग आणि स्थानिक समुदाय यांच्यातील सुसंवादी सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विज्ञान-आधारित दृष्टिकोन हा करुणा, मूल्ये आणि दूरदृष्टीने मार्गदर्शित असला पाहिजे. समाजात वन्यजीव संवर्धनाप्रती आपलेपणाची भावना रुजवण्यात वन अधिकाऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
मंत्र्यांनी सुचवले की एमईई अहवालांच्या मूल्यांकनामध्ये स्थानिक पर्यावरणीय आणि सामाजिक तज्ञांचे योगदान असावे, तसेच एमईई प्रक्रियेत स्थानिक तरुणांचाही सहभाग असावा.

यादव यांनी मानव-वन्यजीव संघर्षाचे क्षेत्र-आधारित मूल्यांकन आणि मोजता येण्याजोग्या संवर्धन परिणाम यासाठी आवाहन केले. त्यांनी पुढे स्थानिक सामाजिक-आर्थिक बाबींचा समावेश असलेल्या स्थळ-विशिष्ट भूदृश्य व्यवस्थापन आणि लवचिक संवर्धन पद्धतींच्या गरजेवर भर दिला. त्यांनी यावर जोर दिला की, एमईई प्रक्रियेच्या केंद्रस्थानी व्यावसायिकता आणि वस्तुनिष्ठता राहिली पाहिजे, जेणेकरून ही मूल्यमापने संवर्धन व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी एक भक्कम आधार प्रदान करतील.
सत्राला संबोधित करताना, केंद्रीय राज्यमंत्री (पर्यावरण,वन आणि हवामान बदल ) कीर्ती वर्धन सिंह यांनी अनेक दशकांचा प्रशासकीय आणि संवर्धनाचा अनुभव प्रत्यक्ष जमिनीवरील एमईई उपक्रमात आणणाऱ्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, त्यांचे व्यापक ज्ञान आणि क्षेत्रीय अनुभव हे वन्यजीव संवर्धकांच्या भावी पिढ्यांसाठी संस्थात्मक शिक्षणाचा एक मौल्यवान ठेवा आहे.

एमईई-टीआर हे व्याघ्र अभयारण्य त्याच्या संवर्धनाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी किती प्रभावीपणे व्यवस्थापित केले जात आहे, याचे पद्धतशीर आणि पुराव्यावर आधारित मूल्यांकन आहे. यामध्ये व्यवस्थापकीय कृती तसेच नियोजन, संसाधने आणि व्यवस्थापन प्रणाली यांची पर्याप्तता तपासली जाते आणि हे प्रयत्न अपेक्षित संवर्धन परिणामांमध्ये रूपांतरित होत आहेत की नाही, हे पाहिले जाते.

हे मूल्यांकन स्वतंत्र बहुविद्याशाखीय मूल्यांकन पथकांद्वारे केले जाईल आणि त्याद्वारे व्यवस्थापनातील बलस्थाने, उणिवा व सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे ओळखण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच व्यवस्थापकीय कृती आणि संसाधनांना प्राधान्य देण्यासाठी एक आधार प्रदान केला जाईल.
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314951)
अभ्यागत कक्ष : 12