सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (एनसीएससी) अध्यक्ष किशोर मकवाना यांच्याकडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी आयआयटी मुंबईत घटनास्थळी पाहणी

Posted On: 24 SEP 2026 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (एनसीएससी – नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट्स) अध्यक्ष किशोर मकवाना यांनी आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (आयआयटी मुंबई) येथील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात बी.टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी घटनास्थळी सविस्तर पाहणी केली.

जातीय भेदभाव, छळ आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूपूर्वीच्या परिस्थितीबाबत त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट देण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अनुसूचित जातीच्या सदस्यांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक आणि कायदेशीर संरक्षणाच्या चौकटीत आयोग या प्रकरणाची तपासणी करत आहे.

या भेटीदरम्यान, अध्यक्षांनी आयआयटी मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये संचालक, उपसंचालक, कुलसचिव (रजिस्ट्रार), संबंधित प्राध्यापक आणि संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. आयोगाने 18 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या मध्य-सत्र परीक्षेदरम्यानच्या घटनेसह, विद्यार्थ्याचा मृत्यू होण्यापूर्वी घडलेल्या सर्व घटनाक्रमाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या परीक्षेदरम्यान विद्यार्थी शैक्षणिक गैरप्रकारात सहभागी असल्याचे सांगण्यात आले होते.

सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे, अधिकृत पत्रव्यवहार, परीक्षेशी संबंधित नोंदी आणि इतर कागदपत्रांसह या प्रकरणाशी संबंधित सर्व नोंदी आणि साहित्य कायद्यानुसार जतन करावे आणि तपास यंत्रणांना उपलब्ध करून द्यावे, यावर अध्यक्षांनी भर दिला. यामुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील परिस्थितीचा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करता येईल.

आयआयटी मुंबई येथील घटनास्थळ पाहणीनंतर, अध्यक्षांनी पोलीस महासंचालक (डीजीपी), पोलीस आयुक्त (सीपी) आणि गुन्हे शाखेच्या  अधिकाऱ्यांसह तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

तपास नि:ष्पक्ष, नि:स्पृह, सर्वसमावेशक आणि वेगाने केला जाईल याची खात्री करावी आणि प्रत्येक संबंधित आरोप तसेच परिस्थितीची तपासणी, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आणि कायद्यानुसारच केली जावी असे निर्देश अध्यक्षांनी तपास यंत्रणांना दिले.

  

 

* * *

सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314645) अभ्यागत कक्ष : 8