विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते बायो-ई 3 अंतर्गत जैव-आधारित जैवविघटनशील प्लास्टिकच्या व्यावसायिक वापराचा औपचारिक शुभारंभ

Posted On: 24 SEP 2026 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज पॉलीलॅक्टिक ॲसिड (पीएलए) वर आधारित जैव-आधारित जैवविघटनशील प्लास्टिकच्या व्यावसायिक वापराचा औपचारिक शुभारंभ केला. भारताच्या पुढील पिढीतील शाश्वत उत्पादकतेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सरकारच्या अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान (बायो-ई 3 - बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरनमेंट अँड एम्प्लॉयमेंट) या चौकटीअंतर्गत बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड (बीसीएमएल) पुढे नेत असलेल्या या उपक्रमात जैवतंत्रज्ञान, शाश्वत उत्पादन आणि व्यावसायिक वापर यांची सांगड घालण्यात आली आहे. बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी) अंतर्गत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेकडून मिळालेल्या ₹75 कोटींच्या अनुदानातून, पीएलए आणि को-पॉलिमर्ससाठी दरवर्षी 100 टन उत्पादनक्षमतेची प्रायोगिक स्तरावरील संशोधन आणि  विकास सुविधा  उभारण्यास मदत होत आहे. या सुविधेचा उद्देश प्रगत जैव-आधारित साहित्य विकसित करणे आणि त्यांचे व्यावसायिक उत्पादन सुलभ करणे हा आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागात या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. ही प्रायोगिक स्तरावरील सुविधा उत्तर प्रदेशातील कुंभी येथील बीसीएमएलच्या एकात्मिक उत्पादन संकुलात उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे शाश्वत साहित्याच्या वापरासाठी पीएलए आणि सह-पॉलिमर तंत्रज्ञान विकसित करण्यास आणि त्याचा विस्तार करण्यास मदत होईल.

या प्रसंगी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताच्या जैव-अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जैवतंत्रज्ञान आता केवळ प्रयोगशाळेतील संशोधनापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक उत्पादने, शाश्वत उत्पादन आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 2014 मध्ये सुमारे 10 अब्ज अमेरिकी डॉलर असलेली भारताची जैव-अर्थव्यवस्था आता जवळपास 195 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. यावरून जैवतंत्रज्ञानावर आधारित आर्थिक उपक्रमांचा वेगाने विस्तार होत असल्याचे दिसून येते. पुढील टप्प्यात वैज्ञानिक क्षमतांचे व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त उत्पादने आणि तंत्रज्ञानामध्ये रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या भाषणाचा एक प्रमुख भर "वेस्ट टू वेल्थ" (कचऱ्यातून समृद्धी) दृष्टिकोनावर होता. “कचरा किंवा टाकाऊ वस्तू असे काहीही नसते,” असे सांगत डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला की, कचरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये अनेकदा महत्त्वाचे मूल्य दडलेले असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे मूल्य उपयोगात आणता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. जैविक साधनसंपत्ती, पुनर्वापर आणि जैवभाराचे (बायोमास) रूपांतर याबाबत भारताकडे असलेला विविध अनुभव देशाला जगभरात उपयुक्त ठरू शकतील असे उपाय विकसित करण्याची संधी देतो, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी बायोटेक्नॉलॉजीविषयीची माहिती सर्वसामान्यांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत पोहोचवण्यासाठी अधिक व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले.

   

 

* * *

सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314596) अभ्यागत कक्ष : 9