ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची युरोपियन संसदेच्या उद्योग, संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय बैठक
Posted On:
24 SEP 2026 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी 24 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे युरोपियन संसदेच्या उद्योग, संशोधन आणि ऊर्जा समितीच्या (ITRE) शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय चर्चा केली. ऊर्जा क्षेत्रातील भारत आणि युरोपियन युनियनदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेणे आणि ते अधिक बळकट करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
यावेळी ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तन, कमी -कार्बन विकास, अणुऊर्जा, कार्बन मार्केट आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. उभय देशांनी सध्या सुरू असलेल्या उपक्रमांवर आपले विचार मांडले आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधींवर चर्चा केली. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीसह दोन्ही पक्षांमधील संबंधांना मिळालेली नवी गती लक्षात घेता, या सहकार्याला आणखी पुढे नेण्यावर भर देण्यात आला.

श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना, भारताच्या झपाट्याने बदलणाऱ्या ऊर्जा क्षेत्राचा आणि देशात एक लवचिक, विश्वासार्ह व भविष्याच्या गरजा पूर्ण करणारी ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. भारताने बिगर-जीवाश्म इंधन क्षमता वाढवण्यात साधलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली. यामध्ये आपली 'राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान' उद्दिष्टे वेळेच्या आधीच पूर्ण करणे, वीज वितरण व पारेषण पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, ऊर्जा साठवणूक आणि स्मार्ट-ग्रिड उपायांची अंमलबजावणी करणे, आणि अणुऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता व ग्रीन हायड्रोजनला गती देणे या बाबींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही देशांनी अनेक नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संधींवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली. यामध्ये दीर्घकालीन ऊर्जा साठवणूक, डिजिटल पॉवर-सिस्टम तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज, तसेच 'स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स'सह इतर अत्याधुनिक अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा समावेश होता. याशिवाय, त्यांनी कार्बन मार्केट आणि 'कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम'सह (CBAM) बदलत्या कार्बन-प्रायसिंग रचनेवरही आपापले दृष्टिकोन मांडले.
या बैठकीमुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य हा भारत-युरोपियन युनियन भागीदारीचा एक मुख्य आधारस्तंभ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. एक सुरक्षित, मजबूत आणि शाश्वत ऊर्जा प्रणाली उभारण्यासाठी निरंतर संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि अधिक दृढ तंत्रज्ञानात्मक व संस्थात्मक सहकार्य राखण्याच्या कटिबद्धतेवर दोन्ही बाजूंनी भर दिला.
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314529)
अभ्यागत कक्ष : 15