विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अत्याधुनिक मल्टीसेन्सर उपग्रह तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 63.84 कोटी रुपयांच्या आरडीआय पाठबळासाठी टीडीबी-डीएसटी आणि गॅलेक्सआय यांच्यात करार

Posted On: 24 SEP 2026 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

धोरणात्मक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये खाजगी क्षेत्राच्या संशोधन आणि विकासाला गती देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना पुढे नेत, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाने संशोधन विकास आणि नवोन्मेष निधी अंतर्गत 63.84 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी बेंगळुरू इथल्या मेसर्स गॅलेक्सआय स्पेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे.

एकूण 247.69 कोटी रुपये मंजूर खर्च असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट 0.5 मीटरपेक्षा कमी उच्च-रिझोल्यूशनच्या ऑप्टोसार प्रतिमांकनात सक्षम असलेला मल्टीसेन्सर उपग्रह विकसित करणे आणि हे तंत्रज्ञान टीआरएल-6 वरून टीआरएल-9 पर्यंत नेणे हे आहे. ही मदत ऑप्शनली कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या माध्यमातून दिली जाईल. गॅलेक्सआय प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असलेला ऑप्टोसार हा पृथ्वीचे निरीक्षण करण्याच्या दोन मूलभूत भिन्न पद्धतींना - सिंथेटिक अपर्चर रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल इमेजिंग यांना एकत्र आणणारा एक दृष्टिकोन आहे.

ऑप्टिकल इमेजिंग अत्यंत तपशीलवार दृश्य माहिती देऊ शकते, मात्र ढगाळ वातावरण आणि प्रकाशामुळे त्याच्या परिणामकारकतेवर प्रभाव पडू शकतो. दुसरीकडे, रडार दिवसाच्या प्रकाशाची पर्वा न करता कार्य करू शकते आणि ढगांच्या आच्छादनातूनही प्रतिमांकन करू शकते. प्रस्तावित प्रणाली सिंथेटिक अपर्चर रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल डेटाच्या एकत्रीकरणातून या पूरक क्षमता एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे पृथ्वीचे अधिक अचूक आणि निरंतर चित्रण करणे शक्य होते.

प्रस्तावित उपग्रह 0.5 मीटरपेक्षा कमी उच्च-रिझोल्यूशन प्रतिमांकन करण्यासाठी तयार केला आहे. हवामान आणि प्रकाशाच्या विविध परिस्थितीमध्ये प्रतिमांकन करताना, हे तंत्रज्ञान विस्तृत क्षेत्र आणि लांब पल्ल्याची टेहळणी, मानव आणि वाहनांचा शोध घेणे तसेच लक्ष्यांचे वर्गीकरण यांसारख्या कामांसाठी तयार करण्यात आले आहे.

हा प्रकल्प एका महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान-परिपक्वता कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करतो, त्यात आरडीआयच्या पाठबळावर गॅलेक्सआय हे तंत्रज्ञान टीआरएल-6 वरून टीआरएल-9 पर्यंत प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेला पुढील विकास, अभियांत्रिकी, चाचणी आणि प्रमाणीकरण हाती घ्यायला सक्षम होते.

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314415) अभ्यागत कक्ष : 9