दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायकडून दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) विनियम 2026 जारी

Posted On: 22 SEP 2026 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) विनियम 2026 जारी केले.

ट्रायने यासंदर्भात विचारविमर्शासाठी मसुदा 07.04.2026 रोजी आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला होता. टीसीपीआर अर्थात  दूरसंचार ग्राहक संरक्षण (बारावी सुधारणा) विनियम  2024 लागू झाल्यापासून  दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या केवळ व्हॉइस आणि एसएमएस सेवा देणाऱ्या विशेष दर योजनांच्या (एसटीव्ही) उपलब्धतेत मर्यादा असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले. अशा एसटीव्हींची संख्या सीमित असून त्या दीर्घ कालावधीच्या आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना कमी कालावधीच्या आणि किफायतशीर पर्यायांपासून वंचित राहावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी  टीसीपीआरच्या  (तेरावी सुधारणा ) मसुद्यावर सल्लामसलत प्रक्रिया राबवण्यात आली.

सुधारणा मसुद्यावर संबंधित घटकांकडून एकूण 1132 प्रतिसाद प्राप्त झाले. कन्सल्टेशन पेपर अर्थात सल्लामसलत पत्रावर 15.06.2026 रोजी खुली चर्चा घेण्यात आली. संबंधित घटकांकडून प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया आणि स्वतःचे विश्लेषण यांच्या आधारे, ट्रायने टेलिकॉम ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) विनियम 2026 ला अंतिम स्वरूप दिले आहे.

या सुधारणेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे व्हॉइस आणि एसएमएस सेवांसाठी दरात योग्य कपातीसह एसटीव्हीज अनिवार्य करणे:

i ) व्हॉइस, एसएमएस आणि डेटासाठी दिल्या जाणाऱ्या एसटीव्हीच्या संदर्भात, तीस  दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या वैधतेशी जुळणारे एसटीव्ही

ii) प्रत्येक महिन्याला त्याच तारखेला नूतनीकरण होऊ शकणारी वैधता आणि अशा नूतनीकरणाची तारीख जर  एखाद्या महिन्यात उपलब्ध नसल्यास त्या महिन्याची शेवटची तारीख, ही नूतनीकरणाची तारीख ग्राह्य धरली जाईल, 

आणि

iii) वर नमूद केलेल्या (i) आणि (ii) पेक्षा अधिक कालावधीची वैधता असलेला किमान एक एसटीव्ही जो व्हॉइस, एसएमएस आणि डेटासाठी दिल्या जाणाऱ्या एसटीव्हीच्या कालावधीशी सुसंगत असेल.

प्राधिकरणाच्या मते, अशा दर रचनेमुळे ग्राहकांच्या गरजांची योग्य पूर्तता होईल. या सुधारित नियमावलीमुळे अल्प-उत्पन्न गटातील ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील. त्यांना त्यांच्या गरजा आणि आर्थिक क्षमतेनुसार रिचार्ज करणे शक्य होईल. एकंदरीत, ज्या ग्राहकांना डेटाचा समावेश असलेले एसटीव्ही वापरायचे नाहीत, त्यांच्यासाठी यामुळे अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतील.

ही सुधारणा ट्रायच्या संकेतस्थळावर (www.trai.gov.in) पाहता येईल. अधिक स्पष्टीकरण किंवा माहितीसाठी, सल्लागार (F&EA) विजय कुमार यांच्याशी  011-20907773 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा fea1-div@trai.gov.in  या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.


सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2313499) अभ्यागत कक्ष : 11