युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय संकल्प समारंभ या  100 आठवड्यांच्या व्यसनमुक्त युवा अभियानाची सुरुवात ; देशभरातील युवकांचा व्यापक सहभाग

Posted On: 18 SEP 2026 7:28PM by PIB Mumbai

 

'विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा – 100 आठवड्यांची व्यसनमुक्त युवा मोहीम' या अंतर्गत 18  सप्टेंबर 2026 रोजी देशभरात 'राष्ट्रीय संकल्प समारंभ' आयोजित करण्यात आला; याद्वारे सामूहिक संकल्प, स्वाक्षरी मोहिमा, सर्जनशील अभिव्यक्ती आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील चर्चांच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणण्यात आले.

MY भारत - राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या सहकार्याने सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील 259 संस्थांनी या देशव्यापी कार्यक्रमात भाग घेतला. यामध्ये 1,455 उपक्रम राबवण्यात आले आणि 1,47,798 जणांनी सहभाग नोंदवला.
व्यसनमुक्त युवा चळवळीच्या प्रतिबंधात्मक घटकाचा  एक भाग म्हणून मोहिमेच्या पहिल्या दिवशी, व्यसनमुक्ततेबाबत  जागरूकता निर्माण करणे, निरोगी आणि सकारात्मक निवडींना प्रोत्साहन देणे आणि तरुणांचा सहभाग बळकट करणे यावर भर देण्यात आला.  या उपक्रमांमुळे तरुणांना आपली आरोग्यप्रति असलेली कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी तसेच अधिक आरोग्यदायी आणि जबाबदार जीवनशैलीबाबत संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

या दिवसाचा एक प्रमुख भाग होता ‘प्रतिज्ञा घेणे’.  यात 320 उपक्रम राबवण्यात आले, ज्यात 45,082 जणांनी सहभाग घेतला. 'स्वाक्षरी मोहिमे'मध्ये 407 उपक्रम राबवले गेले ज्यात, 42,443  सहभागी समाविष्ट झाले होते. यातून  सामूहिक वचनबद्धतेची अभिव्यक्ति दिसून आली.
या दिवशी सर्जनशील आणि सहभागात्मक उपक्रमांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब झालेला दिसून आला. यामध्ये 198  उपक्रमांद्वारे विविध संकल्पनांवर आधारित पथनाट्ये सादर करण्यात आली, ज्यात 8,197  सहभागींचा समावेश होता; तर 28,466जणांचा सहभाग असलेल्या 302 उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांच्या नेतृत्वाखालील चर्चा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. याव्यतिरिक्त, इतर स्वरूपांच्या 228  उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यांत 23,610  जणांनी  सहभाग नोंदवला.

अशा प्रकारे, 'राष्ट्रीय संकल्प समारंभा'ने सामूहिक शपथ आणि सार्वजनिक स्वाक्षऱ्यांपासून ते पथनाट्य आणि संवादापर्यंत युवा सहभागाचे विविध प्रकार एकत्र आणले; यातून 'व्यसनमुक्त' होण्याचा संदेश केवळ एका जनजागृती उपक्रमापुरता मर्यादित न ठेवता तो तरुणांच्या सातत्यपूर्ण सहभागापर्यंत नेण्याचा या  मोहिमेचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होताना दिसून आला.

'विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा' हे अभियान 100  आठवडे किंवा 100 रविवार चालणाऱ्या निरंतर उपक्रमाच्या स्वरूपात आखण्यात आले आहे. यातील उपक्रमांच्या पहिल्या टप्प्यात 'माझे आरोग्य, माझा अभिमान' यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यानंतर ‘सुदृढ युवा’, 'व्यसनमुक्त युवा' आणि  'जीवनकौशल्य महिना' हे टप्पे असतील. आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती, जनजागृती आणि जीवनकौशल्ये यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांचा सहभाग मिळवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
'राष्ट्रीय संकल्प समारंभ' हा तरुणांच्या सहभागाच्या या निरंतर टप्प्याची सुरुवात दर्शवतो; आगामी आठवड्यांमध्ये विविध संस्था,
युवा केंद्रे आणि समुदायांअंतर्गत सातत्याने हे उपक्रम राबवले जाणार आहेत.
 

***

सुवर्णा बेडेकर/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312291) अभ्यागत कक्ष : 8