उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत  महोत्सवी सोहळ्याला संबोधित केले



 "उत्तम वारसा कधीच नष्ट होत नाही, तो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतो": कैवल्यधामच्या चिरंतन वारशाची उपराष्ट्रपतींकडून प्रशंसा

 "योग केवळ एका पिढीसाठी नाही, तर तो येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आहे": उपराष्ट्रपती

 “योग मन आणि शरीर यांच्यातील अंतर दूर करतो": उपराष्ट्रपती

 माहितीचा अतिभार असलेल्या युगात, योग क्षणभर थांबण्याची, आत्मचिंतन करण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची संधी देतो: उपराष्ट्रपती

Posted On: 18 SEP 2026 4:42PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्रातील लोणावळ्यात कैवल्यधाम येथे गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला संबोधित केले.

योग शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक समन्वयाच्या समर्पित सेवेची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. त्यांनी नमूद केले की, हा प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे कारण 'कैवल्यधाम'ने स्वतः योगसाधनेच्या समर्पित सेवेची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.

1924 मध्ये 'कैवल्यधाम'ची स्थापना करणाऱ्या स्वामी कुवलयानंद यांच्या योगदानाचे स्मरण करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, ज्या काळात योग साधनेकडे प्रामुख्याने एक गूढ साधना म्हणून पाहिले जात होते, अशा वेळी त्यांनी योगाभ्यासाचा वैज्ञानिक पाया घातला. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, भूतकाळातील वारसा जतन करून तो भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. "योग केवळ एका पिढीसाठी नाही, तर तो येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आहे," ते म्हणाले.

 उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी योग साधनेला जागतिक स्तरावर मिळत असलेली वाढती स्वीकृती अधोरेखित केली, आणि योग साधनेचा संदेश आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्मरण केले. आज विविध देश, संस्कृती आणि समुदायांमध्ये योग सराव केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 तंत्रज्ञानातील प्रगती आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे जीवनशैली अधिकाधिक वेगवान झाली आहे, हे नमूद करून उपराष्ट्रपती म्हणाले की, योग आपल्याला क्षणभर थांबण्याची, एकाग्र होण्याची, आत्मचिंतन करण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची संधी देतो. योग मन आणि शरीर यांच्यातील अंतर कमी करायला सहाय्य करतो आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वाढवतो, असे ते म्हणाले. 

 विद्यार्थ्यांना संबोधित करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, भारताच्या तरुणांकडे अथांग ऊर्जा, प्रतिभा आणि महत्त्वाकांक्षा आहे, तिची शिस्त आणि जागरूकतेशी सांगड घातली, तर पूर्ण क्षमता प्राप्त करता येते. पतंजलींच्या चित्तवृत्ती नियंत्रित  या संकल्पनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, सतत येणारी नोटिफिकेशन्स आणि माहितीच्या अतिभाराच्या या युगात मन शांत आणि एकाग्र करण्याची क्षमता विशेषतः प्रासंगिक आहे.

​ चांगल्या हेतूने आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रामाणिक वचनबद्धतेने केलेले कोणतेही कार्य एक चिरंतन वारसा ठेवू शकते असे त्यांनी सांगितले. उत्तम वारसा कधीही नष्ट होत नाही; तो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरतो आणि त्याचा कायम उपयोग होत राहतो. कैवल्यधामाचा शतकोत्तर प्रवास हा या शाश्वत सत्याचा पुरावा आहे, असे त्यांनी नमूद केले.

​उपराष्ट्रपतींनी महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या दृष्टीकोनाला आणि शेठ माखनलाल सेकसरीया  यांच्या योगदानाला अभिवादन केले.

​या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी ओ. पी. तिवारी यांच्या “योग एक्स्प्लेंड - लर्न फ्रॉम द मास्टर” या पुस्तकाचे प्रकाशनही केले. त्यांनी परिसराला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना योगाच्या सरावातून शिस्त, एकाग्रता आणि आत्म-जागरूकतेची मूल्ये अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले.

​या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री आणि कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधाम ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, मुख्य संरक्षक राकेश सेकसरीया, प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2312161) अभ्यागत कक्ष : 13