वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार, पारगमन आणि अनधिकृत व्यापार रोखण्याबाबतच्या सहकार्यासाठी नवी दिल्ली येथे भारत-नेपाळ आंतर-सरकारी उप-समितीची बैठक संपन्न

Posted On: 18 SEP 2026 9:48AM by PIB Mumbai

व्यापार, पारगमन आणि अनधिकृत व्यापार रोखण्याबाबतच्या सहकार्यासाठी 16-17 सप्टेंबर 2026 रोजी वाणिज्य भवन, नवी दिल्ली येथे भारत-नेपाळ आंतर-सरकारी उप-समितीची (आयजीएससी) बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव उज्ज्वल कुमार घोष यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले, तर नेपाळी शिष्टमंडळाचे नेतृत्व नेपाळ सरकारच्या उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव बुद्ध बहादूर गुरुंग यांनी केले. दोन्ही देशांची संबंधित मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले.

आयजीएससी ही व्यापार आणि व्यापाराशी संबंधित मुद्द्यांची सविस्तर छाननी करण्यासाठी तसेच द्विपक्षीय व्यापार आणि ट्रांझीट, अर्थात पारगमनाला चालना देण्यासाठीची एक महत्त्वाची द्विपक्षीय संस्थात्मक यंत्रणा आहे.

बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंनी बाजारपेठेतील प्रवेश, सीमाशुल्क आणि व्यापार सुलभता, मानके, अन्नसुरक्षा, वनस्पती-आरोग्यविषयक (फायटो-सॅनिटरी) उपाययोजना, औषधे, वैद्यकीय उपकरणे, आयुष (AYUSH) उत्पादने, सीमावर्ती पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते संपर्क आणि व्यापाराशी संबंधित इतर बाबींचा आढावा घेतला.

भारत आणि नेपाळच्या उत्पादनांना बाजारपेठेत अधिक सुलभ प्रवेश मिळवून देण्याच्या उपाययोजनांवर दोन्ही बाजूंनी चर्चा केली. यामध्ये कृषी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यपदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आयुष (AYUSH) उत्पादने, तसेच मानके आणि वनस्पती-आरोग्यविषयक (फायटो-सॅनिटरी) आवश्यकतांशी संबंधित मुद्द्यांचा विचार करण्यात आला.

दोन्ही बाजूंनी सीमाशुल्क सहकार्य आणि व्यापार सुलभता मजबूत करण्यावरही चर्चा केली. यात आगमनापूर्वीच्या माहितीची देवाणघेवाण, मूळ प्रमाणपत्रांची इलेक्ट्रॉनिक पडताळणी, सीमाशुल्क स्वयंचलन आणि डिजिटलीकरण यांचा समावेश होता. सध्या लागू असलेल्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि ‘प्राधान्य व्यापार व्यवस्थेचा’ गैरवापर रोखण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्याबरोबरच कायदेशीर व्यापाराला चालना देण्यावर चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले.

वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था हा चर्चेचा एक महत्त्वाचा भाग होता. दोन्ही बाजूंनी रेल्वे आणि रस्ते जोडणी, मालवाहतूक, एकात्मिक तपासणी नाके आणि लँड-पोर्ट पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. तसेच, सध्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर सुधारण्यावर, आणि द्विपक्षीय आणि पारगमन व्यापारावर परिणाम करणाऱ्या कार्यान्वयनातील अडथळे दूर करण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला.

दोन्ही बाजूंनी संस्थात्मक सहकार्य आणि क्षमता-विकास उपक्रमांसह मानके, अन्नसुरक्षा, वनस्पती विलगीकरण आणि अनुरूपता मूल्यांकन या क्षेत्रांतील निरंतर सहकार्याचे स्वागत केले.

दोन्ही देशांनी कायदेशीर सीमेपलीकडील व्यापार सुलभ करण्यासाठी आणि अनधिकृत व्यापार आणि व्यावसायिक फसवणूकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित संस्थांमधील सहकार्य सुरू ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.

सौहार्दपूर्ण आणि रचनात्मक वातावरणात ही बैठक पार पडली. स्थापित संस्थात्मक यंत्रणांद्वारे निकटचा संवाद कायम ठेवण्यावर आणि अधिक तांत्रिक तपासणीची आवश्यकता असलेल्या मुद्द्यांवर कालबद्ध रीतीने पाठपुरावा करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

भारत आणि नेपाळ यांच्यात घनिष्ठ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. आयजीएससी मधील चर्चेमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार, पारगमन संपर्क आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2311841) अभ्यागत कक्ष : 7