ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषेमुळे तरुणांमध्ये ज्ञान, नेतृत्व आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना
एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषा 2026-27 च्या मुंबई विभागीय फेरीत 36 संघांचा सहभाग
Posted On:
17 SEP 2026 7:14PM by PIB Mumbai
मुंबई, 17 सप्टेंबर 2026
‘एनटीपीसी’ म्हणजे राष्ट्रीय उूर्जा महामंडळाच्या पश्चिम विभाग-1 मुख्यालयाने आज मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील भारत रत्नम – मेगा सीएफसी येथे एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषा 2026-27 ची मुंबई विभागीय फेरी आयोजित केली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथील नामांकित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 36 संघांनी उत्साहाने सहभाग घेतला.
ही विभागीय फेरी व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सर्व काही या संकल्पनेवर आधारित होती. नेतृत्व, बाजारपेठा, कॉर्पोरेट धोरण, उद्योजकता, नावीन्य आणि शाश्वतता या क्षेत्रांतील समकालीन घडामोडींबद्दल विद्यार्थ्यांना जाणून घेण्यास प्रोत्साहित करणे हा या प्रश्नमंजूषेचा उद्देश होता.
स्पर्धेची सुरुवात ‘ऑन-द-स्पॉट’- तत्काळ लेखी फेरीने झाली. यामध्ये सहभागी सर्व संघांनी संकल्पनेवर आधारित प्रश्नावली सोडवली. त्यानंतर, अव्वल सहा संघ मंचावरील मल्टीमीडिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरले; या फेरीत दृकश्राव्य प्रश्न, ‘ रॅपिड-फायर’ फेऱ्या आणि बझरवर आधारित प्रश्नांचा समावेश होता.
यावेळी एनटीपीसीच्या अणुऊर्जा विभागाचे कार्यकारी संचालक निर्भय गुप्ता उपस्थित होते. सहभागींना संबोधित करताना गुप्ता म्हणाले की, तरुण विद्यार्थ्यांचा उत्साह हा ज्ञान, व्यवसाय आणि नावीन्यपूर्ण गोष्टींमधील त्यांची आवड दर्शवतो. तरुणांमध्ये बुद्धिमत्ता, नेतृत्व आणि निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एनटीपीसी कटिबद्ध आहे.

मनुष्य बळ विकास (पश्चिम-1) विभागाचे प्रादेशिक प्रमुख आणि मनुष्य बळ विकास – अणुऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक, अनिल कुमार चावला म्हणाले की, इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषा मंचाव्दारे तरुणांचे सक्षमीकरण हा राष्ट्रनिर्मितीचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे एनटीपीसी मानते, त्या विश्वासाचे प्रतिबिंब म्हणजे हा कार्यक्रम आहे. यामधून शिक्षण, सहकार्य आणि तरुण विद्यार्थ्यांमधील क्षमतांना वाव देतो.
ही विभागीय फेरी प्रसिद्ध ‘क्विझ मास्टर'आणि ग्रेसेल्सचे चे संस्थापक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ज्ञान-क्षेत्रातील तज्ञ गौतम बोस यांनी संचालित केली.
अतिशय चुरशीच्या अंतिम फेरीनंतर, एसपीजेआर मुंबईचे सानिध्य सिंग रघुवंशी आणि देव खेमानी हे विजेते ठरले आणि त्यांना प्रति संघ 60,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे ईशान जयंत येवले आणि ऋषभ गोकुल जैन खिंवसरा यांनी दुसरे स्थान पटकावले आणि त्यांना प्रति संघ 40.000 रुपयांचे पारितोषिक मिळाले. आयआयटी मुंबईच्या शगुन श्रीवास्तव आणि जोहान सॅम बिजू यांनी तिसरे स्थान पटकावले आणि त्यांना प्रति संघ 20,000 रुपये मिळाले.



प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणारे संघ राष्ट्रीय स्तरावर एनटीपीसी पश्चिम विभाग - 1 चे प्रतिनिधित्व करतील.
'एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषा'चे आयोजन 2004 पासून केले जात आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, तसेच ज्ञान, विश्लेषणात्मक कौशल्ये आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणे या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या एनटीपीसीच्या प्रमुख उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /राजेश शिरभाते /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311606)
अभ्यागत कक्ष : 4