पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेचा हप्ता वितरित कार्यक्रमातनिमित्त आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


अन्नपूर्णा योजना पश्चिम बंगालमधील नारी शक्तीला मोठे बळ देईल: पंतप्रधान

अन्नपूर्णा योजनेच्या लाभांपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, हे आमच्या सरकारचे ध्येय: पंतप्रधान

विकसित बंगालच्या ताकदीने विकसित भारताचा संकल्प अधिकच दृढ होईल: पंतप्रधान

Posted On: 17 SEP 2026 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेच्या हप्त्याच्या वितरणावेळी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले.या विशेष प्रसंगी नागरिकांशी संपर्क साधल्याबद्दल अतिशय  आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी बंगालच्या माता आणि भगिनींप्रती मनःपूर्वक आपला आदर व्यक्त केला.हा माताभगिनींचा अढळ विश्वास आणि जिव्हाळा हा वैयक्तिक ऊर्जेचा एक मोठा स्रोत आहे, यावर त्यांनी भर दिला . "तुमचा विश्वास हीच माझी शक्ती आहे!" असे मोदी यांनी अधोरेखित केले. या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व ओळखून, पंतप्रधानांनी निर्मिती आणि कलाकुसरीला समर्पित असलेल्या एका पवित्र सणाला उजाळा देत असल्याचा  पंतप्रधानांनी उल्लेख केला.या विशेष प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. "विश्वकर्मा पूजेनिमित्त मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो," असे मोदी पुनश्च म्हणाले.

राज्यात झालेल्या एका परिवर्तनशील युगाच्या आगमनावर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून स्थानिक महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एका नव्या परंपरेचा उत्सव साजरा केला. क्षमतेच्या या नव्या अध्यायात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिला लाभार्थीला त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. "आज बंगालच्या माता आणि भगिनींमध्ये नव्या क्षमतांची भर पडली आहे," असे मोदी म्हणाले.

महिलांवर असलेल्या प्रचंड कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा आढावा घेताना, त्या किती बारकाईने दररोजचे अनेक निर्णय सहजतेने घेऊन कुटुंब सांभाळतात, याची पंतप्रधानांनी दखल घेतली. जीवनावश्यक खर्चांसंबंधीची आर्थिक चिंता कमी झाल्याने आपला  आत्मविश्वास स्वाभाविकपणे वाढतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. "जेव्हा आपली आवश्यक खर्चांविषयीची चिंता कमी होते, तेव्हा आपला आत्मविश्वास आणखी वाढतो," असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.

अन्नपूर्णा योजना ही महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी एक महत्त्वपूर्ण योजना असल्याचे वर्णन करून पंतप्रधानांनी सांगितले; की दरमहा मिळणारी निश्चित रक्कम, महिलांना मोठा आधार देते. कोणालाही न मागता ही निश्चित रक्कम मिळाल्याने महिलांना आर्थिक प्रतिष्ठा मिळते, असे त्यांनी नमूद केले. "हा त्यांच्या आयुष्यासाठी खूप मोठा आधार आहे. ही एक मोठी मदत आहे!" असे प्रतिपादन मोदी यांनी पुढे केले.

या उपक्रमाचा प्रत्यक्ष परिणाम अधोरेखित करताना, पंतप्रधान म्हणाले की 3,000  रुपयांचा चौथा हप्ता सुमारे 1.5 कोटी भगिनींच्या बँक खात्यांमध्ये यशस्वीपणे पोहचत आहे. हे नियमित आर्थिक सहाय्य औषधे खरेदी करण्यासाठी किंवा घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी, तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. "एखाद्या भगिनीसाठी औषधे किंवा घरातील अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या दृष्टीने हा एक मोठा आधार ठरू शकतो," असे मोदी यांनी नमूद केले.

या आर्थिक मदतीमागील व्यापक दृष्टिकोन मांडताना, पंतप्रधानांनी नमूद केले की महिलांकडे निर्णय घेण्याचे भक्कम अधिकार असायला हवेत आणि पुढे जाण्याचे धैर्य असायला हवे, यावर आपला ठाम विश्वास आहे. महिला सक्षमीकरणाच्या या धोरणात 'अन्नपूर्णा' योजनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत, त्यांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. "बंगालमधील महिलांकडेही निर्णय घेण्याची ताकद आणि पुढे जाण्याचे धैर्य असायला हवे," असे प्रतिपादन  मोदी यांनी केले.

अनेक हालअपेष्टा सहन करूनही राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्यातील माता-भगिनींचे कौतुक केले. 'कमी बोलणे, जास्त काम करणे' या मंत्राचे काटेकोरपणे पालन करून त्यांचे 'जीवन सुलभ' करणे हे नवीन सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "बंगालमधील महिलांचे जीवन सुलभ करणे ही आमच्या नवीन सरकारसमोरील सर्वात पहिली कसोटी होती," असे मोदी म्हणाले.

कल्याणकारी कार्यक्रमांची वेगवान अंमलबजावणी होत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी नमूद केले की नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच 'अन्नपूर्णा योजने'वर  काम सुरू झाले. भ्रष्ट पद्धतींना पूर्णपणे आळा घालून लाखो महिलांपर्यंत थेट बँक हस्तांतरणाद्वारे लाभ विनाअडथळा पोहोचवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वसमावेशकतेप्रती प्रशासनाची कटिबद्धता अधोरेखित करत, संपूर्ण राज्यात या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही त्यांनी  दिली. "अन्नपूर्णा योजनेच्या लाभांपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे," असे मोदी म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक जीवनचक्र  दृष्टिकोनाबाबत अधिक माहिती देताना , पंतप्रधानांनी गर्भवती महिलांसाठीच्या 'मातृ वंदना योजने'पासून ते 'बेटी बचाओ - बेटी पढाओ' मोहिमेपर्यंतच्या अनेक प्राधान्यक्रमाच्या उपाययोजनांचा उल्लेख केला.

लहानपणापासून मातृत्वापर्यंत महिलांना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येचे सर्वंकष निराकरण करण्यासाठी कोट्यवधी शौचालयांची उभारणी, मुलींसाठी सैनिक शाळा सुरू करणे, मुद्रा कर्ज उपलब्ध करून देणे, प्रसूती रजेचा कालावधी वाढवणे, उज्ज्वला गॅस जोडणी आणि हर घर जल अंतर्गत नळाद्वारे पाणी जोडणी उपलब्ध करून देणे, आयुष्मान कार्डचे वितरण करणे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संयुक्त मालमत्ता हक्क सुनिश्चित करणे अशा अनेक व्यापक उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. “माता, भगिनी आणि कन्यांच्या जीवनचक्राशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करणे ही सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

यापूर्वी रखडलेल्या या योजनांची अंमलबजावणी वेळेत सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान सरकार त्या योजनांना वेगाने पुढे नेत असल्याचा पंतप्रधानांनी जनतेला विश्वास दिला. “आता विद्यमान सरकारच्या कार्यकाळात या रखडलेल्या योजना वेगाने पुढे नेल्या जात आहेत,” असे  मोदी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेचे उदाहरण देत या योजनांना नव्याने मिळालेल्या गतीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, राज्यातील नव्याने ओळखल्या गेलेल्या 50 लाखांहून अधिक गरीब कुटुंबांना लवकरच पक्की घरे मिळणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचीही अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रलंबित प्रकल्पांना पुन्हा गती मिळण्याचे श्रेय त्यांनी स्थानिक महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त आशीर्वाद आणि पाठिंब्याला दिले आणि राज्याच्या भविष्यासाठी सर्वांच्या सहभागातून विकासाचा संकल्प व्यक्त केला. “आपण सर्वजण मिळून नव्या बंगालची निर्मिती करू,” अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

प्रादेशिक प्रगतीचा संबंध राष्ट्रीय विकासाच्या संकल्पनेशी जोडताना पंतप्रधानांनी विकसित भारताच्या दिशेने विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी स्थानिक महिला यापुढेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा पूर्ण विश्वास व्यक्त केला. विकसित राज्याच्या सामर्थ्यामुळे देशाचा व्यापक संकल्प अधिक बळकट होतो, यावर त्यांनी भर दिला. “विकसित बंगालच्या सामर्थ्यामुळे विकसित भारताचा संकल्प आणखी मजबूत होईल,” असे मोदी यांनी सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. जनतेचे सातत्यपूर्ण प्रेम आणि आशीर्वाद हे सार्वजनिक सेवेची प्रेरणा देणारे अखंड स्रोत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या दिवसाच्या दुहेरी उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. “अन्नपूर्णा दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असे म्हणत, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 


राधिका अघोर/संपदा पाटगावकर/सुषमा काणे/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311489) अभ्यागत कक्ष : 7