संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाच्या 43 व्या कमांडर्स परिषदेला 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार प्रारंभ
संरक्षण राज्यमंत्री वरिष्ठ नेतृत्वाला करणार संबोधित
Posted On:
16 SEP 2026 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
नवी दिल्ली येथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात 17 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत भारतीय तटरक्षक दलाच्या(आयसीजी)कमांडर्सची 43वी परिषद होणार आहे. परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे या दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करतील. त्यांचा हा संवाद भारतीय तटरक्षक दलाचे बळकटीकरण, तसेच सागरी हितसंबंधांचे रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेत त्यांना अधिक प्रमाणात स्थान देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार असेल.
ही वार्षिक शिखर परिषद भारतीय तटरक्षक दलाचे सर्वोच्च स्तरावरील व्यावसायिक व्यासपीठ असून यामध्ये देशभरातील वरिष्ठ कमांडर एकत्र येऊन धोरणात्मक, कार्यान्वयन आणि प्रशासकीय प्राधान्यक्रमांवर चर्चा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रामुख्याने 'सागरी सुरक्षेसंबंधीची सध्याची आणि भविष्यातील आव्हाने', 'कार्यान्वयनविषयक सज्जता आणि साधनसंपत्तीचा वापर', 'क्षमतावृद्धी आणि दलाच्या आधुनिकीकरणाचा आराखडा' तसेच 'राष्ट्रीय सागरी धोरणाशी सुसंगत असे संघटनात्मक प्राधान्यक्रम' या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात येईल.
सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' ध्येयानुसार 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावाही या परिषदेत घेतला जाईल. भारताच्या सार्वभौम सागरी हितसंबंधांच्या रक्षणासाठी समर्पित, अधिक सक्षम, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा भारतीय तटरक्षक दलाची उभारणी करण्याच्या निरंतर प्रयत्नांमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरतो.
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311142)
अभ्यागत कक्ष : 6