कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाच्या वतीने व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 16 व्या फेरीचा प्रारंभ होणार
Posted On:
16 SEP 2026 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीने 17 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली इथे व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 16 व्या फेरीचा (16th Round of Commercial Coal Mine Auctions) प्रारंभ केला जाणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. गेल्या सहा वर्षांत या लिलावाच्या 15 फेऱ्या पार पडल्या आहेत. याअंतर्गत 147 कोळसा खाणींचा यशस्वीपणे लिलाव करण्यात आला आहे. या लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून या क्षेत्रात 44 नवीन कंपन्यांचा प्रवेश झाला आहे. लिलाव झालेल्या या खाणींमधून वार्षिक सुमारे 47,500 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, यासोबतच जवळपास 55,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक येईल, तसेच कोळसा उत्पादक राज्यांमध्ये सुमारे 4.9 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
लिलावाच्या या 16 व्या फेरीत खनिज उपलब्धतेची पूर्णतः तपासणी केलेल्या (Fully Explored) आणि खनिज उपलब्धतेची अंशतः तपासणी केलेली (Partially Explored) कोळसा खाणक्षेत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ असेल, याअंतर्गत अंतिम वापराबाबतचे कोणतेही निर्बंध नसतील, स्वयंचलनाच्या माध्यमातून 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीलाही परवानगी असेल, तसेच भविष्यातील महसूल वाटपातील हिस्स्याच्या बाबतीत खूपच कमी आगाऊ रक्कम आकारली जाणार आहे. पहिल्यांदाच बोली लावणाऱ्यांकरता तसेच छोट्या बोलीदारांनाही या लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होता यावे या उद्देशाने या नियमांची आखणी केली गेली आहे. तसेच प्रस्थापित खाण कंपन्या आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगांमधील स्पर्धात्मक वातावरण टिकवून ठेवणे हा देखील यामागचा एक उद्देश आहे.
व्यावसायिक कोळसा खाण लिलाव उपक्रमामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादन आणि उपलब्धतेत सातत्याने वाढ झाली आहे, आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे तसेच, आत्मनिर्भर भारताच्या व्यापक उद्दिष्टालाही मोठे बळ मिळाले आहे. आता लिलावाच्या 16 व्या फेरीअंतर्गत अतिरिक्त कोळसा खाण क्षेत्रे प्रत्यक्ष उत्पादनाच्या प्रक्रियेत येणे, नवीन रोजगार निर्मिती आणि या क्षेत्रात होणारी नवी गुंतवणूक या माध्यमातून या प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.
देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा उद्दिष्टांनुसार देशात विश्वासार्ह आणि किफायतशीर स्वरुपातील ऊर्जा पुरवठा होत राहील हे सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311073)
अभ्यागत कक्ष : 12