आयुष मंत्रालय
पारंपरिक वैद्यकशास्त्राशी संबंधित तज्ज्ञ गट स्थापन करण्याला ब्रिक्सचा पाठिंबा. तथ्य पुराव्यांवर आधारित जागतिक सहकार्याचे आवाहन
नवी दिल्ली जाहीरनाम्यातून आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी तसेच सार्वत्रिक आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्याच्या प्रक्रियेत 'पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्राची' वाढती भूमिका अधोरेखित
Posted On:
13 SEP 2026 2:07PM by PIB Mumbai
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामुळे टीसीआयएम अर्थात 'पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्रातील' आंतरराष्ट्रीय सहकार्याला मोठे पाठबळ मिळाले आहे. अशा वैद्यकशास्त्राचे आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याच्या प्रक्रियेतले वाढते महत्व तसेच सार्वत्रिक आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यातले योगदान या दोन्हींची या जाहीरनाम्याअंतर्गत दखल घेतली गेली आहे.

या जाहीरनाम्यातून ब्रिक्सच्या आरोग्य क्षेत्रासंबंधीच्या विभागाअंतर्गत पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्राबाबत ब्रिक्स तज्ज्ञ कार्यगटाची स्थापन करण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले गेले आहे. ही या जाहीरनाम्याची एक महत्त्वाची फलनिष्पत्ती ठरली आहे. या प्रस्तावानुसार हा कार्यगट ब्रिक्स सदस्य देशांमध्ये संवाद, सहकार्य आणि आदानप्रदानासाठीचे एक व्यासपीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून पारंपरिक वैद्यकशास्त्रातील सहकार्याला पुढची दिशा देण्याच्यादृष्टीने एक सुनियोजनबद्ध यंत्रणा स्थापित होऊ शकणार आहे.
नवी दिल्ली जाहीरनाम्याअंतर्गत पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्राची घेतली गेलेली दखल म्हणजे पारंपरिक वैद्यकशास्त्रातील जागतिक सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेचे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. याअंतर्गत प्रस्तावित ब्रिक्स तज्ज्ञ कार्यगट हा सदस्य देशांना ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी, संशोधनाला बळकटी देण्यासाठी तसे तथ्य पुराव्यांवर आधारित दृष्टिकोनाच्या आधारे पुढे वाटचाल करण्यासाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल असे त्यांनी सांगितले. विज्ञानिनिष्ठ संशोधन, गुणवत्तेची हमी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून आयुर्वेद आणि इतर पारंपरिक वैद्यकीय पद्धती पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले. यामुळे आयुर्वेद आणि इतर पारंपरिक वैद्यकीय पद्धतींच्या क्षमतेचा उपयोग सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी होऊ शकेल असे ते म्हणाले.
नवी दिल्ली जाहीरनामा हा ब्रिक्स देशांमध्ये पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्रावरील नियोजनबद्ध सहकार्याला पुढची दिशा देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी म्हटले आहे. या अंतर्गत प्रस्तावित तज्ज्ञ कार्यगटाच्या माध्यमातून, संबंधित तथ्य पुराव्यांची देवाणघेवाण, संशोधनातील सहकार्याला बळकटी, तसेच गुणवत्ता आणि नियामक दृष्टिकोनात सुधारणा घडवून आणण्यावर भर असलेले व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आपल्या आयुष परिसंस्थेच्या माध्यमातून व्यापक संशोधन आणि तथ्य पुराव्यांवर आधारित पद्धतींना प्रोत्साहन देऊन या सहकार्यात योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे. यामुळे सुरक्षित, प्रभावी आणि किफायतशीर आरोग्यसेवेला पाठबळ मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

या जाहीरनाम्याच्या माध्यमातून उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती तसेच औषधी वनस्पतींच्या अर्कांवरील संशोधनासाठी व्यापक सहकार्य प्रस्थापित व्हायला हवे असे आवाहन विशेषत्वाने करण्यात आले आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील परस्पर सामायिक पारंपरिक औषधकोश हा सुरक्षित, प्रभावी आणि किफायतशीर उपचारात्मक उत्पादने विकसित करण्यासाठीचा पाया म्हणून उपयुक्त ठरू शकतो, याचीही या जाहीरनाम्यातून दखल घेतली गेली आहे.
या जाहीरनाम्याअंतर्गत समन्वयित संशोधनावर भर दिला गेला आहे. ब्रिक्स समूह देशांमध्ये पिढ्यानपिढ्या विकसित झालेल्या पारंपरिक वैद्यकीय पद्धती अस्तित्वात आहेत, त्यासोबतच औषधी वनस्पती आणि वनस्पतींचे अर्क हे या देशांमधील आरोग्य सेवा परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळेच या जाहीरनाम्याअंतर्गत समन्वयित संशोधनावर दिलेला भर ब्रिक्स समुहातील देशांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे. या बाबतच्या व्यापक सहकार्यामुळे संशोधन, दस्तऐवजीकरण, ज्ञानाचे आदानप्रदान, तसेच तथ्य पुरावे संकलित करण्याच्या प्रक्रियेत सुलभता येऊ शकणार आहे. यासोबतच उपचारात्मक उत्पादने जबाबदारपूर्वक विकासित करण्याच्या तत्त्वालाही यामुळे मोठे पाठबळ लाभणार आहे.

या जाहीरनाम्याअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांतील राष्ट्रीय धोरणांअंतर्गत तथ्य पुराव्यांवर आधारित दृष्टिकोन तसेच योग्य नियामक आराखड्याच्या माध्यमातून पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्रातील पद्धती आणि उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षितता तसेच परिणामकारकता सुनिश्चित करण्याचे महत्वही मांडण्यात आले आहे.
या जाहीरनाम्यातून तथ्य पुरावे, गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारतेवर भर दिला गेला आहे. यामुळे पारंपरिक वैद्यकशास्त्रावरील विश्वास वाढण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचा पाया रचला गेला आहे. यामुळे ब्रिक्स देशांना संशोधन पद्धती, औषधकोश मानके, गुणवत्तेची हमी, नियामक पद्धती तसेच पारंपरिक वैद्यक पद्धती आणि उत्पादनांचे विज्ञाननिष्ठ प्रमाणीकरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनुभव आणि एकमेकांचे नैपुण्य जाणून घेण्यासाठीची संधीही उपलब्ध झाली आहे.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात पारंपरिक वैद्यकशास्त्रातील सुनियोजित सहकार्याला चालना
ही घडामोड भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात 21 जुलै 2026 रोजी चंदीगड येथे झालेल्या पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्र अर्थात टीसीआयएम विषयावरील ब्रिक्स बैठकीनंतरची आहे. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रतिनिधी एकत्र आले होते. तसेच, टीसीआयएमशी संबंधित संशोधन, शिक्षण, माहितीचे-आदानप्रदान आणि नियामक आराखडे या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्यावर यात भर देण्यात आला. या बैठकीत टीसीआयएमवरील प्रस्तावित ब्रिक्स तज्ज्ञ कार्यगटाच्या कार्यकक्षेबाबत एकमतही झाले.
प्रस्तावित तज्ज्ञ कार्यगट या सहकार्याला संस्थात्मक स्वरूप देण्याची आणि ब्रिक्स देशांमधील संशोधन संस्था, तज्ज्ञ, धोरणकर्ते व शैक्षणिक संस्था यांच्यात निरंतर संवाद व सहकार्य सुलभ करण्याची संधी उपलब्ध करून देतो.

भारतासाठी ही घडामोड विशेषतः महत्त्वपूर्ण आहे, कारण ती संशोधन, पुराव्यांची निर्मिती, गुणवत्ता हमी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे आयुर्वेद व इतर आयुष पद्धतींना पुढे नेण्याच्या देशाच्या प्रयत्नांना मजबूती देते. आरोग्यसेवेमध्ये पारंपरिक वैद्यकशास्त्राचा जबाबदार पद्धतीने समावेश करण्यास प्रोत्साहन देताना, भारताने वैज्ञानिक पुरावे, सुरक्षा, परिणामकारकता आणि योग्य मानके यांच्या महत्त्वावर सातत्याने भर दिला आहे.
औषधी वनस्पती आणि वनौषधींपासून बनवलेल्या उत्पादनांवर दिलेला भर ब्रिक्स देशांमध्ये सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याच्या संधीही निर्माण करतो. समन्वित संशोधनामुळे औषधी संसाधनांचे उत्तम दस्तऐवजीकरण आणि वैज्ञानिक आकलन होण्यास मदत होऊ शकते; तसेच फार्माकोपियल म्हणजे औषध-मानक ज्ञान समृद्ध होऊ शकते आणि गुणवत्तेची हमी देणाऱ्या उपचारात्मक उत्पादनांच्या विकासाला चालना मिळू शकते.
आरोग्य प्रणालींमध्ये पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या योग्य भूमिकेकडे वाढत्या आंतरराष्ट्रीय लक्ष्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची, 'जागतिक पारंपरिक वैद्यकशास्त्र धोरण 2025-2034', पुराव्यांचा आधार बळकट करण्यावर, सुरक्षा व गुणवत्ता सुनिश्चित करण्यावर आणि आरोग्य प्रणालींमध्ये पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या योग्य समावेशास पाठबळ देण्यावर भर देते. पारंपरिक वैद्यकशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ब्रिक्सच्या या उपक्रमाचे वर्णन जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केले आहे.
यामुळे, नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये टीसीआयएमवर दिलेला भर केवळ पारंपरिक वैद्यकशास्त्राला मान्यता देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो सखोल आणि पुराव्यांवर आधारित आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी केलेले आवाहन आहे.
प्रस्तावित तज्ज्ञ कार्यगट पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्रातील ब्रिक्स देशांचा वैविध्यपूर्ण अनुभव एकत्र आणू शकतो आणि संशोधन, पुराव्यांची निर्मिती, क्षमताबांधणी, ज्ञान-आदानप्रदान व नियामक दृष्टिकोन या क्षेत्रांत सहकार्याच्या संधी निर्माण करू शकतो.
नवी दिल्ली घोषणापत्र हे ब्रिक्स देशांमधील पारंपरिक औषध सहकार्यासाठी अधिक संरचित दृष्टिकोनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे - जे पारंपरिक ज्ञान, वैज्ञानिक संशोधन, औषधी वनस्पती संसाधने, औषधीकोशसंबधी निपुणता आणि नियामक अनुभव यांना एकत्र आणते.
भारतासाठी या परिणामांमुळे, आयुर्वेद आणि व्यापक आयुष परिसंस्थेसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ अधिक मजबूत होते, जे पुरावा-आधारित पारंपरिक औषध, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लवचिक आरोग्य प्रणाली यांवरील जागतिक संवादांमध्ये योगदान देऊ शकते.
टीसीआयएमला ब्रिक्स हेल्थ ट्रॅकमध्ये स्थान देऊन आणि सहकार्याला सार्वत्रिक आरोग्य संरक्षण, संशोधन, पुरावा, गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता यांच्याशी जोडून, नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य राष्ट्रांमध्ये सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपायांसाठी शाश्वत सहकार्याचा एक मजबूत पाया तयार करते.
***
सोनाली काकडे/तुषार पवार/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2309750)
अभ्यागत कक्ष : 8