कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोरडवाहू प्रदेशांवरील काँग्रेस 2026 चा दिल्ली जाहीरनाम्याने समारोप



कोरडवाहू प्रदेशांच्या परिवर्तनासाठी विज्ञान, नवोन्मेष आणि भागीदारीवर भर, तीन दिवसीय काँग्रेसची सांगता

कोरडवाहू कृषी-अन्नप्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी बळकट माहिती व्यवस्था आणि प्रयोगशाळांवर भर - कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. एम. एल. जाट यांचे प्रतिपादन

Posted On: 13 SEP 2026 9:07AM by PIB Mumbai


तीन दिवसीय कोरडवाहू प्रदेश काँग्रेस 2026 परिषदेची आज नवी दिल्ली येथे सांगता झाली. कोरडवाहू शेतीसाठीच्या उपाययोजनांना गती देण्यासाठी दक्षिण-दक्षिण आणि त्रिकोणी सहकार्य वाढवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. काँग्रेसचा शेवटचा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठीच्या दिनाशी जुळून आला. यावेळी कोरडवाहू प्रदेशांवरील दिल्ली जाहीरनामा, अर्थात 3 डी, स्वीकारण्यात आला. ग्लोबल साऊथ देशांमध्ये सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण, नवोन्मेष आणि एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी या जाहीरनाम्यात सामायिक कृतीचा अजेंडा निश्चित करण्यात आला आहे.
कोरडवाहू प्रदेश काँग्रेस 2026 मध्ये सहभागी झालेल्या सरकारे, संस्था, भागीदार आणि प्रतिनिधींनी समारोपाच्या सत्रात या जाहीरनाम्याला मान्यता दिली.

कोरडवाहू शेतीसाठीच्या प्रयत्नांमध्ये दूरदृष्टीला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांनी व्यक्त केली. यासाठी भक्कम संस्थात्मक यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोरडवाहू शेतीसंदर्भातील दूरदृष्टीवर आधारित कामाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी भारतीय कृषी संशोधन परिषद-राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था, अर्थात आयसीएआर-एनआयएपीकडे सोपवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. कोरडवाहू कृषी-अन्नप्रणालीसाठी सक्षम माहिती आणि आकडेवारी व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी नमूद केली. तसेच, संशोधनाचा प्रत्यक्ष व्यवहार आणि धोरणांशी संबंध जोडणारी सामायिक नवोन्मेष केंद्रे आणि प्रयोगशाळा उभारण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

गेल्या 3 दिवसांतील चर्चेचे रूपांतर ठोस कृतीत करण्याची गरज आयसीआरआयएसएटीचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी व्यक्त केली. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेशांचे धोरणात्मक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 3 दिवसांतील चर्चेतील मुद्दे निवडून त्यांना प्राधान्य देत अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती निश्चित करण्याची गरज त्यांनी सांगितली. तज्ज्ञांचे ज्ञान, अनुभव आणि परस्पर सहकार्य एकत्र आणून विचारांचे संकल्पनांमध्ये आणि संकल्पनांचे ठोस कृती व अंमलबजावणीत रूपांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरडवाहू शेतीतील नवोन्मेष आणि कृतीला चालना देण्यासाठी काँग्रेसदरम्यान नव्या भागीदारी आणि सहकार्याची सुरुवात झाल्याची माहिती समारोपाच्या सत्रात देण्यात आली. ग्लोबल क्रॉप डायव्हर्सिटी ट्रस्टसोबत नवीन करार आणि सामंजस्य करारांची घोषणा करण्यात आली. तसेच, आयसीआरआयएसएटीने एव्हिऑर लाइफ सायन्सेस, निफ्टेम, विप्रो लिमिटेड आणि ओडिशातील अंगुल आणि रायगडा जिल्हा प्रशासनांसोबत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली.
काँग्रेसचे सह अध्यक्ष, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव आणि आयसीआरआयएसएटीचे संशोधन आणि नवोन्मेष विभागाचे उपमहासंचालक डॉ. स्टॅनफोर्ड ब्लेड यांनी 3 दिवसांच्या चर्चेचा आढावा सादर केला. या परिषदेतून समोर आलेले प्रमुख निष्कर्ष आणि शिफारशीही त्यांनी मांडल्या.

दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठीच्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त दिवसाची सुरुवात विशेष कार्यक्रमाने झाली. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक आणि संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण-दक्षिण सहकार्य कार्यालयाच्या संचालक दिमा अल-खतीब यांचे संदेश सांगण्यात आले. आयसीआरआयएसएटीचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी कृषी क्षेत्रातील दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय एकजुटीची, म्हणजेच आयएसएससीएची संकल्पना मांडली. ग्लोबल साऊथ देशांमधील भागीदारी आणखी मजबूत करण्याची गरज त्यांनी सांगितली. आयसीआरआयएसएटी, आयसीएआर, सीजीआयएआर, आरआयएस, नाबार्ड आणि सीजीआयएआर कॅपॅसिटी शेअरिंग ॲक्सिलरेटरच्या प्रतिनिधींनी दक्षिण-दक्षिण सहकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.

यानंतर सीमाविरहित ज्ञान : दक्षिण-दक्षिण आणि त्रिकोणी सहकार्याला पुढे नेणे  या विषयावर सत्र झाले. हे सत्र सीजीआयएआरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या सत्रात 2 चर्चासत्रे झाली. दक्षिण-दक्षिण आणि त्रिकोणी सहकार्य अधिक प्रभावी कसे करता येईल, यावर चर्चा झाली. यशस्वी उपक्रम मोठ्या स्तरावर कसे राबवता येतील, यावरही विचार करण्यात आला. इथिओपिया, सेनेगल, ब्राझील, चीन आणि भारतातील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले. सीजीआयएआर, एफएआरए आणि एपीएएआरआयच्या प्रतिनिधींनीही आपले अनुभव आणि विचार मांडले.

काँग्रेसमध्ये आयएसएससीए ग्लोबल पुरस्कार 2026 देण्यात आले. ग्लोबल साऊथ देशांमधील कृषी क्षेत्रातील यशस्वी आणि उपयुक्त नव्या प्रयोगांना या पुरस्कारातून गौरवण्यात येते. हे प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबवता यावेत आणि इतर देशांमध्येही त्यांचा वापर करता यावा, यावर या पुरस्काराचा भर आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. या पुरस्कारांच्या पहिल्या वर्षी आशिया, दक्षिण-पूर्व आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील 34 देशांतून 170 प्रस्ताव आले. आयएसएससीए ग्लोबल अवॉर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सलन्स, म्हणजेच मेगा अवॉर्ड लेबनॉनमधील आयसीएआरडीएला देण्यात आला. उष्णता सहन करणाऱ्या गव्हाच्या जाती विकसित करण्याच्या टीएएटी व्हीट कॉम्पॅक्ट टेक्नॉलॉजीज या उपक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मेक्सिकोमधील सीआयएमएमवायटीला ई-अग्रॉलॉजी 360 या उपक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आला. भारतातील ओडिशा सरकारच्या ओडिशा लाइव्हलीहुड्स मिशनला महिलांच्या नेतृत्वाखालील पोषण आणि ग्रामीण लवचिकतेसाठी शाश्वत शेती या उपक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

पीक सुधारणा आणि उत्पादन तंत्रज्ञान या विभागातील पुरस्कार बांगलादेश कृषी संशोधन संस्थेला, अर्थात बीएआरआयला, बीएआरआय चिनाबादाम-9 या उपक्रमासाठी देण्यात आला. भारतातील धारवाडच्या कृषी विज्ञान विद्यापीठाला जीपीबीडी 4 या उपक्रमासाठी पुरस्कार मिळाला. तसेच, म्यानमारच्या कृषी संशोधन विभागाला हवामानाला अनुकूल आणि लवकर तयार होणाऱ्या हरभरा, तूर आणि भुईमूगाच्या जाती विकसित केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या विभागातील पुरस्कार कर्नाटक राज्याच्या कृषी विभागाला कृषी भाग्य या उपक्रमासाठी देण्यात आला. भारतातील नेक्तारला केळीच्या खोडावर प्रक्रिया करण्याच्या एकात्मिक उपक्रमासाठी पुरस्कार मिळाला. बिहार सरकारच्या कृषी विभागाला आहार-पाईन भूप्रदेशाचे पुनरुज्जीवन करण्याच्या उपक्रमासाठी पुरस्कार देण्यात आला. तसेच, मलावीच्या सस्टेनेबल फार्मिंग सोल्युशन्सला डिजिटल पद्धतीने जमिनीच्या पुनर्स्थापनेचे काम केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.

कृषी व्यवसाय आणि बाजारपेठ व्यवस्था या विभागातील पुरस्कार बांगलादेशच्या बीआयआयडी फाउंडेशनला ई-कृषोक या उपक्रमासाठी देण्यात आला. तामिळनाडू कृषी विद्यापीठाला टीएनएयू-एफपीओ लिंकज प्रोग्रामसाठी, तर नायजेरियन स्टोअर्ड प्रॉडक्ट्स रिसर्च इन्स्टिट्यूटला पॅराबोलिक शेप्ड सोलर ड्रायरसाठी पुरस्कार मिळाला. डिजिटल कृषी विभागातील पुरस्कार आंध्र प्रदेश सरकारच्या फलोत्पादन विभागाला एपीएमआयपी डिजिटल इकोसिस्टमसाठी देण्यात आला. गुजरात सरकारच्या कृषी, शेतकरी कल्याण आणि सहकार विभागाला कृषी प्रगती या उपक्रमासाठी पुरस्कार देण्यात आला.

पशुधन सुधारणा आणि उत्पादन तंत्रज्ञान या विभागातील पुरस्कार बांगलादेशच्या वर्ल्डफिश संस्थेला सुधारित कार्प माशांच्या बीज उत्पादन प्रणालीसाठी देण्यात आला. केनियातील इंटरनॅशनल लिव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिट्यूटला स्थानिक कोंबडीच्या जातींच्या सुधारण्यासाठी सहभागी पद्धतीचा कार्यक्रम यासाठी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, विद्यार्थ्यांना आणि संशोधन विद्यार्थ्यांना 16 उत्कृष्ट पोस्टर पुरस्कार देण्यात आले. कोरडवाहू शेती क्षेत्रातील आशावादी संशोधन आणि नव्या वैज्ञानिक प्रतिभेची दखल घेण्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

दक्षिण-दक्षिण सहकार्याच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीमध्ये परिवर्तन या विषयावर ही काँग्रेस घेण्यात आली होती. वैज्ञानिक ज्ञानाचा प्रत्यक्ष कृतीत वापर करणे, यशस्वी नवोन्मेष मोठ्या प्रमाणावर राबवणे आणि ग्लोबल साऊथ देशांमध्ये सक्षम आणि शाश्वत कोरडवाहू शेतीसाठी भागीदारी अधिक बळकट करण्याची नव्याने वचनबद्धता यावेळी व्यक्त करण्यात आली.

***

हर्षल अकुडे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309668) अभ्यागत कक्ष : 6