विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगडमधील रायगड येथे जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता उभारून भारताची गिनीज जागतिक विक्रमांमध्ये नोंद



स्टील स्लॅगपासून तयार केलेल्या रस्त्यांमुळे बांधकामाचा खर्च 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो आणि त्यांची मजबुती चारपट अधिक असते : डॉ. जितेंद्र सिंह

देशातील सर्व राज्ये, सरकारी विभाग आणि खासगी क्षेत्रात स्वदेशी स्टील स्लॅग रस्ता तंत्रज्ञानाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचे मंत्र्यांचे आवाहन

Posted On: 12 SEP 2026 4:45PM by PIB Mumbai

 

"स्टील स्लॅग" रस्त्यांचे तंत्रज्ञान हे पारंपरिक रस्त्यांच्या तुलनेत चार पट अधिक मजबूत आहे, शिवाय यामुळे रस्ते बांधणीच्या खर्चात सुमारे 40 टक्क्यांनी घट होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिली.  हे तंत्रज्ञान रस्त्यांच्या देखभालीचा कालावधी देखील लक्षणीयरीत्या वाढवू शकते. योग्य ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास साधारण 15 वर्षांनंतरच रस्त्याची देखभाल करावी लागते. त्यामुळे रस्ते अभियांत्रिकी क्षेत्रासोबतच हे संपूर्ण पायाभूत सुविधांच्या अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत क्रांतिकारक पाऊल ठरणार  असल्याचे ते म्हणाले.

या स्वदेशी तंत्रज्ञानाचा विस्तार एका प्रकल्पापुरता मर्यादित न ठेवता अनेक प्रकल्पांपर्यंत आणि एका राज्यापुरता न ठेवता अनेक राज्यांपर्यंत व्हायला हवा, असे आवाहन डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. केवळ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयापुरते मर्यादित न राहता, रेल्वे, इतर सरकारी विभाग, राज्य सरकारे, तसेच खाजगी बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या ऑपरेटर्सनी देखील या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करायला हवा, असे ते म्हणाले.

प्रक्रियेत आणलेल्या 'स्टील स्लॅग'च्या (पोलाद निर्मितीतील टाकाऊ घटक) खडीपासून तयार करण्यात आलेला जगातील सर्वात लांब रस्ता, या जागतिक विक्रमाचे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते. CSIR-सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-CRRI), नवी दिल्ली आणि जिंदाल स्टील लिमिटेड यांनी संयुक्तपणे हा प्रयत्न केला होता. छत्तीसगडमधील रायगड येथे उभारण्यात आलेला 1.85 किलोमीटर लांबीचा हा रस्ता, पोलाद निर्मितीतून निघणाऱ्या उपउत्पादनाला प्रक्रियेद्वारे रस्ते बांधणीच्या खडीत रूपांतरित करणाऱ्या या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील यशस्वी वापराचे प्रतीक आहे. या कार्यक्रमादरम्यान या रस्त्याचे आभासी माध्यमातून उद्घाटन करण्यात आले, एका शास्त्रीय माहितीपटाचे अनावरण झाले, CSIR-CRRI आणि जिंदाल स्टील यांच्यात तंत्रज्ञान हस्तांतरण करारावर स्वाक्षरी झाली, "स्टील ग्रिट" ब्रँडचे लॉंचिंग करण्यात आले आणि या प्रकल्पाच्या चमूचा विशेष गौरव करण्यात आला.

हा यशस्वी उपक्रम सरकारच्या एकापेक्षा अधिक प्रमुख प्राधान्यक्रमांची एकाच वेळी पूर्तता करतो. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार अधोरेखित केलेल्या ‘कचऱ्यापासून संपत्ती’ (Waste to Wealth) निर्मितीसाठी पुनर्वापराच्या पर्यायांवरही भर देण्यात आला आहे.

या प्रसंगी खासदार, जिंदाल स्टीलचे अध्यक्ष आणि इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष नवीन जिंदाल, DSIR च्या सचिव आणि CSIR च्या महासंचालक डॉ. एन. कलाईसेल्वी, नीती आयोगाचे माजी सदस्य आणि DRDO चे माजी महासंचालक डॉ. व्ही. के. सारस्वत, CSIR-CRRI चे संचालक डॉ. सी.एच. रवी शेखर, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हे यश म्हणजे भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन काम केल्यास औद्योगिक टाकाऊ पदार्थांचे पायाभूत सुविधांच्या संपत्तीत कसे रूपांतर करता येते याचे उत्तम उदाहरण आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद  केले.  भारतामध्ये वेगाने विस्तारणारे महामार्ग, एक्सप्रेसवे, औद्योगिक कॉरिडॉर, बंदरे आणि शहरी पायाभूत सुविधांमुळे नैसर्गिक संसाधनांचे - विशेषतः खाणकाम आणि उत्खननातून मिळणाऱ्या नैसर्गिक खडीचे संरक्षण करण्याची जबाबदारीही वाढत आहे. 'स्टील स्लॅग रोड' उपक्रम हा औद्योगिक उपउत्पादनाचा (बाय-प्रॉडक्ट) उत्पादक वापर आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण या दोन्ही आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित एक मार्ग उपलब्ध करून देतो, असे मंत्री सिंह यांनी सांगितले.

भारतासारख्या भौगोलिकदृष्ट्या विविधतेने नटलेल्या देशात या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणखी वाढते, इथे कठीण भूप्रदेश आणि मुसळधार पावसाच्या प्रदेशात पारंपरिक रस्ते अनेकदा टिकाऊपणाच्या आव्हानांना सामोरे जातात, असे मंत्री म्हणाले. ईशान्य भारताशी असलेल्या त्यांच्या 7 वर्षांच्या संबंधांची आठवण करून देताना ते म्हणाले की, मुसळधार पावसामुळे अनेक भागांत रस्ते बांधणीचे काम 4 किंवा 5 महिन्यांपुरतेच मर्यादित राहते, तर एका हंगामात बांधलेले भाग पुढील बांधकामाचे चक्र सुरू होण्यापूर्वीच खराब होऊ शकतात. म्हणूनच अशा आव्हानात्मक प्रदेशांमध्ये अधिक मजबूत आणि टिकाऊ रस्ते तंत्रज्ञान विशेष मूल्य प्रदान करू शकते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी ग्रामीण रस्त्यांच्या बदलत्या रहदारीचाही उल्लेख केला. मूलतः गावांना जोडण्यासाठी आणि प्रामुख्याने हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बांधलेले रस्ते, आजूबाजूच्या भागांचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास झाल्यावर, आर्थिक विकासासोबतच जड ट्रक आणि व्यावसायिक वाहतूक वाहून नेऊ शकतात. असे बदल अधिक भार सहन करण्याची क्षमता आणि दीर्घ टिकाऊपणाच्या गरजा पूर्ण करू शकणाऱ्या रस्ते तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित करतात असे त्यांनी सांगितले.

एकत्रित जागरूकता मोहिमेचे आवाहन करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, रस्ते बांधणी हे केवळ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयापुरतेच मर्यादित नाही. रेल्वे आणि इतर अनेक सरकारी विभागही रस्ते आणि अवजड पायाभूत सुविधांची निर्मिती करतात, तर खाजगी बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि पायाभूत सुविधा चालक हे या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची इतर प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यांनी समर्पित जागरूकता कार्यक्रमांसह अधिक आंतर-मंत्रालय आणि आंतर-राज्य सहभागाचे आवाहन केले, त्यामुळे अभियंते आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्था या तंत्रज्ञानाशी परिचित होतील आणि त्यांच्या संबंधित प्रकल्पांसाठी त्याच्या योग्यतेचे मूल्यमापन करू शकतील.

तंत्रज्ञान "एका प्रकल्पातून अनेक प्रकल्पांपर्यंत, एका राज्यातून अनेक राज्यांपर्यंत" नेणे आणि अखेर सिद्ध झालेल्या स्वदेशी नवोन्मेषांना मुख्य प्रवाहातील पायाभूत सुविधांच्या पद्धतीचा भाग बनवणे हे आता उद्दिष्ट असायला हवे, असे त्यांनी सांगितले.

सीएसआयआर-सीआरआरआय ची वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वे, प्रक्रिया प्रोटोकॉल आणि गुणवत्ता-नियंत्रण आराखडा तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी आधार देतात, तर सरकारी संस्था, वैज्ञानिक संस्था, उद्योग आणि पायाभूत सुविधा विकासक हे तंत्रज्ञान तांत्रिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या योग्य असेल तिथे त्याची अंमलबजावणी जलद करण्यासाठी एकत्रितपणे काम करू शकतात.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी या उपक्रमाचे वर्णन "संपूर्ण सरकार अधिक संपूर्ण राष्ट्र" सहकार्याचे एक उदाहरण म्हणून केले, हा उपक्रम सरकार, संशोधन संस्था, उद्योग आणि अभियंत्यांना एकत्र आणतो. या तंत्रज्ञानाची संकल्पना आणि वापर पूर्णपणे स्वदेशी आहे, आणि पुढील टप्प्यात अधिक जागरूकता निर्माण करणे आणि स्वदेशी तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि प्रात्यक्षिक प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणावरील प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे नेण्यासाठी अधिक मजबूत मार्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

मंत्र्यांनी स्टील स्लॅग रस्ते उपक्रमाला कचऱ्यातून संपत्ती निर्मिती आणि चक्राकार अर्थव्यवस्थेच्या मोठ्या संकल्पनेमध्ये समाविष्ट केले. ते म्हणाले की, कोणतीही सामग्री म्हणजे केवळ कचरा आहे या मानसिकतेतून भारताने टप्प्याटप्प्याने बाहेर पडले पाहिजे, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा संसाधनांमधून नवीन आर्थिक मूल्य निर्माण करू शकते. वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून जैवइंधन बनवणे आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून मूल्य पुनर्प्राप्त करणे यासारख्या सीएसआयआर च्या उपक्रमांचा संदर्भ देत ते म्हणाले की, पुनर्वापर आणि संसाधनांची पुनर्प्राप्ती हा औद्योगिक विकासाच्या पुढील टप्प्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनेल.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी डॉ. सतीश पांडे आणि सीएसआयआर-सीआरआरआयच्या पथकाचे संशोधनातून तंत्रज्ञान प्रत्यक्ष क्षेत्रात आणण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याबद्दल आणि त्यांच्या समर्पणाबद्दल अभिनंदन केले. वैज्ञानिक प्रतिभेला तिची क्षमता सिद्ध करण्यासाठी संधीची आवश्यकता असते, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी आवश्यक व्यापक स्तर आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी जिंदाल स्टीलचे कौतुक केले. अशाच तंत्रज्ञानाधारित उपायांसाठी आणखी स्टील कंपन्या वैज्ञानिक संस्थांसोबत सहकार्य करण्यासाठी पुढे येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या तंत्रज्ञानाचा आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये वापर करण्यात आला आहे. गुजरातमधील हजिरा येथे मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिकापासून या प्रवासाची सुरुवात झाली. प्रक्रिया केलेल्या स्टील स्लॅगपासून तयार केलेल्या खडीचा वापर औद्योगिक क्षेत्राला हजिरा बंदराशी जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याच्या बांधकामासाठी करण्यात आला. त्यानंतर हे तंत्रज्ञान एनएच-66 मुंबई-गोवा महामार्गावर वापरण्यात आले. येथे सुमारे 80,000 टन स्टील स्लॅगचे प्रक्रिया केलेल्या खडीत रूपांतर करून 1 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी रस्त्याच्या भागासाठी त्याचा वापर करण्यात आला. अरुणाचल प्रदेशातील धोरणात्मक सीमावर्ती प्रदेशासह अवजड वाहतुकीसाठीच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर आता बंदर पायाभूत सुविधांमध्येही करण्यात आला आहे. हजीरा बंदराच्या अंतर्गत 1.1 किलोमीटर लांबीचा स्टील स्लॅगचा रस्ता तयार करण्यात आला असून तो बहुउद्देशीय धक्क्याला कोळसा यार्डबरोबर जोडतो. योग्य प्रक्रिया, रस्ते बांधकामाची रचना आणि गुणवत्ता नियंत्रण यांचा अवलंब केल्यास औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थितीत प्रक्रिया केलेल्या स्टील स्लॅगपासून तयार केलेल्या खडीचा वापर करण्याची क्षमता या उपक्रमातून दिसून येते.

1.85 किलोमीटरचा हा गिनीज जागतिक विक्रम आता आणखी मोठ्या विक्रमाचा मार्ग प्रशस्त करत आहे. डीएसआयआरच्या सचिव आणि सीएसआयआरच्या महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी यांनी सांगितले की, सीएसआयआर आपल्या 85व्या वर्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना ही कामगिरी संस्थेसाठी विशेष महत्त्वाचा टप्पा आहे. जिंदाल स्टीलच्या अंगुल प्रकल्पाकडून ओडिशामध्ये 40 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सीएसआयआर-सीआरआरआयला कार्यादेश मिळाल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे सध्याच्या 1.85 किलोमीटरच्या गिनीज विक्रमापासून 40 किलोमीटरच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने या तंत्रज्ञानाचा विस्तार होणार आहे. या पुढील टप्प्यामुळे सीएसआयआर-सीआरआरआय आणि जिंदाल स्टील स्वतःचाच विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गिनीज जागतिक विक्रम हा अंतिम टप्पा नसून तंत्रज्ञानाच्या व्यापक स्वीकाराच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य ठिकाणी देशभरात या तंत्रज्ञानाची पुनरावृत्ती होईल, तेव्हाच त्याचे खरे यश सिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले. भारतात विकसित झालेले हे नवोन्मेष भारतातील व्यापक वापरासाठीचे पायाभूत सुविधा समाधान बनावे, यासाठी केंद्र सरकारची विविध मंत्रालये, राज्य सरकारे आणि खासगी पायाभूत सुविधा क्षेत्रातील घटक यांच्याशी अधिक दृढ सहकार्य करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/निखिलेश चित्रे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309561) अभ्यागत कक्ष : 11