संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशाखापट्टणमच्या पूर्व नौदल कमांड इथे कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या टेबल टॉप सरावाची सांगता

Posted On: 12 SEP 2026 11:38AM by PIB Mumbai

 

कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हतर्फे आयोजित तीन दिवसीय 'टेबल टॉप सरावाची' 11 सप्टेंबर 2026 रोजी विशाखापट्टणमच्या पूर्व नौदल कमांड इथे यशस्वी सांगता झाली. या सरावाची सुरुवात 09 सप्टेंबर 2026 रोजी पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी (कार्य) रिअर ॲडमिरल मनोज झा यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. हा सराव 'हिंदी महासागर क्षेत्रात बेकायदेशीर सागरी कारवायांना समन्वित प्रतिसाद' विकसित करण्यावर केंद्रित होता.

सीएससीचे सदस्य देश आणि निरीक्षक राष्ट्रांच्या शिष्टमंडळांनी आणि सागरी सुरक्षा तज्ज्ञांनी 72 तासांहून अधिक काळ सखोल सिम्युलेटेड परिचालनात्मक परिस्थितींमध्ये भाग घेतला. सागरी दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि बेकायदेशीर, नोंद न केलेली आणि अनियंत्रित मासेमारी यांसारख्या गुंतागुंतीच्या आणि अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यावर या चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले.

सहभागींनी सामूहिक 'सागरी क्षेत्र जागरूकता' वाढवण्यासाठी विद्यमान 'प्रमाणित कार्यपद्धती'चा आढावा घेतला आणि माहितीची देवाणघेवाण करण्याच्या व्यवस्थेचे सुलभीकरण केले.

या सरावातून या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीला चालना देण्यासाठी कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह देशांचे सामूहिक संकल्प पुन्हा अधोरेखित झाले आणि हा सराव 'महासागर' अर्थात ‘विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वसमावेशक प्रगती’ या दृष्टिकोनाशी सुसंगत होता.

***

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309455) अभ्यागत कक्ष : 8