रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमधील 17 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पाच मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी,भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे 540 किमीने वाढणार


प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यासाठी सुमारे 10,021 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Posted On: 09 SEP 2026 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 10,021 कोटी रुपये खर्चाच्या पाच प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे:

  1. अरक्कोनम – रेनिगुंटा तिसरी आणि चौथी मार्गिका – 77 किमी
  2. व्हाइटफील्ड – बंगारपेट तिसरी आणि चौथी मार्गिका – 47 किमी
  3. होसूर – ओमालूर दुहेरीकरण – 147 किमी
  4. सेलम – करूर – दिंडिगुल दुहेरीकरण – 159 किमी
  5. सिकंदराबाद (घाटकेसर) – काझीपेट बहु-मार्गिका (मल्टी-ट्रॅकिंग) – 110 किमी

वाढलेल्या मार्ग क्षमतेमुळे गतिशीलता लक्षणीयरीत्या सुधारेल, परिणामी भारतीय रेल्वेची परिचालन कार्यक्षमता आणि सेवेची विश्वसनीयता वाढेल. हे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प कार्यान्वयन सुव्यवस्थित करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सज्ज आहेत. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नव-भारता'च्या संकल्पनेशी सुसंगत आहेत. या प्रकल्पांमुळे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल आणि इथले नागरिक 'आत्मनिर्भर' बनतील तसेच त्यांच्यासाठी रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

हे प्रकल्प पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅननुसार नियोजित असून, यामध्ये एकात्मिक नियोजन आणि हितधारकांशी सल्लामसलत करून बहुविध वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे प्रकल्प प्रवासी, वस्तू, आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करतील.

तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधील 17 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या पाच प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 540 किलोमीटरने वाढेल. मंजूर झालेल्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे सुमारे 52 लाख लोकसंख्या असलेल्या अंदाजे 2,121 गावांची कनेक्टिव्हिटी वाढेल. 

मंजूर क्षमता वाढीमुळे तिरुपती, सुब्रमण्य स्वामी मंदिर (तिरुत्तानी), श्री पद्मावती अम्मावारी मंदिर (तिरुचानूर), कोटिलिंगेश्वर देवालय, श्री सेठी बायरावेश्वर स्वामी मंदिर, बंगारू तिरुपती, कोलार गोल्ड फील्ड्स, होगेनक्कल फॉल्स, होसूर किल्ला, मेत्तूर धरण, कोडाईकनाल टेकड्या, सत्यमंगलम वन्यजीव अभयारण्य, नमक्कल अंजनेयार मंदिर, नामक्कल किल्ला, कल्याण पशुपतेश्वर मंदिर, यादगिरीगुट्टा मंदिर, भोंगीर किल्ला, सुरेंद्रपुरी, स्वर्णगिरी मंदिर इत्यादींसह देशभरातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांशी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल.

 कोळसा, सिमेंट, लोह आणि पोलाद, कंटेनर, ऑटोमोबाईल, अन्नधान्य, पेट्रोलियम उत्पादने, खते यासारख्या मालाच्या वाहतुकीसाठी हे प्रकल्प महत्वाचे मार्ग आहेत. क्षमता वाढवण्याच्या कामांमुळे 47 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्यामुळे, हवामान विषयक उद्दिष्टे साध्य करायला आणि देशाचा लॉजिस्टिक्स खर्च कमी करायला सहाय्य होईल, तसेच यामुळे तेलाची आयात (सुमारे 8 कोटी लिटर) कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन (सुमारे 42 कोटी किलो) कमी होईल. हे सुमारे 2 कोटी वृक्ष लागवडी इतके प्रभावी आहे.


निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308316) अभ्यागत कक्ष : 14