श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 11-12 सप्टेंबर 2026 रोजी 'इमारत आणि इतर बांधकाम मजूर' (बीओसीडब्ल्यू) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम कार्यपद्धती आणि यशस्वी उपाययोजनांची देवाणघेवाण सुलभ करण्याचे तसेच बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठीच्या प्रमुख उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे परिषदेचे उद्दिष्ट

Posted On: 09 SEP 2026 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे, महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने, केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 11-12 सप्टेंबर 2026 रोजी मुंबईत 'इमारत आणि इतर बांधकाम मजूर (बीओसीडब्ल्यू)’ या विषयावरील  राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी, बीओसीडब्ल्यू कल्याण मंडळांचे अध्यक्ष आणि सचिव, तसेच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

बांधकाम क्षेत्र हे देशातील रोजगाराच्या सर्वात मोठ्या स्रोतांपैकी एक असून ते लाखो कामगारांच्या उपजीविकेचा आधार आहे. नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, ही परिषद 'बीओसीडब्ल्यू' अंतर्गत विकसित होत असलेल्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी आणि कल्याण मंडळांचे कामकाज अधिक बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करेल. या चर्चेमध्ये वैधानिक जबाबदाऱ्या, कामगारांची नोंदणी, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, कल्याणकारी निधीची देखरेख आणि वापर, तसेच विविध योजनांमधील अधिक समन्वय आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा वितरणाच्या संधी, या मुद्द्यांचा समावेश असेल.

या परिषदेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे राज्य बीओसीडब्ल्यू कल्याण मंडळांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण पद्धती आणि यशस्वी उपाययोजनांची माहिती, याची देवाणघेवाण करणे. परस्पर शिक्षण सुलभ करणे आणि बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी उपायांची पोहोच आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी स्वीकारले जाऊ शकणारे दृष्टिकोन ओळखणे, हा या चर्चेचा उद्देश आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कामगार परिषदेत सुरू केलेल्या तीन प्रमुख उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा या परिषदेत घेतला जाईल, यात राज्य बीओसीडब्ल्यू डिजिटल कामगार चौक, कामगार चौक-सह-सुविधा केंद्रे आणि ऑनलाइन बीओसीडब्ल्यू उपकर संकलन पोर्टल याचा समावेश आहे. या उपक्रमांचा उद्देश रोजगार सुलभता बळकट करणे, कामगार-केंद्रित, अधिक सन्मानजनक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, तसेच उपकर  संकलन आणि देखरेखीमधील पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुधारणे हा आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलता मार्ग, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी, कामगार आकडेवारी आणि कामगारांची संख्या यावर विचारमंथन होईल. बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना आणि रोजगाराच्या संधी अधिक प्रभावीपणे आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि बीओसीडब्ल्यू कल्याणकारी मंडळे यांच्यात अधिक भक्कम समन्वय साधणे, अंमलबजावणीतील त्रुटी शोधणे आणि प्राधान्याने करायच्या कृती निश्चित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.


नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308254) अभ्यागत कक्ष : 10