पंतप्रधान कार्यालय
गुजरातच्या वडोदरा इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35,000 कोटी रुपयांच्या देशविकासाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
प्रवासी आणि माल वाहतूक जलद व्हावी, नव्या संधी निर्माण व्हाव्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळावे, या उद्देशाने आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा अधिकाधिक भक्कम करत आहोत
अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या भारतासाठी, समर्पित मालवाहू मार्गिका, जीवनरेखा ठरेल : पंतप्रधान
चिपपासून ते शिपपर्यन्त, भारत आज उत्पादन क्षेत्राच्या नव्या भविष्याची उभारणी करत आहे : पंतप्रधान
Posted On:
08 SEP 2026 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या वडोदरा इथे, 35,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय विकास प्रकल्पांची पायभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या अविस्मरणीय प्रसंगासाठी, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे त्यांनी स्वागत केले. "गुजरातमधल्या माझ्या बंधू- भगिनींचे मी स्वागत करतो,” असे मोदी म्हणाले.
महाराजा सयाजीराव विद्यापीठ प्रांगणावरच्या अत्यंत चैतन्यमय वातावरणाचा विशेष उल्लेख करत, मोदी यांनी प्रगतीच्या एका सामायिक उत्सवासाठी विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा इथे अनोखा संगम झाला असल्याचं नमूद केलं. विकासाचा असा एकत्रित उत्सव पाहताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचं सांगून ते म्हणाले. “इथे सर्व काही एकाच वेळी घडत आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले.
हजारो कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करून राष्ट्रीय प्रगतीला गती देत, पंतप्रधानांनी आपल्या स्वागतासाठी वडोदऱ्यातील नागरिकांनी आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता अभियानाचे मनःपूर्वक कौतुक केले. विकासाच्या या उत्सवात स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सेवाभावाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. “आज विकसित भारताच्या प्रवासाला आणखी गती देण्यासाठी मी आपल्यामध्ये आलो आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.
लाल किल्ल्यावर जाहीर करण्यात आलेल्या ‘सप्तधारा’ संकल्पनेची रूपरेषा मांडताना, पंतप्रधानांनी गती शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून वेगवान दळणवळणाची अत्यावश्यक गरज अधोरेखित केली. याच अनुषंगाने, 2,800 किलोमीटर लांबीच्या समर्पित मालवाहतूक मार्गिकेचे ऐतिहासिक काम पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील अंतिम लिंक जोडण्याचे काम वडोदरा इथे पूर्ण झाल्याचे सांगत, हे शहर, गती शक्ती विद्यापीठाचे खरे शहर असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. “21व्या शतकातल्या भारतासाठीचे हे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे,” असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
2014 नंतर मिळालेली गती अधोरेखित करत, पंतप्रधानांनी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या यशस्वी अंमलबजावणीचा गौरवाने उल्लेख केला. यामुळे आता व्यावसायिक परिदृश्य मूलभूतपणे बदलत आहे. हे जाळे वेगाने देशाच्या व्यापाराचा पाया बनत आहेत, असे त्यांनी नमूद केले. "आम्ही त्याला गती दिली आणि 2800 किलोमीटरच्या कॉरिडॉरचे काम पूर्ण करून ते दाखवून दिले," मोदी म्हणाले.
या नवीन राष्ट्रीय जीवनवाहिनीच्या परिवर्तनकारी प्रभावावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सविस्तरपणे सांगितले की, प्रवासी आणि मालवाहतूक वेगळी केल्यामुळे दररोज 430 हून अधिक मालगाड्या चालवणे शक्य झाले. यामुळे ट्रकमधून मालवाहतुकीसाठी होणारा 30 तासांचा प्रवास अवघ्या 10-12 तासांवर आला. त्यांनी स्पष्ट केले की, आता 100 किलोमीटरचे अंतर पार करायला पूर्वीच्या वेळेच्या निम्म्याहून कमी वेळ लागतो. यामुळे इंधनाची बचत होते, मालवाहतुकीचा खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते. "गुंतवणूक एकाच मार्गावर करण्यात आली, परंतु त्याचे अनेक फायदे मिळाले," मोदी यांनी नमूद केले.
विस्तारित लॉजिस्टिक्स नेटवर्कमुळे कृषी क्षेत्राला मिळणाऱ्या महत्वाच्या फायद्यांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आता पूर्व आणि पश्चिम भारतातील शेतकरी नाशवंत माल मोठ्या बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचवू शकतात. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, हंगामी फुले, भाजीपाला आणि फळे यासारखा नाजूक माल आता ग्राहकांपर्यंत आणि बाजारपेठांपर्यंत वेळेवर पोहोचतो. "याचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झाला," मोदी यांनी नमूद केले.
नवीन कॉरिडॉरवरील परिचालनाच्या दृष्टीने महत्वाच्या टप्प्याची माहिती देताना, पंतप्रधानांनी जेएनपीटी बंदरापासून वडोदरापर्यंत 'डबल-स्टॅक कंटेनर मालगाडी यशस्वीपणे तैनात केल्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले की, या एकाच रेल्वे प्रवासाद्वारे मुंबईतून थेट 250 पेक्षा जास्त ट्रक्सच्या समतुल्य माल कार्यक्षमतेने वाहून नेण्यात आला. "आता मोठ्या प्रमाणातला माल देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने पोहोचवणे शक्य होईल," मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी त्यांच्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या नवीन रेल्वे सेवांच्या सातत्यपूर्ण विस्तारावर भर दिला. या सेवांमुळे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दुर्गम आदिवासी भागांपर्यंत रेल्वेचे जाळे अखेर पोहोचत आहे. त्यांनी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एका रेल्वेगाडीचा उल्लेख केला. या सेवेचा छोटा उदेपूर आणि अलीराजपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ मिळेल. "रेल्वे आता भारताच्या अशा भागात पोहोचत आहे जिथे गेली अनेक दशके रेल्वे पोहोचली नव्हती," मोदी यांनी नमूद केले. रस्ते, मेट्रो, विमानतळ आणि गॅस पाइपलाइन यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे होणाऱ्या व्यापक आर्थिक परिणामांचे सविस्तर वर्णन करताना, पंतप्रधानांनी 2.75 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक ऐतिहासिक रेल्वे अर्थसंकल्पाचा उल्लेख केला, ज्यामुळे लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, गरीबांसाठी घरे बांधणे आणि बंदरांचा विस्तार करणे यामुळे आजूबाजूच्या परिसरात नवीन उद्योग आणि व्यवसायांना नैसर्गिकरित्या चालना मिळते. "रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणाऱ्या खर्चामुळे हजारो नवीन रोजगार निर्माण होत आहेत," असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या 'सप्तधारा' दृष्टिकोनाच्या 'निर्मिती ' या स्तंभाकडे वळताना कापड उद्योगापासून ते पेट्रोकेमिकल्सपर्यंत वडोदराच्या औद्योगिक विकासाच्या 150 वर्षांच्या वारशाचे तसेच गेल्या दोन दशकांत 'एमएसएमई' केंद्र म्हणून झालेल्या प्रचंड वाढीचे कौतुक केले. भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या लष्करी मालवाहू विमानाचे जन्मस्थान ही या शहराची एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. "C-295 विमानाचे पहिले उड्डाण इथूनच झाले आहे," असे मोदी म्हणाले.
गेल्या दशकात देशाच्या औद्योगिक क्षमतेत झालेली वाढ अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी ठोस आकडेवारी सादर केली. यातून आधुनिक रेल्वे डबे , वॅगन्स आणि लोकोमोटिव्ह इंजिने यांच्या उत्पादनात भारत कशा प्रकारे एक प्रमुख जागतिक उत्पादक बनला आहे, हे दिसून येते. त्यांनी स्पष्ट केले की, 2014 पासून देशात 50,000 आधुनिक डब्यांचे यशस्वी उत्पादन करण्यात आले आहे आणि रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 2.5 लाख वॅगन्सचा समावेश केला आहे. "भारत आता रेल्वेचे डबे, मेट्रोचे डबे आणि रेल्वे इंजिने यांचा एक प्रमुख उत्पादक बनला आहे," असे मोदी यांनी नमूद केले.
महत्त्वपूर्ण पुरवठा साखळ्यांमध्ये संपूर्ण आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या मोहिमेचे समर्थन करताना, पंतप्रधानांनी सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या देशांतर्गत उत्पादनाचा उल्लेख केला, ज्यामुळे पूर्वीचा प्रचंड आयात खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि तब्बल 200 गिगावॅट क्षमतेची निर्मिती झाली. त्यांनी कडाना धरण तरंगता सौर प्रकल्प आणि पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला , ज्यामुळे गुजरातमधील 11 लाख कुटुंबांसह देशभरातील 55 लाख कुटुंबे वीज उत्पादक बनण्यास सक्षम झाली आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्माण झाला आहे. "भारत आता 'चिपपासून जहाजापर्यंत' उत्पादनाची एक नवी गाथा लिहित आहे," असे मोदी म्हणाले .-विरोधक पसरवत असलेल्या अपप्रचाराला खोडून काढत, पंतप्रधानांनी तरुण पिढीवर गाढ विश्वास व्यक्त केला. सौर, पवन, जल आणि अणुऊर्जा क्षेत्रांवर सरकारने केलेल्या लक्ष्यकेंद्रित कामांची ही पिढी साक्षीदार आहे. राष्ट्रीय विकासात होत असलेल्या प्रचंड प्रगतीची दखल घेतल्याबद्दल त्यांनी तरुण पिढीची प्रशंसा केली. "भारताची तरुण पिढी सत्याचा बुलंद आवाज घेऊन वाटचाल करते," असे मोदींनी ठामपणे सांगितले.
डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाला आणखी बळकटी देण्यासाठी सक्षम अशा विद्युत परिसंस्थेची धोरणात्मक आवश्यकता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. युरेनिअम, महत्वाची खनिजे तसेच पृथ्वीवरील दुर्मिळ घटकांच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार केले जात असल्याची त्यांनी पुष्टी केली. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर या आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. "हे सर्व परिश्रम केवळ देशातील तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केले जात आहेत," असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपांवर पंतप्रधानांनी भाष्य केले. पारंपरिक पदव्या आता पुरेशा नाहीत हे नमूद करत, निरंतर कौशल्यवृद्धीला प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची व्यापक पुनर्रचना केली जात असल्याचं ते म्हणाले. जगाच्या सातत्याने बदलत जाणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची संपूर्णपणे पुनर्रचना केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “तरुणांनी कौशल्ये प्राप्त करणे आणि ती कौशल्ये सतत अद्ययावत करणे ही आजच्या काळाची गरज आहे” असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.
लाल किल्ल्यावरून करण्यात आलेली महत्त्वपूर्ण वचनबद्धता पूर्ण करण्याच्या अनुषंगाने, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील प्रचंड आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षांसाठी मोफत शिकवणी देण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची पंतप्रधानांनी घोषणा केली. करिअरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना पाठिंबा देण्याची थेट जबाबदारी प्रशासन घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. "सरकार स्वतः आपल्या तरुणांच्या प्रशिक्षणाची काळजी घेईल," असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या पलीकडे मूलभूत क्षमता असल्याचे लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी कृषी, आरोग्य सेवा आणि रोबोटिक्समध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास सक्षम एआय-निपुण तरुण तयार करण्यासाठी मोठ्या राष्ट्रीय मोहिमेची त्यांनी घोषणा केली. या अत्याधुनिक साधनांवर प्रभुत्व मिळवल्याने उत्पादनक्षमतेला चालना मिळेल आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी नमूद केले. "आमची तरुण पिढी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सज्ज व्हावी अशी आमची इच्छा आहे," असे निर्धारपूर्वक उद्गार मोदी यांनी काढले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी कृती करण्याचे जोरदार आवाहन केले. 2047 पर्यंत देशाचा कायापालट करण्यावर अढळ लक्ष केंद्रित करून, या अभूतपूर्व लोकसंख्याशास्त्रीय लाभाचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्या सुरू असलेल्या विकास कामांसाठी शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. "भारत विकसित होईल याकडे आपण अविरतपणे लक्ष पुरवले पाहिजे," असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
शैलेश पाटील/राधिका अघोर/राजश्री आगाशे/सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307990)
अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam