पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
स्वच्छ वायू दिन 2026 चे औचित्य साधून 5 व्या स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केलेल्या शहरांना आणि प्रभागांना पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन कार्यपद्धतींच्या संकलनाचे प्रकाशन
Posted On:
07 SEP 2026 2:29PM by PIB Mumbai
निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा या आजच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने स्वच्छ वायू दिन 2026 या उपक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती श्रीवास्तव यांनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (NCAP) केंद्र आणि राज्य सरकारे करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. आजचा कार्यक्रम म्हणजे हवेची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार राखली जाईल याची सुनिश्चिती करण्यासाठी देशभरातील शहरे आणि प्रभागांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याचे औचित्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्वच्छ हवा ही कोणतीही चैनीची वस्तू नाही, तर ती आपली मूलभूत गरज असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. विकास आणि पर्यावरण संवर्धन हे दोन्ही उद्देश परस्पर विरोधी नाहीत, मात्र आपण नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता कायम राखत एकत्र पुढे वाटचाल करू शकतो असे त्यांनी सांगितले. भावी पिढ्यांना स्वच्छ पर्यावरणात जगता यावे याची सुनिश्चित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली.

हवेचे प्रदूषण हे एक जटील आव्हान आहे असे न्यायमूर्ती श्रीवास्तव म्हणाले. हवेच्या प्रदूषणाला कोणत्याही राजकीय सीमा नसतात आणि असे प्रदुषण होण्यात अनेक घटकांचे योगदान असते हे वास्तवही त्यांनी मांडले. याबाबतच्या राष्ट्रीय संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चिती करणाऱ्यांमध्ये नागरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आघाडीवर असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. हवेची गुणवत्ता निर्धारित केलेल्या मर्यादेनुसारच असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील सर्व भागधारकांच्या प्रयत्नांची दखल केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांच्या माध्यमातून घेत आहे असे त्यांनी नमूद केले.

स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार
या कार्यक्रमाच्या निमीत्ताने केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 5 व्या स्वच्छ वायू सर्वेक्षणाचा भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केलेल्या शहरांना आणि प्रभागांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.

***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307484)
अभ्यागत कक्ष : 14