आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

 “उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद”या संकल्पनेवर महाराष्ट्रातील नागपूर येथे अकरावा आयुर्वेद दिन 2026 साजरा केला जाणार

Posted On: 07 SEP 2026 2:55PM by PIB Mumbai


केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात अकरावा आयुर्वेद दिन 2026 निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची  माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या कार्यक्रमाद्वारे आयुर्वेद दिनापर्यंत चालणाऱ्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ झाला.

आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे ‘उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेनुसार   आयोजित केला जाईल, जो भारताचा समृद्ध आयुर्वेदिक वारसा तसेच भविष्यातील बदलत्या आरोग्यविषयक गरजांशी जोडण्याच्या, दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे.

संपूर्ण जग प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, निरोगी जीवनशैली, पोषण, आरोग्य आणि समग्र निरामय आरोग्य याकडे अधिकाधिक लक्ष देत आहे, आणि या क्षेत्रांत भारताला एक समृद्ध परंपरा आणि प्रदीर्घ अनुभव आहे, असे आपल्या भाषणात, केंद्रीय मंत्री  प्रतापराव जाधव यांनी अधोरेखित केले.

आयुर्वेद दिन हा केवळ भारताचा वारसा साजरा करण्याचा दिवस नसून, या वारशाला भविष्यातील आरोग्यविषयक गरजांशी जोडण्याची एक संधी आहे,यावर त्यांनी भर दिला.

आरोग्य म्हणजे केवळ रोगावरील उपचार नसून, निरोगी सवयी, योग्य आहार व दैनंदिन दिनचर्या, मानसिक संतुलन आणि निसर्गाशी सुसंवाद यांचाही समावेश त्यात असतो,असे सांगत प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारत' या संकल्पनेनुसार, अशा आरोग्यसेवा दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली.

मंत्री जाधव यांनी आयुर्वेदाविषयी अचूक, पुराव्यावर आधारित आणि सोपी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यातील प्रसारमाध्यमांच्या महत्त्वाच्या भूमिकेवरही यावेळी भर दिला.

आयुर्वेदाला व्यापक प्रमाणावर स्वीकृती असली तरी, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. की, त्यांनी प्रसारमाध्यमांना या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आणि आयुर्वेदाचा संदेश घरोघरी, शाळा-महाविद्यालयांमध्ये, तरुणाईपर्यंत, तसेच ग्रामीण आणि शहरी समुदायांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही  यावेळी केले.

***

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2307472) अभ्यागत कक्ष : 22