इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निक्सिद्वारे आयोजित ॲपनिक 62, यातून जागतिक इंटरनेट समुदाय मुंबईत येणार एकत्र
एआय, सायबर सुरक्षा आणि भविष्यासाठी सज्ज इंटरनेट पायाभूत सुविधा यासाठी घेणार पुढाकार
Posted On:
07 SEP 2026 10:42AM by PIB Mumbai
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा आणि डिजिटल सेवांची झपाट्याने वाढणाऱ्या मागणीमुळे मूलभूत इंटरनेट पायाभूत सुविधांवर ताण येत आहे.तसेच,भविष्यात इंटरनेट-आधारित नवोपक्रमांना आधार देण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात, सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बासष्टाव्या ॲपनिक परिषदेसाठी (APNIC 62) 600 हून अधिक इंटरनेट तज्ञ, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान नेते मुंबईत एकत्र येणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (निक्सि,NIXI) आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असोसिएशन ऑफ इंडिया (इस्पाई,ISPAI) द्वारे आयोजित,ॲपनिक 62 या परिषदेचे आयोजन एशिया पॅसिफिक नेटवर्क इन्फॉर्मेशन सेंटर (ॲपनिक,APNIC) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. ॲपनिक ही येथील ना नफा-तोटा अशा निरपेक्ष पध्दतीने इंटरनेट नंबर नोंदविणारी एक संस्था आहे.
इंटरनेटच्या भविष्याला आकार देणाऱ्या काही महत्त्वपूर्ण आव्हानांचा आणि संधींचा आढावा घेण्यासाठी हा कार्यक्रम तंत्रज्ञानातील धुरीण, नेटवर्क ऑपरेटर, धोरणकर्ते आणि इंटरनेट समुदायातील नेत्यांना एकत्र आणणार आहे. यामध्ये एआय-सक्षम सेवा, नेटवर्क ऑटोमेशन, सायबर सुरक्षा, राउटिंग सुरक्षा आणि इंटरनेट प्रशासनाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
“भारताची डिजिटल परिसंस्था विस्तारत असल्यामुळे, सुरक्षित, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज इंटरनेट पायाभूत सुविधा सुनिश्चित करणे; याला प्रामुख्याने प्राधान्य आहे.ॲपनिक (APNIC) 62 भारताला आशिया पॅसिफिक तंत्रज्ञान समुदायाशी संवाद साधण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सर्वांसाठी एक खुले, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह इंटरनेट उपलब्ध करण्याच्या दिशेने सहकार्य मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करते,” असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव सुशील पाल यांनी म्हटले आहे.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा समावेश या परिषदेत उपस्थित रहाणाऱ्या मान्यवर पाहुण्यांमध्ये असेल.
"एआय तसेच इतर मोठे तांत्रिक व सामाजिक बदल आपली अर्थव्यवस्था आणि समाजाचा आधार असलेल्या नेटवर्क्सवर अभूतपूर्व ताण आणत आहेत. सामायिक कौशल्याला अधिक सुरक्षित, लवचिक आणि विस्तारक्षम इंटरनेटसाठी व्यावहारिक कृतीत रूपांतरित करता येईल, यासाठी APNIC 62 येथील इंटरनेट समुदायाला एकत्र आणते," असे APNIC ॲपनिकच्या महासंचालक जिया रोंग लो यांनी म्हटले आहे.
“जेव्हा तांत्रिक क्षमता, गुंतवणूक आणि सहकार्य यांचा मेळ बसतो, तेव्हा काय शक्य आहे,हे IPv6 स्वीकारून भारताच्या नेतृत्वाने दर्शविले आहे.हा अनुभव सामायिक करण्यासाठी आणि इंटरनेटच्या निरंतर वाढीचे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी आशिया पॅसिफिक इंटरनेट समुदायाला एकत्र आणण्याकरिता मुंबई हे एक नैसर्गिक ठिकाण आहे,”असे ही लो पुढे म्हणाल्या.
“भारताची डिजिटल अर्थव्यवस्था आणि इंटरनेट पायाभूत सुविधा झपाट्याने वाढत असताना, मुंबईत ॲपनिक 62 चे आयोजन करताना निक्सिला अभिमान वाटत आहे. APNIC 62 ही भारताचा अनुभव सामायिक करण्याची, प्रादेशिक तज्ञांकडून शिकण्याची आणि सुरक्षित, लवचिक व सर्वसमावेशक इंटरनेटसाठी आवश्यक असलेले सहकार्य अधिक दृढ करण्याची एक संधी आहे,” असे निक्सिचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. देवेश त्यागी यांनी म्हटले आहे.
"भारतातील इंटरनेट सेवा प्रदाते विश्वसनीय, सुरक्षित आणि उच्च-कार्यक्षम जोडणी द्वारे झपाट्याने वाढणाऱ्या मागणीची पूर्तता करण्यामध्ये आघाडीवर आहेत. APNIC 62 संपूर्ण आशिया पॅसिफिकमधील व्यावसायिकांना व्यावहारिक अनुभव सामायिकपणे देण्याची, तांत्रिक सहकार्य मजबूत करण्याची आणि भविष्यासाठी त्यांच्या नेटवर्क्सना तयार करण्याची एक महत्त्वाची संधी देते," असे इस्पाईचे (ISPAI) अध्यक्ष राजेश छारिया यांनी म्हटले आहे.
उद्घाटन समारंभाच्या वेळी लाईटस्टॉर्म ग्रुपचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अमाजित गुप्ता यांचे एआय-चालित नेटवर्क ऑटोमेशनवर आणि जेपीसीईआरटी/सीसीच्या युकाको उचिडा यांचे सायबरसुरक्षेतील विश्वास आणि सहकार्याची भूमिका याविषयांवर प्रमुख भाषणे होतील.
दिनांक 8 सप्टेंबर रोजी, ॲपनिक 62 च्या निमित्ताने, निक्सि आणि ॲपनिक प्रमुख इंटरनेट पायाभूत सुविधा तंत्रज्ञान – IPv6 आणि राउटिंग सुरक्षा – यांच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करतील, ज्यामुळे भारताच्या इंटरनेट पायाभूत सुविधांची सुरक्षा, लवचिकता आणि दीर्घकालीन विकास मजबूत होण्यास हातभार लागेल.
ॲपनिक 62 परिषदेबद्दल
ॲपनिक62 हे संमेलन 4 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान मुंबईत आयोजित केले जाईल, ज्यामध्ये आशिया पॅसिफिकमधील सुरक्षित आणि लवचिक इंटरनेटवर लक्ष केंद्रित करून तांत्रिक कार्यशाळा, परिषद सत्रे, धोरण बैठका आणि सामुदायिक कार्यक्रमांचा समावेश असेल.
ॲपनिक (APNIC) विषयी
ॲपनिक (APNIC) म्हणजे एशिया पॅसिफिक नेटवर्क माहिती केंद्र (इन्फॉर्मेशन सेंटर,) हे जागतिक इंटरनेटला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक आहे.
प्रत्येक संकेतस्थळावरील भार, दृकश्राव्य प्रसारण (व्हिडिओ स्ट्रीम) किंवा एआय-शक्तीवर चालणाऱ्या सेवेमागे सामायिक तांत्रिक संसाधनांचा एक संच असतो, जो नेटवर्क्सना एकमेकांना शोधून जोडण्यास मदत करतो. ॲपनिक (APNIC) हे आशिया पॅसिफिक प्रदेशातील 56 अर्थव्यवस्थांमधील महत्त्वपूर्ण संसाधनांचे - इंटरनेट पत्ते आणि नेटवर्क ओळखकर्त्यांचे - व्यवस्थापन करण्यास मदत करते.
प्रमुख जागतिक प्रदात्यांपासून ते लहान सामुदायिक नेटवर्क्सपर्यंत, इंटरनेटची वाढ सुरक्षितपणे आणि विश्वसनीयपणे सुरू राहावी हे सुनिश्चित करण्यासाठी APNIC हजारो संस्थांसोबत काम करते. इंटरनेटला सीमापार एकच, आंतरकार्यक्षम प्रणाली म्हणून कार्य करण्यात मदत करणे,अशी तिची भूमिका असून ती नियामक किंवा राजकीय नसून तांत्रिक आहे:
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इंटरनेट केवळ आजच नव्हे, तर दीर्घकाळासाठीही कार्यरत राहील आणि आशिया पॅसिफिक प्रदेशासाठी एक खुले, स्थिर आणि सुरक्षित डिजिटल भविष्य घडवेल, हे सुनिश्चित करण्यास ॲपनिक मदत करते
***
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307406)
अभ्यागत कक्ष : 11