सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगावरील नियुक्त्या
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून नियुक्त्यांचे स्वागत
Posted On:
06 SEP 2026 7:25PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे (एसएनसीएसके) अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
भगवत प्रसाद मकवाना यांची आयोगाच्या अध्यक्षपदी, तर कैशब बिहारी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज कुमार बाल्मिकी, सुषमा गौडियाल आणि रवी रामू कालोसे यांची आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या सध्याच्या आयोगाच्या उर्वरित कार्यकाळानुसार 31 मार्च 2028 पर्यंत प्रभावी राहतील.
भागवत प्रसाद मकवाना – अध्यक्ष भागवत प्रसाद मकवाना यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, सामाजिक कार्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. विशेषतः अनुसूचित जातींच्या समुदायांच्या कल्याण आणि सक्षमीकरणाशी संबंधित विषयांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी उत्तराखंड सरकारच्या सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच एनएचपीसीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून आणि हाताने मैला उचलण्याच्या रोजगारास प्रतिबंध आणि त्यां कामगारांच्या पुनर्वसनासाठीचा अधिनियम, 2013 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय देखरेख समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
कैशब बिहारी – उपाध्यक्ष कैशब बिहारी यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ओडिशातील व्यवसायाने शेतकरी असलेले कैशब बिहारी हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि समाजातील इतर वंचित घटकांच्या कल्याण व उन्नतीसाठीच्या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी राहिले आहेत. अनुसूचित जातींच्या कल्याणाशी संबंधित विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या असून, नागरी आणि सामाजिक संस्थांशीही ते संबंधित राहिले आहेत.
मनोज कुमार बाल्मीकी – सदस्य मनोज कुमार बाल्मीकी हे उद्योजक असून त्यांनी 2019 ते 2022 या कालावधीत उत्तर प्रदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे. अनुसूचित जाती, सफाई कर्मचारी आणि वंचित समुदायांसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जनकल्याणाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यासाठी ते सक्रियपणे कार्यरत राहिले आहेत.
सुषमा गौडियाल – सदस्य सुषमा गौडियाल या बरेली महाविद्यालय, बरेली येथील हिंदी विभागात प्राध्यापक आहेत. त्यांनी कुमाऊँ विद्यापीठ, नैनीताल येथून पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या पुनर्नियुक्त सदस्यही आहेत. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दलित साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महिला सक्षमीकरण तसेच समकालीन सामाजिक-राजकीय विषयांचा त्यांच्या शैक्षणिक कार्य आणि संशोधनामध्ये समावेश आहे.
रवी रामू कलोसे – सदस्य रवी रामू कलोसे हे सेवानिवृत्त महानगरपालिका अभियंता असून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका प्राप्त केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि विकासासाठीच्या विविध उपक्रमांशी ते संबंधित राहिले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत राहिले आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून स्वागत - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचे स्वागत केले आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सामूहिक अनुभव, सामाजिक न्यायाप्रती असलेली बांधिलकी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठीचा त्यांचा संकल्प आयोगाच्या कार्याला अधिक बळकटी देईल, असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे. तसेच देशभरातील सफाई कर्मचाऱ्यांचे अधिकार, प्रतिष्ठा आणि सामाजिक-आर्थिक कल्याणाचे संरक्षण करण्याच्या आयोगाच्या कार्याला यामुळे अधिक प्रभावी योगदान मिळेल, असे मंत्रालयाने सांगितले.
नवनियुक्त पथकाकडून सामाजिक कल्याण, सार्वजनिक सेवा, प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या विविध अनुभवांचा उपयोग सफाई कर्मचारी तसेच समाजातील इतर वंचित घटकांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी करण्याची अपेक्षा आहे.
***
शैलेश पाटील/नितिन गायकवाड/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2307262)
अभ्यागत कक्ष : 6