विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
“पहिल्या दिवसापासून उद्योग भागीदारांना सहभागी करून घ्या”: डॉ. जितेंद्र सिंह यांचे नवीन उद्योग, संशोधन व विकास भागीदारी प्रारुपाचे आवाहन
केंद्रीय मंत्र्यांनी उद्योगाच्या नेतृत्वाखालील सामायिक संशोधन व विकास मंच आणि सरकार, उद्योग यांच्यातील सातत्यपूर्ण संवादावर दिला भर
Posted On:
06 SEP 2026 5:30PM by PIB Mumbai
“व्यावसायिक विभागाचा प्रयोगशाळेशी पहिल्या दिवसापासूनच संबंध असला पाहिजे.” या संदेशासह विज्ञान व तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उद्योग आणि संशोधन संस्थांच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याचे आवाहन केले. कोलकाता येथील सीएसआयआर-आयआयसीबी येथे आयोजित 6 व्या आरआयएसई- राईज परिषदेमध्ये उद्योग क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वैज्ञानिक अधिकारी आणि मुख्य परिचालन अधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. संभाव्य व्यावसायिक भागीदारांची ओळख प्रकल्पाच्या नियोजनाच्या टप्प्यावरच करून त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. यामाध्यमातून तंत्रज्ञान विकसित होत असतानाच बाजारपेठेच्या गरजा आणि व्यावहारिक बाबी त्याच्या विकासाला योग्य दिशा देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
व्यावसायिक भागीदारांना प्रयोगशाळेच्या टप्प्यावरच सहभागी करून घेतले पाहिजे, या उद्योग क्षेत्राच्या सूचनेला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यातील सहभागामुळे बाजारपेठेतील बदल, रचना, पर्यावरणीय शाश्वतता, पुरवठा साखळीच्या गरजा आणि व्यावसायिक व्यवहार्यता याबाबत उद्योग क्षेत्राला आपले विचार मांडता येतील. प्रत्यक्ष वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे बाजारपेठेत पोहोचल्यानंतर लक्षात येऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच उद्योगाचा सहभाग आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर झालेला संवाद उद्योग क्षेत्राला विशिष्ट तंत्रज्ञान आणि आव्हाने थेट मंत्र्यांसमोर मांडण्यासाठी एक विचारमंच ठरला.
महत्त्वपूर्ण खनिजे आणि स्वदेशी तंत्रज्ञान हीदेखील उद्योग क्षेत्राच्या प्रमुख स्वारस्याची क्षेत्रे म्हणून समोर आली. सहभागी प्रतिनिधींनी दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांचे उत्खनन, कायमस्वरूपी चुंबक, पुनर्वापर, लिथियमचे मूल्यवर्धन तसेच व्हॅनेडियम आणि टायटॅनियम यांसारख्या धोरणात्मक खनिजांच्या पुनर्प्राप्तीवर चर्चा केली. या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी उद्योग प्रतिनिधींनी सीएसआयआर प्रयोगशाळांकडून तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्याची मागणी केली. पूर्व भारतात दुर्मिळ मृदा मूलद्रव्ये आणि इतर महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खननाच्या शक्यतांवरही चर्चा करण्यात आली.
सीएसआयआरच्या विविध संस्थांमध्ये तसेच इतर सरकारी वैज्ञानिक संस्थांमध्ये विकसित होत असलेल्या क्षमतांचा प्रभावीपणे उपयोग करण्याची गरज डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केली. मंत्र्यांनी अंतराळ तंत्रज्ञान आणि विशेष प्रकारच्या ऑप्टिकल घटकांशी संबंधित उद्योग क्षेत्राकडून आलेल्या सूचनांवरही प्रतिक्रिया दिली. डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भातील आवश्यक तपशील मागवून, अंतराळाशी संबंधित हा विषय अंतराळ विभागाकडे मांडता येईल, असे सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, नियामक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी यापूर्वीच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उद्योग क्षेत्राकडून यासंदर्भात आणखी विशिष्ट सूचना प्राप्त झाल्यास त्यांचा विचार केला जाऊ शकतो, असे सांगत त्यांनी उद्योग प्रतिनिधींना पुढील सूचना मांडण्याचे आवाहन केले.
फाउंड्री क्षेत्रासाठी सामायिक संशोधन व विकास सुविधा उभारण्याच्या शक्यतेचा विचार करण्याचेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुचवले. यासाठी उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन आपल्या गरजा स्पष्टपणे मांडाव्यात आणि सरकारने आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी विविध उद्योगांनी एकत्र येण्यावर कोणतेही बंधन नसल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले आणि पोलाद क्षेत्रातील उद्योगांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. विविध पोलाद उद्योगांचे तुम्ही सर्व प्रतिनिधी म्हणून एकत्र या आणि ‘आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून द्या’ असे सांगा. आम्ही ते उपलब्ध करून देऊ.”
बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सने सर्पदंशावरील विषप्रतिबंधकाचे स्वदेशी उत्पादन पुन्हा सुरू करण्याची शक्यता मांडली. पूर्व भारतात सापांच्या विविध प्रजाती आढळत असल्याने या प्रदेशाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन विषप्रतिबंधकाची आवश्यकता असल्याचे कंपनीने सांगितले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी कंपनीला पश्चिम बंगालच्या आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. अशा कोणत्याही प्रयत्नाचे वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्यविषयक आवश्यकतांशी सुसूत्रीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर विष आणि सर्पदंशाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका स्टार्टअपने सर्पदंशासाठी कारणीभूत ठरलेल्या सापाच्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी तसेच नवीन विषप्रतिबंधक विकसित करण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी या नवोन्मेषाचे स्वागत केले. मात्र, व्यापक स्तरावर त्याचा वापर करण्यापूर्वी अशा तंत्रज्ञानाचे योग्य वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि वैद्यकीय चाचण्या आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही, यावर त्यांनी भर दिला आणि आवश्यक प्रमाणीकरणासाठी नवोन्मेषकांना पश्चिम बंगालच्या आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले.
या संवादादरम्यान डॉ. जितेंद्र सिंह यांनी उद्योग प्रतिनिधींना सर्वसाधारण चर्चेपासून पुढे जात विशिष्ट आणि कृतीयोग्य गरजा मांडण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित केले. सरकार आणि वैज्ञानिक संस्था योग्य समन्वय व सहकार्य उपलब्ध करून देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. समारोपाच्या भाषणात ते म्हणाले, “आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो, तुमच्यासाठी काय करत नाही किंवा तुमच्यासाठी आणखी चांगले काय करू शकतो, हे तुम्ही आम्हाला सांगा.” याद्वारे उद्योग क्षेत्राच्या स्पष्टपणे मांडलेल्या गरजांना प्रतिसाद देण्याची सरकारची तयारी त्यांनी अधोरेखित केली.
अशा प्रकारचा संवाद केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित राहू नये, असेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. “आणखी काही सूचना असतील तर तुम्ही त्या नेहमी मांडू शकता. यासाठी अशा औपचारिक कार्यक्रमाची वाट पाहण्याची गरज नाही,” असे त्यांनी सांगत उद्योग क्षेत्राला संबंधित संस्थांशी सातत्याने संवाद साधण्याचे आवाहन केले.
6व्या आरआयएसई कॉन्क्लेव्हमधील या संवादातून भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी स्पष्ट दिशा अधोरेखित झाली. संशोधन आणि विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच उद्योग क्षेत्राने भागीदार म्हणून सहभागी होणे, वैज्ञानिक संस्थांनी तंत्रज्ञान सक्षम करणाऱ्या संस्था म्हणून भूमिका बजावणे आणि प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या आशादायी तंत्रज्ञानाला बाजारपेठेपर्यंत आणि त्यानंतर व्यापक सामाजिक उपयोगापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने सुलभकर्ता म्हणून कार्य करणे, या मॉडेलवर या संवादातून भर देण्यात आला.




***
शैलेश पाटील/नितिन गायकवाड/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2307258)
अभ्यागत कक्ष : 4