विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘RISE कॉन्क्लेव्ह’ने भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमधील स्टार्टअप क्षेत्राचे सामर्थ्य प्रकाशात आणले: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह


कोलकाता येथे आयोजित ‘RISE कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून विज्ञान, स्टार्टअप्स, उद्योग आणि सरकार एकत्र; स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रयोगशाळेपासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास वेगवान करण्यावर भर

खनिजे, औषधनिर्मिती, साहित्य आणि यंत्रसामग्री या क्षेत्रांतील क्षमता चार CSIR प्रयोगशाळांकडून सादर; ‘स्टार्टअप प्रदर्शन’ आणि ‘विज्ञान-तंत्रज्ञान दालनामुळे’ तंत्रज्ञान भागीदारीसाठी व्यासपीठ उपलब्ध

संशोधनाचे ठोस परिणामांमध्ये रूपांतर करण्यावर भर; आठ सामंजस्य करार, चार तंत्रज्ञान हस्तांतरणे, दोन उत्पादनांचे लोकार्पण आणि एका सुविधेचे उद्घाटन

आरोग्यसेवा, उत्पादन, प्रगत साहित्य, महत्त्वाची खनिजे, कार्बन उत्सर्जनात घट आणि विज्ञानाधारित स्टार्टअप्सवर आठ सत्रांत 67 तज्ज्ञांची सखोल चर्चा

Posted On: 06 SEP 2026 2:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारताच्या झपाट्याने विस्तारत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेचा विस्तार महानगरांपलीकडे करण्याचे आवाहन केले. तसेच, स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रयोगशाळेपासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी विज्ञान, स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्यात अधिक भक्कम समन्वय निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कोलकाता येथे आयोजित सहाव्या ‘RISE कॉन्क्लेव्ह 2026’च्या उद्घाटन सत्रात बोलताना डॉ. सिंह यांनी, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमधील नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेकडे लक्ष वेधले. भारतातील 50 ते 60 टक्क्यांहून अधिक स्टार्टअप्स महानगरांमध्ये नसल्याचे नमूद करत, या शहरांमधील नवीन कल्पना व तंत्रज्ञान विकसित करण्याच्या क्षमतांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

छोट्या शहरांतील तरुण तंत्रज्ञ मोठ्या शहरांतील त्यांच्या समकक्षांशी स्पर्धा करत असून, अनेक बाबतींत त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी बजावत आहेत, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. त्यामुळे या तंत्रज्ञांनी प्रस्थापित तंत्रज्ञान केंद्रांकडे येण्याची वाट पाहण्याऐवजी वैज्ञानिक संस्था आणि नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या परिसंस्थेनेच त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘RISE कॉन्क्लेव्ह’ अशाच प्रकारचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. या माध्यमातून स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, संभाव्य मार्गदर्शक, संशोधक आणि सरकारी प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता त्याचे रूपांतर उद्योजकतेत, तंत्रज्ञान हस्तांतरणात, व्यावसायिकीकरणात आणि व्यापक सामाजिक उपयोगात व्हावे, यासाठी हा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कोलकाता येथे ‘RISE कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्याला विशेष महत्त्व असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रगतीच्या वाटचालीत कोलकात्याचे ऐतिहासिक योगदान राहिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बंगालच्या विज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरेचा तसेच संस्थानिर्मितीच्या वारशाचा त्यांनी उल्लेख केला. भारताच्या बौद्धिक आणि वैज्ञानिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक नामवंत व्यक्ती आणि संस्थांना कोलकात्याने घडवले व त्यांना प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. बिधानचंद्र रॉय, प्रा. यू. एन. ब्रह्मचारी, सर सी. व्ही. रमण आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह अनेक दिग्गजांनी निर्माण केलेल्या समृद्ध वारशाचा संदर्भ देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या असामान्य वारशाची उंची कायम राखण्याची आणि कोलकात्याला पुन्हा एकदा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे.

कोलकात्याची बौद्धिक ताकद आणि शैक्षणिक क्षेत्रातील समृद्ध परंपरा ही या शहराच्या ऐतिहासिक वैज्ञानिक वारशाची सांगड अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेशी घालण्यासाठी भक्कम पायाभूत आधार ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.

सरकारचा सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करण्याचा दृष्टिकोन आता हळूहळू विज्ञानाच्या क्षेत्रातही दिसून येत असून, विविध मंत्रालये, विभाग, संशोधन संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांना एकत्र आणले जात असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.

CSIRच्या प्रयोगशाळांसोबत IIT खरगपूर, IISER कोलकाता, NIT दुर्गापूर आणि अटल टिंकरिंग लॅब्ससारख्या संस्थांचे तसेच जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, अणुऊर्जा विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या विविध नेटवर्कचे एकत्रित बळ पूर्व भारतात एक मजबूत ‘ज्ञानमार्गिका’ निर्माण करू शकते, असेही मंत्री सिंह यांनी सांगितले. 

मंत्र्यांनी सांगितले की, भारताने गेल्या काही वर्षांत पूर्वी उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात बंद असलेल्या क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत. यामध्ये अंतराळ, अणुऊर्जा आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्रासाठी संधी उपलब्ध करून दिल्यामुळे स्टार्टअप्स आणि उद्योगांना राष्ट्रीय तंत्रज्ञान विकासात सहभागी होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी स्थापन करण्याच्या निर्णयाचाही उल्लेख डॉ. जितेंद्र सिंह यांनी  केला. तसेच उच्च जोखीम आणि उच्च परतावा असलेल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योगांमधील अधिक मजबूत भागीदारी निर्माण करण्यात अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेची (एएनआरएफ) भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

भारतीय प्रयोगशाळांमधून विकसित होणाऱ्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वीकार, पाठबळ, वित्तपुरवठा आणि व्यावसायिकीकरण करण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे, असे आवाहन मंत्र्यांनी केले. वैज्ञानिक प्रकल्प आणि स्टार्टअप्स स्वतंत्रपणे दीर्घकाळ टिकू शकत नाहीत, तर त्यासाठी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रासोबत परस्पर लाभदायक संबंध आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत पोहोचण्यासाठी उद्योग क्षेत्राला त्यामध्ये स्पष्ट व्यावसायिक मूल्य दिसणे आणि नवोन्मेषाच्या प्रक्रियेत सक्रिय भागीदार बनणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आरआयएसई कॉन्क्लेव्हमधून मिळणारे निष्कर्ष केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता व्यापक आणि सातत्यपूर्ण नवोन्मेष परिसंस्थेचा भाग बनले पाहिजेत, यावरही भर दिला. अशा व्यासपीठांमधून निर्माण होणारे ज्ञान, तंत्रज्ञान आणि संधी समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत लोकांना समजतील आणि सहज उपलब्ध होतील अशा भाषा व स्वरूपात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. एका आरआयएसई आवृत्तीतून मिळालेले अनुभव आणि शिकवण पुढील आवृत्तीच्या विकासासाठी उपयोगी ठरली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

6वा आरआयएसई कॉन्क्लेव्ह 2026 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक परिसरातील सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी येथे आयोजित करण्यात आला आहे. “विकसित भारत 2047 साठी नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना” या संकल्पनेअंतर्गत सीएसआयआर-सीजीसीआरआय, सीएसआयआर-आयआयसीबी, सीएसआयआर-सीएमईआरआय आणि सीएसआयआर-आयएमएमटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. वैज्ञानिक संशोधन, उद्योजकता आणि औद्योगिक उपयोग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी या कॉन्क्लेव्हमध्ये स्टार्टअप्स, उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधक, नवोन्मेषक, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच धोरणकर्ते सहभागी झाले आहेत.

उद्घाटन सत्राला सीएसआयआरच्या महासंचालक आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिव डॉ. एन. कलैसेल्वी यांनी संबोधित केले. पश्चिम बंगाल सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रभारी मंत्री डॉ. शरद्वत मुखर्जी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. सीएसआयआर-आयआयसीबीच्या संचालक प्रा. विभा टंडन, सीएसआयआर-आयएमएमटीचे संचालक डॉ. रामानुज नारायण, सीएसआयआर-सीजीसीआरआयचे संचालक प्रा. बिक्रमजीत बसू, सीएसआयआर-सीएमईआरआयचे संचालक डॉ. नरेश चंद्र मुर्मू यांच्यासह वरिष्ठ वैज्ञानिक, संशोधक, स्टार्टअप संस्थापक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकही उपस्थित होते.

मुंबई, लखनौ, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरू येथे यापूर्वी झालेल्या कॉन्क्लेव्हनंतर कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेली ही आरआयएसई कॉन्क्लेव्हची 6वी आवृत्ती आहे. देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय आरआयएसई व्यासपीठ पोहोचवण्याचा उद्देश व्यापक संपर्क वाढवणे आणि विविध प्रदेशांतील वैज्ञानिक क्षमता, नवोन्मेषक आणि उद्योजकांना एकत्र आणणे हा आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

या कॉन्क्लेव्हमध्ये 4एम चौकट केंद्रस्थानी आहे. खनिजे, औषधनिर्मिती, सामग्री आणि यंत्रे यांचा समावेश असलेली ही चौकट सहभागी चार सीएसआयआर प्रयोगशाळांच्या परस्परपूरक क्षमतांचे प्रतिनिधित्व करते.

सहभागी सीएसआयआर प्रयोगशाळांनी तंत्रज्ञान हस्तांतरण, परवाना, व्यावसायिकीकरण आणि व्यापक औद्योगिक उपयोगाची क्षमता असलेली स्वदेशी तंत्रज्ञाने आणि उत्पादनेही प्रदर्शित केली. प्रगत सामग्री, आरोग्यसेवा आणि यंत्रसामग्रीपासून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत अभियांत्रिकी उपायांपर्यंत विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचा यामध्ये समावेश आहे. औद्योगिक तसेच सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वदेशी संशोधनामध्ये असलेली क्षमता या माध्यमातून अधोरेखित होते.

स्टार्टअप प्रदर्शन आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंडपामुळे स्टार्टअप्स आणि उद्योजकांना त्यांच्या तंत्रज्ञानाचे आणि उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या परिषदेच्या माध्यमातून सुमारे 150 स्टार्टअप्स एकत्र आले. त्यात सुमारे 300 स्टार्टअप प्रतिनिधी सहभागी झाले, तर इनक्यूबेशन आणि नवोन्मेष केंद्रांमधील आणखी 150 प्रतिनिधींच्या सहभागामुळे या कार्यक्रमातील व्यापक सहभाग अधोरेखित झाला.

तांत्रिक कार्यक्रमात 67 सदस्यांचा सहभाग असलेल्या आठ परिसंवादांचा समावेश आहे. या परिसंवादांमध्ये औषधांचा शोध आणि परवडणारी आरोग्यसेवा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उत्पादन तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संशोधन व विकास , सामग्री-आधारित नवोन्मेष; पोलाद आणि ॲल्युमिनियम क्षेत्राचे कार्बन उत्सर्जन कमी करणे, महत्त्वपूर्ण खनिजे आणि नवीन सामग्री, विज्ञान संवाद, विज्ञानाधारित स्टार्टअप्ससाठी उपलब्ध संधी, तसेच पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक नवोन्मेष अशा विविध विषयांचा समावेश आहे.

प्रयोगशाळेपासून बाजारपेठेपर्यंत : यशस्वी संशोधनातून व्यावसायिक उपक्रमांची निर्मिती या विषयावर विशेष व्याख्यान झाले. यामध्ये यशस्वी संशोधनाचे व्यावसायिक उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यासह, बाजारपेठेशी संबंधित संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणावर दिलेला भर या कार्यक्रमातील विविध उपक्रमांतून दिसून येतो. यात आठ सामंजस्य करार आणि चार तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रमांचा समावेश आहे. तसेच, दोन उत्पादनांचे लोकार्पण आणि एका सुविधेचे उद्घाटन, तसेच सीजीसीआरआयच्या नव्या लोगोचे, संकलनिकेचे आणि बूटकॅम्पचे लोकार्पण या कार्यक्रमाचा भाग आहे.

उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांना शास्त्रज्ञ आणि मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आणणारी उद्योग बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील संबंध अधिक बळकट करणे, तसेच सहकार्य, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण यासाठीच्या संधी ओळखणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. पूर्व भारताची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता, तसेच बळकट शैक्षणिक आणि औद्योगिक पाया, भारताच्या तंत्रज्ञानाधारित विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच, पोलाद, ॲल्युमिनियम, खाणकाम, ताग, माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रस्थापित उद्योग देशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी महत्त्वाचे भागीदार ठरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय प्रयोगशाळांमधून विकसित होत असलेल्या देशी यंत्रसामग्री, ऑप्टिकल नेटवर्क आणि इतर तंत्रज्ञानामध्ये नवीन क्षमता जोडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यामुळे उद्योग आणि स्टार्टअप्ससाठी नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

अवकाश, जैवतंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये भारताने अलीकडे केलेली प्रगती, तसेच लसी, उपचारपद्धती आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील देशातील विकास, सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांनी एकत्र काम केल्यास विज्ञानाची क्षमता किती मोठी आहे, हे दिसून येते. असे सिंह यांनी सांगितले. विकासाच्या पुढील टप्प्यात सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक भक्कम, व्यापक आणि दीर्घकाळ टिकणारे असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने आपला ऐतिहासिक वैज्ञानिक वारसा स्वदेशी तंत्रज्ञान, उद्योजकता, आधुनिक उत्पादन आणि उद्योग क्षेत्रातील बळकट भागीदारी यांच्याशी जोडणे आवश्यक आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. बंगालची ऐतिहासिक वैज्ञानिक परंपरा आणि भारतातील उद्योजकतेची नवी ऊर्जा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून 6 वी आरआयएसई परिषद काम करू शकते. स्वदेशी नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाची उभारणी, उत्पादन, आरोग्यसेवा आणि नेतृत्व या क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी ही परिषद मदत करू शकते, असेही त्यांनी सांगितले. या परिषदेच्या 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात पश्चिम बंगाल सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, अन्नप्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादनमंत्री डॉ. कल्याण चक्रवर्ती संबोधित करणार आहेत.

***

नेहा कुलकर्णी/ वैभवी जोशी /  राज दळेकर / गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2307154) अभ्यागत कक्ष : 14